Pages

Showing posts with label Snacks. Show all posts
Showing posts with label Snacks. Show all posts

Wednesday, 17 October 2012

व्हेजिटेबल क्रिस्पी - Veg Crispy


वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी


साहित्य:
भाज्या
१ मध्यम भोपळी मिरची, मोठे उभे तुकडे
१ मध्यम गाजर, पातळ चकत्या
१०० ग्राम पनीर, मोठे तुकडे
१ लहान कांदा, मोठे तुकडे आणि पाकळ्या वेगवेगळया कराव्यात
२ पातीकांद्याच्या काड्या
बॅटर
४ टेस्पून मैदा
६ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१ टीस्पून लसूण पेस्ट
१/२ टीस्पून मीठ
२ ते ३ चिमटी खायचा लाल रंग (किंवा गरजेनुसार)
२ चिमटी मिरपूड
इतर साहित्य
तळण्यासाठी तेल
१ टेस्पून तेल सॉस बनवण्यासाठी
२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आले पेस्ट
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१ लहान कांदा, बारीक चिरून
१ टेस्पून टोमॅटो केचप + १/२ टीस्पून सॉय सॉस + १ टेस्पून रेड चिली सॉस + १/४ कप पाणी
१/२ टीस्पून व्हिनेगर (किंवा आवडीनुसार)
१ टीस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टीस्पून मिरपूड
चवीपुरते मीठ

कृती:
१) "बॅटर" या लेबलखाली दिलेले सर्व साहित्य एका वाडग्यात घालून मिक्स करावे. [मैदा, कॉर्न फ्लोअर, लसूण पेस्ट, मीठ, खायचा लाल रंग, मिरपूड]. थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. या बॅटरमध्ये भोपळी मिरची, गाजर, कांदा, आणि बेबीकॉर्न यांचे तुकडे घालून मिक्स करावे. सर्व भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवाव्यात.
२) भाज्या गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात. तळलेल्या भाज्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात. उरलेल्या बॅटरमध्ये पनीरचे तुकडे घोळवून तेही तेलात तळून घ्यावेत.
३) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. कांदा नीट परतावा.
४) कढईत टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, आणि १/४ कप पाणी घालावे. नीट ढवळावे. लागल्यास थोडे मीठ घालावे.
५) लहान वाटीत २ टेस्पून पाणी आणि १ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. कढईत घालून थोडे घट्टसर होवू द्यावे. मिनिटभर ढवळावे. त्यात व्हिनेगर घालावे.
६) आता यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून १५-२० सेकंदच मिक्स करावे. वरून थोडी मिरपूड घालावी.
सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून चिरलेली कांद्याची पात घालून सर्व्ह करावे.

Wednesday, 10 October 2012

कॉर्न पकोडा - Corn Pakoda

Corn Pakoda in English

वेळ: २० ते २५ मिनिटे
वाढणी: ३ प्लेट
साहित्य:
दीड कप मक्याचे दाणे (महत्त्वाची टिप १ पहा)
१/२ कप ज्वारीचे पीठ
३ टेस्पून बेसन
२ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट (किंवा चवीनुसार)
१ टीस्पून जिरे
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मक्याचे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे.)
२) भरडलेल्या दाण्यात ज्वारीचे पीठ, मिरच्यांची पेस्ट, जिरे, बेसन, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे.
३) तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.

टीपा:
१) जर मक्याचे दाणे जून असतील तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२) इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) भजी तेलात सुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.

Thursday, 16 August 2012

सुंदल - Sundal

Sundal in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१/२ कप कबुली चणे
१ मध्यम कांदा, बारीक चिरून (ऐच्छिक)
२ ते ३ लाल सुक्या मिरच्या
फोडणीसाठी: २ टीस्पून तूप, चिमूटभर मोहोरी, १/२ टीस्पून उडीद डाळ
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
१ कढीपत्त्याची डहाळी
चवीपुरते मीठ

कृती:
१) चणे ८ ते १० तास भिजवावेत.
२) कुकरमध्ये भिजलेले चणे शिजवून घ्यावेत (४ ते ५ शिट्ट्या). चणे आतपर्यंत शिजले पाहिजेत पण अख्खेही राहिले पाहिजेत. शिजवताना पाण्यात १/२ टीस्पून मीठ घालावे.
३) कढईत तूप गरम करून त्यात मोहोरी, आणि उडीद डाळ फोडणीस घालावी. उडीद डाळ लालसर होईपर्यंत परतावे. त्यात मिरच्या आणि कढीपत्ता घालावा. ५ ते १० सेकंद परतून कांदा घालावा. कांदा परतला कि नारळ आणि शिजवलेले चणे घालावेत.
४) मिक्स करून लागल्यास थोडे मीठ घालावे. मंद आचेवर २ मिनिटे वाफ काढावी.
गरमच सर्व्ह करावे.

टीपा:
१) थोडा लिंबाचा रस सुंदलमध्ये छान लागतो.
२) सुंदल हे दुसऱ्या कडधान्यापासूनही बनवता येते. जसे मुग, मटकी, चवळी, काळे आणि हिरवे चणे इत्यादी.
३) कांदा ऐच्छिक आहे. सुंदल दक्षिण भारतात नवरात्रीदरम्यान बनवतात. तेव्हा वाटल्यास कांदा घालू नये.

Tuesday, 14 August 2012

अडई डोसा - Adai Dosa

Adai Dosa in English

वेळ: ३ मिनिटे प्रत्येकी
१८ ते २० मध्यम आकाराचे डोसे


साहित्य:
३/४ कप तांदूळ
१/२ कप उडीद डाळ
१/४ कप चणाडाळ
१/४ कप तूरडाळ
१/४ कप मुग डाळ
१/४ कप मसूर डाळ
१/२ टीस्पून मेथी दाणे
४-५ सुक्या लाल मिरच्या
१ इंच आले
चवीपुरते मीठ
डोसा बनवताना तेल

कृती:
१) तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ, मुगडाळ, मसूरडाळ, मेथीदाणे आणि लाल मिरच्या पुरेशा पाण्यात किमान ५-६ तास भिजत ठेवावे.
२) त्यातील पाणी काढून दुसऱ्या एका भांड्यात काढून ठेवावे. डाळ-तांदुळाच्या मिश्रणात आलं आणि मीठ घालून बारीक वाटावे. वाटताना बाजूला काढलेले पाणी थोडेथोडे घालून नेहमीच्या डोशाच्या पिठाला करतो तेवढे दाट वाटावे.
३) नॉनस्टीक तवा गरम करून त्यावर एक डाव पीठ घालावे. गोल पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. एक बाजू लालसर भाजली गेली कि दुसरी बाजू पलटावी.
४) तयार डोसा सांबर, चटणी, आणि बटाट्याची भाजी यांबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) या डोशाचे पीठ आंबवावे लागत नाही. मिक्सरमध्ये बारीक केले कि लगेच डोसे घालावे.
२) डाळींचे प्रमाण आवडीनुसार बदलावे.

Thursday, 2 August 2012

बटाटा फ्रॅंकी - Bombay Potato Frankie

Potato Frankie in English

वेळ: ४० मिनिटे
६ मध्यम फ्रॅंकीज
साहित्य:
१ कप उकडून कुस्करलेले बटाटे
१/२ कप ब्रेड क्रम्स
१ टेस्पून हिरवी मिरची, ठेचलेली
१/२ टीस्पून चाट मसाला
१/२ टीस्पून गरम मसाला
चवीपुरते मीठ
फ्रॅंकी रॅपसाठी
३/४ ते १ कप मैदा
१ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ
पुरेसे पाणी पीठ मळण्यासाठी
इतर साहित्य:
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ टेस्पून व्हिनेगर
१ टीस्पून बारीक चिरलेली मिरची
२ ते ३ चिमटी मीठ
चाट मसाला चवीनुसार

कृती:

१) एका भांड्यात मैदा, तेल आणि मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून मध्यम असा गोळा भिजवावा. झाकण ठेवून १५ ते २० मिनिटे भिजू द्यावा.
२) एका वाडग्यात कुस्करलेले बटाटे, हिरवी मिरची, ब्रेड क्रम्स, चाट मसाला, गरम मसाला आणि मीठ घालावे. छान मळून त्याचे ६ सारखे भाग करावे. प्रत्येक भागाला कॅप्सुलसारखा लंबाकृती आकार द्यावा. सर्व साहित्य शिजलेले असल्याने रोल्सन शालो फ्राय करू शकतो. आवडत असल्यास डीप फ्रायसुद्धा करू शकतो. शालो फ्राय करणार असाल तर थोड्याथोड्या वेळाने रोल टर्न करावा म्हणजे सर्व बाजूंनी शेकला जाईल.
३) पिठाचा गोळा ६ भागात विभागून घ्यावा. एक गोळा घेउन पातळसर पोळी लाटावी. गरम तव्यावर थोडे तेल लावून शेकून घ्यावी, दुसरी बाजू शेकताना आच मंद ठेवावी.
४) रोल्स मायक्रोवेव्हमध्ये थोडे गरम करावे. गरम पोळी घेउन त्यावर गरम केलेला रोल ठेवावा. चाट मसाला भुरभुरावा, थोडी हिरवी मिरची, किंचित मीठ, कांदा आणि १/२ टीस्पून व्हिनेगर बटाट्याचा रोलवर घालावे. दोन्ही बाजू रोलवर आणून गुंडाळावे. गरमच सर्व्ह करावे.
अशाप्रकारे उरलेल्या फ्रॅंकीज  बनवाव्यात.

टीप:
फ्रॅंकीसाठीची पोळी हि मैद्याचीच असावी. कणिक किंवा इतर पीठांपासून तयार केलेले रॅप्समुळे चवीत आणि टेक्स्चरमध्ये खूप फरक पडतो.

Tuesday, 31 July 2012

मिश्र कडधान्याची धिरडी - Mixed Kadadhanya Dhirade


वेळ: ४ मिनिटे प्रत्येकी एका धिरड्याला
१५ मध्यम आकाराची धिरडी


साहित्य:
१ कप वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मी मुग, मटकी, कबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे वापरले होते.)
३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार
१ टीस्पून जिरे
१/४ कप तेल
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
इतर ऐच्छिक साहित्यासाठी टीप २ पहा.

कृती:
१) सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. पाण्याची पातळी साधारण ३ ते ४ इंच वर असावी.
२) कडधान्ये नीट भिजली कि त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत.
३) स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील.
४) मोड आले कि मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पीठाएवढे घट्ट असावे.
५) चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ (लागल्यास) घालावे.
६) नॉन-स्टीक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धीरड्याच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी.
७) टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडीलावणे घेउन गरमच खावे.

टिप्स:
१) मी १/४ कप मुग, १/४ कप मटकी, १/४ कप काबुली चणे, २ ते ३ टेस्पून उडीद (किंवा उडीद डाळ), १/४ कप मसूर, ३ टेस्पून चवळी, ३ टेस्पून हिरवे वाटाणे घेतले होते. तुम्हाला आवडीनुसार आणि घरात अव्हेलेबल असलेले कोणतेही कडधान्य वापरू शकता. फक्त वाल किंवा तत्सम उग्र वास असणारे कडधान्य वापरू नये.
२) यामध्ये ठेचलेली लसूण आणि चिरलेला कांदाही घालू शकतो. तसेच कोथिंबीरीऐवजी पालकाची पाने बारीक चिरून घालू शकतो.

Thursday, 26 July 2012

मुळ्याचे पराठे - Muli Paratha


वेळ: ३५ ते ४० मिनिटे
५ ते ६ मध्यम पराठे
साहित्य:
सारण:::
१ मोठा पांढरा मुळा, किसलेला
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
१/४ टीस्पून ओवा
चवीपुरते मीठ
आवरणाची कणिक:::
१ कप गव्हाचे पीठ (कणिक)
२ टीस्पून तेल
१ मध्यम बटाटा, उकडून सोललेला
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मीठ
इतर साहित्य:
तेल किंवा बटर पराठे भाजताना

कृती:
१) कणिक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, उकडलेला बटाटा, तेल जिरे, हळद आणि मीठ घालावे. थोडे पाणी घालून मध्यमसर कणिक माळून घ्यावी. १५ मिनिटे झाकून ठेवावी.
२) तोवर पराठ्याचे सारण बनवावे. किसलेला मुळा एका बोलमध्ये घ्यावा. त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे. १५ मिनिटात मिठामुळे मुळ्यातील पाणी बाहेर येईल. हे पाणी पिळून बाहेर काढावे. पिळलेला मुळा दुसऱ्या बोलमध्ये घ्यावा. त्यात धने-जिरेपूड, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे.
३) तवा मध्यम आचेवर गरम करत ठेवावा. तोवर कणकेचे आणि सारणाचे ५ किंवा ६ मध्यम आकाराचे सारखे भाग करावे.
४) कोरडे पीठ घेउन कणकेचा एक भाग ३ इंच गोल लाटावा. सारणाचा एक भाग मध्यभागी ठेवावा. कडा सर्व बाजूंनी एकत्र करून सील करावे. कोरडे पीठ घेउन पराठा लाटावा. लाटणे हलक्या हाताने फिरवावे म्हणजे पराठा फाटणार नाही.
५) गरम तव्यावर मिडीयम-हाय आचेवर दोन्ही बाजूंनी पराठा भाजून घ्यावा. भाजताना चमचाभर तेल सोडावे.
गरम पराठा रायते, लोणचे, दही किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.

टीपा:
१) मुळ्याला पाणी सुटले कि पराठा लाटता येत नाही, ठिकठिकाणी फाटतो. म्हणून सारण बनवले कि लगेच पराठे बनवायला घ्यावेत, म्हणजे सारण जास्त ओलसर होणार नाही.
२) पराठे लाटताना लागेल तसे कोरडे पीठ घ्यावे, ज्यामुळे पराठा पोळपाटाला चिकटणार नाही.

Monday, 9 July 2012

तिखट मिठाच्या पुऱ्या - Tikhatmithachya Purya


वेळ: ३० मिनिटे
वाढणी: २० ते २२ मध्यम आकाराच्या पुऱ्या


साहित्य:
१ कप गव्हाचे पीठ (कणिक)
२ टेस्पून तांदुळाचे पीठ
२ टेस्पून बेसन
२ टीस्पून गरम तेल
१ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
१/४ टीस्पून हळद
चवीपुरते मीठ
पुऱ्या तळायला तेल

कृती:
१) मध्यम आकाराच्या वाडग्यात कणिक, बेसन, आणि तांदुळाचे पीठ एकत्र करावे. त्यात मीठ, लाल तिखट, धने-जिरेपूड आणि हळद घालून मिक्स करावे.
२) या मिश्रणात २ टीस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट पीठ मळावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
३) कढईत मंद आचेवर तेल गरम करायला ठेवावे. मधल्या वेळेत पीठाचे छोटे गोळे करावेत. या गोळ्यांच्या लाटून पुऱ्या कराव्यात. आच मिडीयम आणि हाय यांच्या मध्यावर आणावी. पुऱ्या दोन्ही बाजू पालटवून तळून घ्यावात.
४) पुरी तळताना ती फुलावी म्हणून पुरीवर  झाऱ्याने काळजीपुर्वक तेल उडवावे. पुरी सोनेरी रंगावर तळून घ्यावी.
पुरी तयार झाल्यावर बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवावी.
पुऱ्या गरम आणि गारही छान लागतात. २-३ दिवस टिकतात म्हणून प्रवासात न्यायलाही चांगला पर्याय आहे.

Friday, 6 July 2012

बेक शंकरपाळे - Baked Shankarpale

Baked Shankarpale in English

वेळ: १ तास
साधारण ४ कप भरून शंकरपाळे
बेक केल्यावर

बेक करण्याआधी
साहित्य:
दिड ते २ कप गव्हाचे पिठ (कणिक)
१/२ कप पातळ तूप
१/२ कप पिठी साखर
१/२ कप दूध
१/२ टिस्पून बेकिंग पावडर

कृती:
१) तूप आणि साखर परातीत घ्यावे. मिक्स करून मिश्रण हलके होईस्तोवर एकत्र फेसावे.
२) कणिक आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी.
३) तूपसाखरेच्या मिश्रणात साधारण २ कप कणिक घालावी आणि दूध घालून घट्ट गोळा बनवावा.
४) पिठाचा गोळा १० मिनीट झाकून ठेवावा.
५) या १० मिनीटात ओव्हन ३०० F वर प्रिहीट करावे. बेकिंग ट्रेवर अल्यूमिनियम फॉईल पसरवून तयार करावेत.
५) मिश्रणाचे टेनिस बॉलएवढे गोळे बनवावे. किंचीत जाडसर पोळी लाटावी. शंकरपाळे कातणाने कापून तयार करावेत. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ३० ते ३५ मिनीटे बेक करावेत. प्रत्येक शंकरपाळा सेपरेट राहिला पाहिजे.
ओव्हनमधून बाहेर काढून थोडे गार होवू द्यावेत.

टीप:
१) बेकिंग पावडर न टाकताही शंकरपाळे करता येतात पण खुसखुशीत होत नाहीत. वाईट लागत नाहीत, फक्त खुसखूशीत न होता जरा कडकडीत होतात.

बेबी कॉर्न पकोडा - Baby Corn Pakoda

Baby Corn Pakoda in English

वेळ: १५ मिनिटे
३ जणांसाठी

baby corn snack, corn recipes, tea time snack, baby corn pakodaLinkसाहित्य:
१५ बेबी कॉर्न
३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून आमचूर
चवीपुरते मिठ
तळणीसाठी तेल

कृती:
१) बेबी कॉर्न धुवून साफ कपड्याने पुसून घ्यावी.
२) कॉर्न फ्लोअर एका लहान वाडग्यात घ्यावे. त्यात सर्व मसाले आणि मिठ घालून मिक्स करावे. या मिश्रणात २ ते ३ टेस्पून पाणी घालून मध्यमसर भिजवावे.
३) कढईत तेल तापवावे. तेल व्यवस्थित तापले कि आच मध्यम करावी.
४) कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात ३ ते ४ बेबी कॉर्न घोळवून घ्यावी. गरम तेलात तळावीत. सोनेरी रंग येईस्तोवर तळावी. अशा प्रकारे सर्व बेबी कॉर्न तळून घ्यावीत.
टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावीत.

Wednesday, 27 June 2012

दही साबुदाणा - Dahi Sabudana


वेळ:  १० मिनिटे (साबुदाणा भिजलेला असल्यास)
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
१ कप साबुदाणा
१/२ कप पातळ ताक
२ ते ३ टेस्पून सायीचे दही (साईसकट) (टीप)
१ ते दीड कप साधे दही (गरजेप्रमाणे कमी-जास्त करावे)
फोडणीसाठी: २ टीस्पून साजूक तूप, १/४ टीस्पून जिरे, २ हिरव्या मिरच्या (बारीक तुकडे)
२ ते ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ ते २ टीस्पून साखर

कृती:
१) साबुदाणा एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालावा. साबुदाणा हाय पॉवरवर १ मिनिट मायक्रोवेव्ह करावा. बाहेर काढून ढवळावे आणि परत २ वेळा १-१ मिनिट मायक्रोवेव्ह करावा. साधारण ३-४ मिनिटात साबुदाण्याचा रंग थोडा बदलतो आणि किंचित फुललेलाही दिसतो.
२) मायक्रोवेव्ह केलेला साबुदाणा गार होवू द्यावा. नंतर एका पातेल्यात ठेवून त्यात पाणी घालावे. पाणी लगेच निथळून टाकावे. साधारण १/२ ते १ तासाने यात १/२ कप ताक घालावे. झाकण ठेवून साबुदाणा ४ ते ५ तास भिजू द्यावा.
३) साबुदाणा भिजला कि तूप, जिरे आणि हिरव्या मिरच्या अशी फोडणी करावी. हि फोडणी भिजलेल्या साबुदाण्यावर घालावी. दाण्याचा कूट, मिठ आणि थोडी साखरही घालावी.
४) साबुदाणा सुरीने किंवा काट्याने थोडा मोकळा करून घ्यावा. त्यात दही घालून मिक्स करावे. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे. चव पाहून मीठ किंवा साखर गरजेनुसार घालावी.
लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) सायीचे दही ऐच्छिक आहे पण त्यामुळे साबुदाणा चांगला मिळून येतो आणि सायीच्या दह्याची चवही उत्तम लागते.
२) दह्याचे प्रमाण नक्की नाही, अंदाजाने घालावे.
३) वरील रेसिपी बनवताना कोथिंबीर चिरून आणि थोड्याशा मिठात चुरडून घ्यावी. कोथिंबीर चुरडून घातल्याने स्वादही छान लागतो आणि दही-साबुदाणा खाताना कोथिंबीर दातात येत नाही.
 ४) साबुदाणा कढईतसुद्धा भाजता येईल. मध्यम आचेवर साबुदाणा कढईत सारखा ढवळत राहावा. रंग बदलला कि आच बंद करावी.

Monday, 23 April 2012

ढोकळा - Dhokla

Dhokla in English

वेळ: ३० मिनिटे (फार्मेन्टेशनचा वेळ वगळून)
वाढणी: १५ ते १७ मध्यम तुकडे

साहित्य:
१ कप बेसन
३ टेस्पून रवा
१/२ कप दही, फेटलेले
१/२ कप पाणी (कदाचित १/४ कप पाणी जास्त लागू शकेल)
१/२ टीस्पून किसलेले आले, १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, चिमटीभर सायट्रिक आम्ल (टीप २)
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
फोडणी आणि साखर-लिंबाचे पाणी::::
२ टीस्पून तेल, १/२ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग, २ टेस्पून साखर, १/४ कप पाणी, १ लिंबाचा रस

कृती:

१) एक खोलगट मध्यम आकाराचे बोल घ्यावे. त्यात पाणी आणि दही घालून मिक्स करावे. बेसन आणि रवा घालून गुठळी न होता मिक्स करावे. दाटसर मिश्रण बनवावे. (कंसीस्टन्सी वडे-भाजीच्या पिठापेक्षा थोडे दाट हवे.)
२) हे भांडे झाकून उबदार ठिकाणी ठेवावे. मिश्रण किमान १० ते १२ तास आंबू द्यावे.(थंडीमध्ये पीठ आंबायला जास्त वेळ लागतो. माझ्याघरी पीठ आंबायला साधारण २० तास लागले.)
३) पीठ आंबले कि त्यात किसलेले आले, मिरची पेस्ट, मीठ आणि चिमटीभर सायट्रिक आम्ल घालावे. मिक्स करावे.
४) ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करावे. पाण्याची पातळी तळापासून २ इंच ठेवावी. ढोकळा प्लेट्सना आतून आणि कडेला तेलाचा हात लावून घ्यावा.
५) पाणी उकळायला लागले कि ढोकळा मिश्रणात बेकिंग सोडा घालावा आणि ढवळावे. मिश्रण फसफसेल. लगेच मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेट्समध्ये घालावे. ढोकळा स्टॅंड स्टीमरमध्ये ठेवावा. झाकण लावून मोठ्या आचेवर १० ते १२ मिनिटे स्टीम करावा.
६) गॅस बंद करून  ७ ते ८ मिनिटे कुकरची वाफ जिरू द्यावी. कुकर उघडून ढोकळा थोडा गार होईस्तोवर ठेवावा. कडेने सुरी फिरवून घ्यावी. आणि अलगद ढोकळा थाळीमध्ये काढावा.
७) लहान कढले घ्यावे. त्यात तेल गरम करून मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी एका मध्यम वाटीत काढून ठेवावी. त्यात १/४ कप पाणी, लिंबू रस, आणि साखर घालून मिक्स करावे. थोडे मीठही घालावे. मिश्रण थोडे गोड झाले पाहिजे. त्यानुसार वाटल्यास थोडी साखर घालावी.
८) ढोकळा गार झाला कि त्यावर फोडणीचे साखर-लिंबाचे पाणी घालावे. हे पाणी ढोकळ्यात काही मिनिटे मुरू द्यावे.
ढोकळ्यावर चिरलेली कोथिंबीर आणि ताजा खोवलेला नारळ घालून सजवावे. ढोकळा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.

टिप्स:
१) ढोकळा अगदी बाहेरच्या सारखा दिसण्यासाठी ढोकळ्याच्या पिठात अगदी लहान चिमटी खायचा पिवळा रंग घालू शकतो. रंगासाठी हळद घालू नये. हळद आणि बेकिंग सोडा एकत्र केल्याने ढोकळ्याचा रंग लाल दिसतो.
२) सायट्रिक आम्ल घातल्याने ढोकळ्याला किंचित आंबट चव येते. थंडीमुळे माझ्याकडचे पीठ १०० % आंबले नव्हते आणि आंबल्यामुळे जो आंबटपणा येतो तो हवा तेवढा आला नव्हता. म्हणून मी सायट्रिक आम्ल घातले होते. पीठ व्यवस्थित आंबले असेल तर सायट्रिक आम्लाची गरज नाही.

Tuesday, 17 April 2012

फलाफल रॅप्स - Falafel Wraps

Falafel Wraps in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
४ पिटा ब्रेड - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
८ फलाफल - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
१/२ कप त्झात्झीकी सॉस - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
सलाडसाठी::::
१/२ कप काकडी, सोलून लहान चौकोनी तुकडे
१/४ कप टोमॅटो, लहान चौकोनी तुकडे
२ टेस्पून लाल कांदा, बारीक चिरून
२ टेस्पून पार्सली, बारीक चोरून
१ टीस्पून लिंबाचा रस
१ लहान हिरवी मिरची, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
१/४ कप लेट्युस, उभे पातळ काप

कृती:

१) वरील साहित्यात सलाडसाठी जे जिन्नस लागतात ते मिक्स करावेत.
२) पिटा ब्रेड मायक्रोवेव्ह मध्ये १० ते १२ सेकंद गरम करावे. प्रत्येक पिटा ब्रेडवर  २ फलाफल ठेवून त्यावर २-३ टेस्पून सलाड घालावे. वरून थोडा त्झात्झीकी सॉस घालावा.
पिटा-फलाफल रॅप तयार करून लगेच सर्व्ह करावे.

Thursday, 5 April 2012

फलाफल - Falafel


वेळ: ३५ ते ४० मिनिटे
८ ते १० मध्यम फलाफल

साहित्य:
दीड कप भिजलेले काबुली चणे (छोले)
२ टीस्पून बेसन (टीप १)
३ मोठ्या लसूण पाकळ्या
१ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ कप पार्सली
२ हिरव्या मिरच्या किंवा १/२ टीस्पून लाल तिखट
१ लिंबाचा रस
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
लहान चिमटी खायचा सोडा

कृती:
१) भिजलेले काबुली चणे मिक्सरमध्ये घालावेत, पाणी घालू नये. त्यात लसूण, पार्सली, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. भरडसर वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण एका वाडग्यात काढावे. त्यात बेसन, खायचा सोडा आणि धने-जिरेपूड घालावी आणि मिक्स करावे. चव पाहून गरज वाटल्यास तिखट मीठ घालावे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी.
३) साधारण दीड टेस्पून मिश्रण घेउन त्याचा घट्ट गोळा बांधावा. हा गोळा गरम तेलात घालावा. गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावा.
अशाप्रकारे सर्व फलाफल तळून घ्यावे. जनरली, फलाफल काकडीच्या सॉसबरोबर सर्व्ह करतात.

टीपा:
१) शक्यतो बेसन न घालता फक्त भिजलेल्या काबुली चण्याचे फलाफल करून पहावे. एक लहान गोळा गरम तेलात घालून पाहावा. जर गोळा तेलात फुटत असेल तरच बेसन घालावे.
२) फलाफल मध्यम आचेवरच तळावेत. मोठ्या आचेवर तळल्यास बाहेरून रंग लगेच येईल पण आतून कच्चे राहतील. तसेच मंद आचेवर तळल्यास फलाफल तेलात फुटू शकतात.

Thursday, 23 February 2012

मॅक्रॉनी उपमा - Macaroni Upma

Macaroni Upma in English

वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

macaroni Upma, pasta recipe, pasta upmaसाहित्य:
१ कप मॅक्रॉनी
१/२ कप कांदा, बारीक चिरलेला
१ लहान टोमॅटो, बारीक चिरून
१ ते २ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ टीस्पून तूप किंवा तेल
१/४ टीस्पून जिरे, २ चिमटी हिंग, ४-५ कढीपत्ता पाने
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) ५ ते ६ कप पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात १ टीस्पून मीठ घालावे. पाणी उकळले कि त्यात मॅक्रॉनी घालाव्यात. ८ ते १० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळानुसार उकळवून मॅक्रॉनी शिजवाव्यात. चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणी निथळू द्यावे.
२) कढईत तूप गरम करावे. त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतून टोमॅटो घालावा. टोमॅटो चांगला मउसर होईस्तोवर परतावा.
३) आता मॅक्रॉनी घालून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. २ मिनिटे गरम करून कोथिंबीरीने सजवून लगेच सर्व्ह करावे.
हा उपमा लहान मुलांच्या डब्यासाठी चांगला पर्याय आहे.

Thursday, 9 February 2012

ओट्स ब्राउन राईस इडली - Oats Idli

Oats and brown rice idli in English

२२ ते २५ मध्यम इडल्या

oats idli, oats chya idlya, oats and brown rice idliसाहित्य:
१/२ कप उडीद डाळ
१ कप ब्राउन राईस
१ कप रोल्ड ओट्स
चवीपुरते मीठ

कृती:
१) उडीद डाळ आणि ब्राउन राईस पाण्यात साधारण ६ ते ७ तास भिजत घालावे.
२) ६-७ तासानंतर पाणी निथळून टाकावे. आणि दोन्ही वेगवेगळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटताना थोडे पाणी घालावे.
३) रोल्ड ओट्स १० मिनिटे अर्धा ते पाउण कप पाण्यात भिजत घालावे. १० मिनीटांनी बारीक पेस्ट करून घ्यावे.
४) मोठे खोलगट स्टीलचे किंवा काचेचे भांडे घ्यावे. त्यात वाटलेला तांदूळ, वाटलेली डाळ आणि वाटलेले ओट्स घालावे. एक टीस्पून मीठ घालावे.
५) वाटलेले मिश्रण झाकून उबदार जागी आंबण्यासाठी ठेवावे. साधारण ८ ते १० तासात पीठ आंबेल (महत्त्वाची टीप १)
६) मिश्रण आंबले कि किंचीतशी चव पाहून मिठाचा अंदाज घ्यावा. लागल्यास मीठ घालावे. मिक्स करावे. पीठ जर खूप दाट वाटत असेल तर थोडेथोडे पाणी घालून सारखे करावे.
७) इडली पात्राला तेल लावून घ्यावे. त्यात इडलीचे पीठ घालून स्टॅंड तयार करावा. इडली कुकर घेउन त्यात तळाला २ इंच भरेल इतपत पाणी घालावे. साधा कुकर वापरणार असाल तर झाकानावरील शिट्टी काढून ठेवावी.
८) पाणी उकळायला लागले कि इडली स्टॅंड आत ठेवावा. झाकण लावून १२ ते १५ मिनिटे मोठ्या आचेवर वाफ काढावी. गॅस बंद करावा आणि ५ ते ७ मिनिटानी इडली स्टॅंड बाहेर काढावा. चमच्याने किंवा सुरीने इडल्या सोडवून घ्याव्यात.
अशाप्रकारे उरलेल्या पिठाच्या इडल्या बनवून घ्याव्यात.
गरम इडल्या सांबर आणि नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह कराव्यात.

टीपा:
१) थंड वातावरणात पीठ सहज आंबत नाही. जर ओव्हन असल्यास २०० F वर चालू करून लगेच २-४ मिनिटांनी स्विच ऑफ करावा. पीठाचे भांडे झाकून ओव्हनमध्ये ठेवावे. ओव्हनमधील तापमानामुळे पीठ आंबायला मदत होईल.
२) इडल्या आधी करून ठेवल्या तरी चालतात. मायक्रोवेव्हमध्ये गरम करून सर्व्ह कराव्यात.
३) मी तांदूळ न वापरता पूर्ण ओट्स वापरून इडल्या करून पहिल्या आहेत. या इडल्या खूप जड होतात आणि फुलत नाहीत. त्यामुळे ओट्सच्या बरोबरीने साधा तांदूळ किवा ब्राउन राईस वापरावा.

Tuesday, 24 January 2012

गोटा भजी - Gota Bhaji Methi Gota

Gota Bhaji in English
वेळ: २५ ते ३० मिनीटे
साधारण १५-१८ मध्यम भजी

gujarati gota bhaji, methi gotaसाहित्य:
१/२ कप बेसन (टिप १)
१/२ कप मूगडाळ पीठ (टिप १)
१/४ कप कसुरी मेथी
१ टेस्पून लसूण पेस्ट
१/२ कप दही किंवा लागेल तेवढे
मसाले: २ लवंगा, २ चिमटी दालचिनी पावडर, १ टीस्पून अख्खे धणे, २ टीस्पून जिरे, ७-८ मिरी दाणे- सर्व कुटून भरडसर पावडर करावी.
२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
२ टीस्पून साखर
१/८ टीस्पून बेकिंग सोडा
चवीपुरते मीठ
गोटे तळण्यासाठी तेल

कृती:
१) एका खोलगट भांड्यात बेसन, मूगडाळ पीठ, कसुरी मेथी, लसूण पेस्ट, मसाला पावडर, लाल तिखट, हिंग, हळद, साखर आणि मीठ मिक्स करावे. यामध्ये दही घालून मिक्स करावे आणि दाटसर, चिकट असे पीठ भिजवावे. मिश्रणाचा कणकेसारखा गोळाही भिजला नाही पाहिजे आणि एकदम पातळही नाही असे पीठ भिजवावे. भजी करायच्या थोडा वेळ आधी सोडा घालून मिक्स करावे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की गॅस मिडियम-हायच्यामध्ये ठेवावा. हाताला तेल लावून चमचाभर मिश्रण हातात घ्यावे त्याचा गोळा बनवावा आणि तेलात सोडावा. अशाप्रकारे सर्व गोटा भजी तळून घ्यावी.
भजी हिरवी किंवा चिंच चटणीबरोबर सर्व्ह करावी.

टिप्स:
१) बेसन आणि मूगडाळ यांचे रवाळ पीठ मिळाल्यास भाजी जास्त चांगली होईल.
२) जर मिश्रणाचा कणकेसारखा गोळा बनवून त्याची भजी केल्यास आतून गच्च आणि कच्ची राहते. आणि मिश्रण गरजेपेक्षा पातळ झाल्यास गोल गोटे बनत नाहीत. म्हणून मिश्रण चिकट्‌सर घट्ट बनवावे. आणि पीठ हाताळताना हातांना तेल लावावे. नाहीतर मिश्रण हातालाच चिकटेल.
३) कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो. पण आवडत असल्यास फ्रेश मेथीची पानेसुद्धा बारीक चिरून घालू शकतो.

Thursday, 19 January 2012

पिटा ब्रेड पिझ्झा - Pita bread Pizza

Pita Bread Pizza in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

veggie pizza, quick pizza recipe, pita bread pizzaसाहित्य:
पिटा ब्रेड
१/२ कप पिझ्झा सॉस
१ लहान कांदा, गोल चकत्या करून त्या सोडवून रिंग्स कराव्यात
१ लहान भोपळी मिरची, पातळ उभे काप
५-६ मश्रूम्स, पातळ काप
२ टेस्पून स्वीट कॉर्न, उकडलेले
१ कप मोझेरेला चीज, किसलेले
१/२ टीस्पून रेड चिली फ्लेक्स
१/४ टीस्पून इटालियन सिझनिंग
२ टीस्पून ऑलिव्ह ऑइल
चवीपुरते मीठ

कृती:
१) ओव्हन ४०० F वर १० मिनिटे प्रीहीट करावे
२) एक पॅन गरम करून त्यात एक टीस्पून ऑलिव्ह ऑइल घालून त्यात कांदा, भोपळी मिरची, मश्रूम्स, आणि स्वीट कॉर्न घालून १ मिनिट परतावे. त्यावर थोडे रेड चिली फ्लेक्स, मीठ आणि इटालियन सिझनिंग घालावे. मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून ठेवावे.
३) पिटा ब्रेडला थोडे ऑलिव्ह ऑइल ब्रश करून घ्यावे. पिटा ब्रेड बेकिंग शीटवर ठेवून ओव्हनमध्ये २-३ मिनिटे गरम करून घ्यावे.
४) बाहेर काढून त्यावर पिझ्झा सॉस लावावा. प्रत्येक पिटा ब्रेडवर साधारण ४ ते ६ टेस्पून चीज घालून त्यावर परतलेल्या भाज्या घालाव्यात.
५) पिटा ब्रेड ओव्हनमध्ये ठेवून साधारण ८ मिनिटे बेक करावे किंवा चीज वितळून लाईट ब्राउन झाले कि बाहेर काढावे.
गरमच सर्व्ह करावे.

टीपा:
१) आपल्या आवडीनुसार दुसरी टॉपिंग्जसुद्धा वापरू शकतो. जसे अननसाचे छोटे तुकडे, ब्लॅक ऑलिव्ज, अल्पिनो पेपर्स, ब्रोकोली इत्यादी.

Wednesday, 11 January 2012

पनीर टोस्ट सॅंडविच - Paneer Toast Sandwich

Paneer Sandwich in English

वाढणी: ३ सॅंडविचेस
वेळ:२० मिनिटे

paneer sandwich, grilled paneer sandwich, paneer toast sandwich, paneer quick snacks recipes, one dish meal recipes, quick snack recipesसाहित्य:
६ ब्रेडचे स्लाईसेस
३ टेस्पून कांदा, उभा पातळ चिरून
३ टेस्पून भोपळी मिरची, उभे पातळ कप
१ टीस्पून चाट मसाला
३ टेस्पून हिरवी चटणी
१ टेस्पून बटर
स्टफिंग:::
७५ ग्राम पनीर, लहान चौकोनी तुकडे
१/२ टीस्पून जिरेपूड
२ ते ३ टेस्पून टोमॅटो केचप
चवीपुरते मीठ

कृती:
१) एका लहान बोलमध्ये टोमॅटो केचप, जिरेपूड आणि अगदी चिमुटभर मीठ घालून मिक्स करावे. यामध्ये पनीरचे तुकडे १० मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे.
२) पनीरचे तुकडे ग्रील करावे. जर ग्रील नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्या बटरवर किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे परतून घ्यावे. ग्रील केल्यावर पनीर बाजूला काढून ठेवावे.
३) ब्रेड स्लाईसेस वर बटर लावून घ्यावे. कमी आचेवर ब्रेड थोडे टोस्ट करून घ्यावे.
४) ३ ब्रेड स्लाईसेस वर हिरवी चटणी लावून घ्यावी. त्यावर पनीरचे तुकडे आणि भाज्या घालाव्यात. थोडा चाट मसाला भुरभुरावा. आता उरलेले ब्रेड स्लाईसेस घेउन त्यावर हिरवी चटणी लावावी. आणि पनीरच्या तुकड्यांवर ठेवून सॅंडविच तयार करावे.
५) सॅंडविचेस ग्रील करून घ्यावे किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर घालून दोन्ही बाजू मध्यम आचेवर टोस्ट करावे. जर नॉनस्टिक पॅन वापरणार असाल तर आच कमी ठेवावी. आणि २-३ मिनिटानी कालथ्याने हलकेच पलटावे. दुसरी बाजूही छान भाजून घ्यावी.

सॅंडविच हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

टिपा:
१) जर लहान मुलांसाठी हि डिश बनवायची असेल तर कमी तिखट बनवावी किंवा फक्त कोथिंबीरीची मिरची न घालता चटणी बनवावी.
२) शक्यतो रेडीमेड पनीर वापरावे. रेडीमेड पनीर आच लागल्यावर पटकन वितळत नाही.
३) मॅरीनेशनमध्ये आवडीनुसार मसालेही घालू शकतो.

Tuesday, 20 December 2011

ओट्स डोसा - Oats Dosa

Oats dosa in English

२० मध्यम डोसे
वेळ: २ ते ३ मिनिट्स/डोसा

healthy breakfast recipe, quick and easy, dosa recipes, oats dosaसाहित्य:
१ कप तांदूळ
१ कप उडीद डाळ
३ कप रोल्ड ओट्स (क्विक कुकिंग ओट्स)
१/२ टीस्पून मेथी दाणे
चवीपुरते मीठ
तेल डोसे बनवताना

कृती:
१) उडीद डाळ आणि तांदूळ ५ ते ६ तास पाण्यात वेगवेगळे भिजवावे. मेथी दाणे उडीद डाळीबरोबरच भिजवावे.
२) डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटण्याच्या आधी १० मिनिटे ओट्स भिजवावे. साधारण २ कप पाण्यात १० मिनिटे भिजवावे.
३) तांदुळामधील पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गरजेपुरते पाणी घालून वाटावे. खूप जास्त पाणी घालू नये.
४) उडीद डाळीमधील पाणी काढून टाकावे. थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटावी. वाटलेल्या डाळीत भिजवलेले ओट्स घालून परत एकदा वाटावे.
५) वाटलेला तांदूळ आणि वाटलेली डाळ एकत्र करून त्यात मीठ घालावे. थोडेथोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी अड्जस्ट करावी. झाकून उबदार ठिकाणी ठेवावे. ८ ते १० तास मिश्रण आंबवावे.
६) मिश्रण आंबले कि त्यातील २ कप मिश्रण बाजूला काढावे. जर मिश्रण घट्ट असेल तर थोडे पाणी घालावे. इडलीच्या पिठापेक्षा डोशाचे पीठ थोडे पातळ असावेत म्हणजे डोसे पातळ व कुरकुरीत होतात. अशाप्रकारे लागेल तसे मिश्रण घेउन पातळ करावे आणि मग डोसे घालावे.
७) तवा तापवून त्यावर थोडे तेल घालावे आणि काळजीपूर्वक पेपर टॉवेलने पुसून टाकावे. आच मिडीयम हायवर असावी. मध्यम पळीभर मिश्रण घेउन तव्याच्या मध्यावर घालावे. क्लॉकवाईज गोल फिरवावे आणि डोसा बनवावा. ३० सेकंदानी थोडे तेल कडेने आणि डोशावर सोडावे. एक बाजू झाली कि कालथ्याने दुसरी बाजू पलटावी. दोन्ही बाजू भाजल्या कि सांबार किंवा चटणीबरोबर डोसा गरमच सर्व्ह करावा.

टीपा:

१) पीठ आंबवताना नेहमी मोठे भांडे घ्यावे. म्हणजे ज्यात मिश्रण घातल्यानंतर वरती एकदीड वीत जागा राहिली पाहिजे. मध्यमसर भांडे घेतले तर मिश्रण आंबून भांड्याबाहेर उतू जाते.
२) थंडीमध्ये पीठ आंबत नाही अशावेळी ओव्हन २०० F वर ३-४ मिनिटे गरम करावा ओव्हन स्वीच ऑफ करून पिठाचे भांडे झाकून ओव्हनमध्ये ठेवावे. आणि ओव्हन सारखा उघडू नये. पीठ ओव्हनमध्ये आंबवणार असाल तर स्टील किंवा काचेचे भांडे वापरावे.
३) डोशाचे पीठ डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. ४-५ दिवस पीठ चांगले राहते आणि गरजेप्रमाणे झटपट डोसे करता येतात.