Pages

Tuesday, 31 July 2012

मिश्र कडधान्याची धिरडी - Mixed Kadadhanya Dhirade


वेळ: ४ मिनिटे प्रत्येकी एका धिरड्याला
१५ मध्यम आकाराची धिरडी


साहित्य:
१ कप वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मी मुग, मटकी, कबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे वापरले होते.)
३ ते ४ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार
१ टीस्पून जिरे
१/४ कप तेल
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
इतर ऐच्छिक साहित्यासाठी टीप २ पहा.

कृती:
१) सर्व कडधान्ये एकत्र करून पाण्यात ८ ते १० तास भिजवावीत. पाण्याची पातळी साधारण ३ ते ४ इंच वर असावी.
२) कडधान्ये नीट भिजली कि त्यातील न भिजलेली, कडक राहिलेली कडधान्ये वेचून काढून टाकावीत.
३) स्वच्छ केलेली कडधान्ये कापडात बांधून मोड यायला उबदार जागी ठेवावी. ७ ते १० तासांनी मोड येतील.
४) मोड आले कि मिक्सरमध्ये कडधान्ये, मिरच्या, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून किंचित भरडसर राहील असे फिरवावे. इडली पीठाएवढे घट्ट असावे.
५) चिरलेली कोथिंबीर, जिरे आणि मीठ (लागल्यास) घालावे.
६) नॉन-स्टीक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल घालावे. डावभर पीठ घालून ते जमेल तेवढे पातळ पसरवावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. नंतर झाकण काढून धीरड्याच्या कडेने तेल सोडावे. बाजू पालटून दुसरी बाजूही नीट शिजू द्यावी.
७) टोमॅटो केचप किंवा आवडीचे तोंडीलावणे घेउन गरमच खावे.

टिप्स:
१) मी १/४ कप मुग, १/४ कप मटकी, १/४ कप काबुली चणे, २ ते ३ टेस्पून उडीद (किंवा उडीद डाळ), १/४ कप मसूर, ३ टेस्पून चवळी, ३ टेस्पून हिरवे वाटाणे घेतले होते. तुम्हाला आवडीनुसार आणि घरात अव्हेलेबल असलेले कोणतेही कडधान्य वापरू शकता. फक्त वाल किंवा तत्सम उग्र वास असणारे कडधान्य वापरू नये.
२) यामध्ये ठेचलेली लसूण आणि चिरलेला कांदाही घालू शकतो. तसेच कोथिंबीरीऐवजी पालकाची पाने बारीक चिरून घालू शकतो.

0 comments:

Post a Comment