Pages

Showing posts with label Patal Bhaji. Show all posts
Showing posts with label Patal Bhaji. Show all posts

Tuesday, 1 May 2012

कांदा बटाटा रस्सा - Kanda Batata Rassa

Kanda batata Rassa in English


वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी


साहित्य:
१ मोठा कांदा
४ माध्यम बटाटे
फोडणीसाठी: १ तेस्पून तेल, १/४ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४ ते ५ कढीपत्ता पाने
२ ते ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट (किंचित भरडसर)
१ टेस्पून ताजा नारळ, खोवलेला
२ टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ ते ३ टेस्पून गूळ किंवा चवीनुसार
२ टीस्पून गोडा मसाला
चवीपुरते मीठ

कृती:
१) पांढरा किंवा पिवळा कांदा वापरा. दोन्ही टोके कापून कांदा सोलून घ्यावा. मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कांदा खूप मोठा असल्यास कांद्याचे पदर विलग करावे.
२) बटाटे सोलून लहान तुकडे करावेत.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. ५ ते ७ सेकंद परतून त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात. मिक्स करून वर झाकण ठेवावे आणि मध्यम आचेवर वाफेवर बटाटा शिजू द्यावा. बटाटा साधारण ७० % शिजू द्यावा.
४) बटाटे अर्धवट शिजले कि त्यात कांदा आणि मीठ घालावे. झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी.
५) रस्सा तयार होईल इतपत पुरेसे पाणी घालावे. चिंच कोळ, गोडा मसाला, दाण्याचा कुट आणि नारळ घालावे. मध्यम आचेवर उकळी काढावी.
६) कांदा, बटाटा शिजला कि गुळ घालावा. गुळ घालून २-३ मिनिटे उकळी काढावी. कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरम भात किंवा पोळीबरोबर कांदा बटाट्याचा रस्सा वाढावा.

Thursday, 18 August 2011

अळूचं फदफदं - Aluchi Patal Bhaji

Aluchi Patal Bhaji in English

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ७ ते ८ मध्यम वाट्या (३ ते ४ जणांसाठी)

aluchi patal bhaji, aluvadiसाहित्य:
७ ते ८ अळूची मध्यम पाने
३ ते ४ टेस्पून शेंगदाणे
२ ते ३ टेस्पून चणा डाळ
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट
३ टेस्पून बेसन
१ टीस्पून चिंच
२ टीस्पून गोडा मसाला
२ टीस्पून गूळ
चवीपुरते मीठ

कृती:
१) शेंगदाणे आणि चणा डाळ किमान २ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर प्रेशर कुकरमध्ये १ किंवा २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.
२) चिंच १/२ कप पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावी. नंतर चिंच कुस्करून कोळ काढून घ्यावा.
३) अळूची पाने धुवून पुसून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. नंतर पानं बारीक चिरून घ्यावी. देठंही चिरून घ्यावीत.
४) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. १/२ टीस्पून मीठही घालावे. झाकण ठेवून ६ ते ७ मिनिटे शिजवावे. अळू जर कोरडा वाटत असेल तर थोडे पाणी शिंपडावे.
५) चिंचेचा कोळ घालून अजून ३-४ मिनिटे शिजू द्यावे. १/२ कप पाण्यात २ टेस्पून बेसन गुठळी न होता मिक्स करून घ्यावे.हे मिश्रण कढईत घालून ढवळावे.
६) यात शिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे घालावे. गरजेनुसार थोडे पाणी घालावे. (भाजी पळीवाढी करावी, प्रचंड घट्टही नको आणि पातळही नको.)
७) गोडा मसाला, गूळ, आणि लागल्यास मीठ घालून मिक्स करावे. बेसन शिजेस्तोवर उकळी काढावी.
गरमागरम तूप भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) अळूची पाने फोडणीला टाकून मग शिजवण्याऐवजी आधी प्रेशर कुकरमध्ये शिजवली तरीही चालतात. चिरलेली पाने शिजवून मग फोडणीस टाकावी.
२) पारंपारिक पद्धतीनुसार या भाजीत आंबट चुका आणि मुळा घालतात. आवडत असल्यास १/४ ते १/२ कप बारीक चिरलेला आंबट चुका अळूबरोबरच फोडणीला टाकावा. याला चव फार आंबट असते त्यामुळे जर आंबट चुका वापरणार असाल तर चिंच घालू नये. आणि घातल्यास आधी चव पाहून मगच घालावी. तसेच १/२ मुळा बारीक चिरून फोडणीस घालावा.
३) ओल्या नारळाच्या पातळ चकत्या शेंगादाण्याबरोबर घालाव्यात.
४) तिखट मीठ गुळ चिंच आणि गोड मसाला आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करावा. पण या भाजीला मसाले आणि आंबट गोडपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते.

Thursday, 16 June 2011

पडवळ डाळिंब्या - Padwal Dalimbya

Padwal dalimbi in english

वेळ: २५ ते ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

padwal dalimbya, dalimbi usal, padwal bhaji, snake gourd stir fry, snake gourd sabzi, vaal bhaji, vaal recpe, indian curry
साहित्य:
दीड कप चिरलेले पडवळ (स्टेप २)
१ कप सोललेल्या डाळिंब्या (स्टेप १)
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२ ते ३ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ टेस्पून गूळ
चवीपुरते मीठ
इतर ऐच्छिक साहित्य: २ कोकमचे तुकडे, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून जिरे भाजून केलेली ताजी पुड

कृती:
१) १/२ कप वाल पाण्यात साधारण १२ तास भिजत ठेवावे. वाल भिजले कि पाणी काढून चाळणीत निथळत ठेवावे. नंतर स्वच्छ सुती कपड्यात घट्ट बांधून उबदार जागी ठेवावे. मोड यायला किमान १० तास तरी लागतील. जर हवामान थंड असेल तर अजून वेळ लागू शकतो. मोड आले कि वाल कोमट पाण्यात घालावे. १० मिनिटानी सोलावेत. वाल खूप नाजूक असतात, आणि काळजीपूर्वक सोलले नाहीत तर ते तुटू शकतात. १/२ कप वालाच्या साधारण १ कप डाळिंब्या तयार होतात.
२) पडवळ मधोमध उभे चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. आणि १ सेमीचे तुकडे करावे.
३) तेल तापवून मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. डाळिंब्या आणि पडवळ घालावे. थोडे पाणी शिंपडावे आणि थोडे मीठ घालावे.
४) झाकण ठेवून मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. मध्येमध्ये थोडे पाणी घालावे म्हणजे कढईच्या तळाला भाजी चिकटून करपणार नाही. तरीही खूप जास्त पाणी एकावेळी घालू नये. यामुळे भाजीचा स्वाद कमी होतो. मध्येमध्ये गरजेपुरतेच थोडेसे पाणी घालावे.
५) एक डाळिंबी घेउन बोटाने चेपून पहावी. जर शिजली असेल तर नारळ, गूळ, मीठ आणि रस राहील इतपत पाणी घालावे. या भाजीला थोडा रस चांगला लागतो. खूप सुकी झाली भाजी तर तेवढी चविष्ट लागत नाही.
भाजी शिजली कि पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टिप्स:
१) जर ऐच्छिक साहित्य वापरायचे असेल तर कोकम डाळिंबी-पडवळ बरोबरच घालावे. आणि गोड मसाला व जिरेपूड नारळ घालताना त्याबरोबर घालावी.
२) पडवळ आणि डाळिंब्यांचे प्रमाण आवडीनुसार बदलता येईल. माझ्या घरी या भाजीत डाळिंब्या पडवळापेक्षा जास्त असलेल्या आवडतात. जर पडवळ जास्त असावे असे वाटत असेल तर पडवळाचे प्रमाण जास्त ठेवावे.

Thursday, 9 June 2011

सोया मेथी मटार - Soya Methi matar

Soya Methi Malai in English

वेळ: ४० मिनीटे
वाढणी: ३ जणांसाठी

soya methi malai, Soya matar, Methi malai matarसाहित्य:
दीड कप मेथीची पाने, बारीक चिरून (महत्त्वाची टीप क्र १)
पाउण कप सोया चंक्स
१/२ कप मटार (फ्रोझन)
फोडणीसाठी १ टेस्पून तेल, २ चिमटी जिरे, १/८ टीस्पून हळद, १ टीस्पून आले-मिरचीची पेस्ट, १ टीस्पून लाल तिखट
२ टीस्पून किचन किंग मसाला
१/४ ते १/२ कप हेव्ही क्रीम
चवीपुरते मीठ
सजावटीसाठी २ टेस्पून बारीक चिरलेला टोमेटो

कृती:
१) मेथी धुवून बारीक चिरून घ्यावी. सोया चंक्स गरम पाण्यात ५ मिनिटे भिजवून ठेवावेत. गरम पाणी काढून टाकावे आणि गार पाणी घालावे. २ मिनिटानंतर सोया चंक्स हाताने घट्ट पिळून घ्यावे. हे सोया चंक्स सुरीने थोडे लहान तुकडे होतील इतपत बारीक करावे.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात जिरे आणि आले-मिरचीची पेस्ट घालून थोडावेळ परतावे. नंतर कांदा, हळद, लाल तिखट, आणि २ चिमटी मीठ घालावे. कांदा लालसर होईस्तोवर परतावे.
३) मटार घालून २ मिनिटे परतावे. नंतर सोया चंक्स आणि मेथीची घालून परतावे. २ मिनिटे झाली कि किचन किंग मसाला घालावा. आता मेथी कोरडी होईस्तोवर झाकण न ठेवता परतावे. चव पाहुन मीठ आणि इतर मसाले लागतील तसे घालावे.
४) मेथी शिजली कि आच एकदम कमी करावी. आणि गरजेनुसार हेव्ही क्रीम घालावे आणि ढवळावे म्हणजे क्रीम फुटणार नाही. आच एकदम कमी असावी.
क्रीम घातल्यावर जास्त उकळवू नये त्यामुळे क्रीम भाजीत फुटण्याचा संभव असतो.
गरमागरम भाजी तोमतो ने सजवून पोळी किंवा रोटी/नान बरोबर सर्व्ह करावी.

टीपः
१) मेथीचा कडवटपणा कमी करायचा असेल तर चिरलेली मेथी मिठाच्या पाण्यात थोडावेळ भिजवून ठेवावी. नंतर पिळून काढावी आणि वापरावी. पण यामध्ये जीवनसत्वांचा नाश होतो. त्यामुळे कडवटपणा अगदीच नको असेल तर हि पद्धत अवलंबावी.
२) सोया चंक्स ऐवजी सोय ग्रानुअल्स वापरले तरीही चालतील.
३) या भाजीत जर मटार घालायचे नसतील तर फक्त सोया चंक्स आणि मेथी अशी सुद्धा भाजी करता येईल.
४) किचन किंग मसाल्या ऐवजी गरम मसाला वापरला तरीही छान चव येते. फक्त थोडा कमी मसाला घालावा.

Tuesday, 21 December 2010

सिमला मिरची रस भाजी - Simla Mirchi batata Ras Bhaji

Simla Mirchi Rassa in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: ३ जणांसाठी

bhopli mirchi, dhobli mirchi recipe, capsicum sabzi, bell pepper bhaji, Indian vegetables, capsicum curry, bhopli mirchi chi bhaji


साहित्य:
२ कप भोपळी मिरचीचे मोठे तुकडे
१ कप बटाट्याचे मध्यम तुकडे
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गोडा मसाला
२ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टेस्पून ताजा नारळ
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ किंवा चवीनुसार
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. आधी बटाटे घालून मिक्स करावे. साधारण एक ते दोन मिनीट वाफ काढावी.
२) आता भोपळी मिरची घालून मिक्स करावे. अंदाजे ३/४ कप पाणी, गोडा मसाला, चिंचेचा कोळ आणि मिठ घालून मिक्स करावे. बटाटे शिजेस्तोवर शिजवावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. भोपळी मिरची एकदम मऊ होईस्तोवर शिजवू नये. अगदी किंचीत कच्ची राहू द्यावी.
३) बटाटा शिजला कि भाजीत गूळ, नारळ आणि शेंगदाणा कूट घालावा. छान ढवळावे आणि गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावे.

Saturday, 11 September 2010

ऋषींची भाजी - Rishi Panchami Bhaji

Rishi Panchami Bhaji in English

४ जणांसाठी (प्रत्येकी १ मोठी वाटी)
वेळ: २० मिनीटे

Ganapati Recipes, Rishi Panchami Bhaji, Rishi chi Bhajiसाहित्य:
पाऊण ते एक कप भेंडीचे तुकडे (१ इंच)
४ अळूची मध्यम पाने (टीप)
१/२ कप पडवळाच्या चकत्या
२०० ग्राम लाल भोपळ्याच्या फोडी (मध्यम) (साले काढून)
१/४ कप मटारचे दाणे
१/४ कप पापडी दाणे
१/४ कप मक्याचे दाणे
५-६ बेबी कॉर्न, (१ इंचाचे तुकडे करावे)
२ टेस्पून शेंगदाणे (३ तास भिजवलेले)
२ टिस्पून चिंच (कोळ करून घ्यावा)
१ हिरवी मिरची
१/२ कप ताजा खवलेला नारळ
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) अळूची पाने धुवून त्याची देठं कापून घ्यावीत. देठ सोलून वेगळी ठेवावीत. त्याचे बारीक तुकडे करावेत.
२) पाने बारीक चिरून घ्यावीत. कूकरमध्ये अळू (फक्त पाने) १ शिट्टी करून शिजवून घ्यावा.
२) अळूची शिजवलेली पाने मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. वाटताना मिरचीही घालावी.
३) कूकर गरम करावा व त्यात तूप-जिर्‍याची फोडणी करावी. त्यामध्ये सर्व भाज्या अळूच्या देठांसह फोडणीस घालाव्यात. थोडावेळ परतून वाटलेली अळूची पाने घालावीत.
४) चिंचेचा कोळ घालावा. चवीपुरते मिठ आणि भाज्या शिजण्यापुरते पाणी घालावे.
५) कूकरचे झाकण बंद करावे आणि मध्यम आचेवर साधारण १५ मिनीटे भाजी शिजू द्यावी. १५ मिनीटांनी गस बंद करावा. वाफ मुरली कि कूकरचे झाकण उघडावे आणि ओला नारळ घालून मिक्स करावे. एक उकळी काढावी.
गरमा गरम भाजी, पोळी किंवा दशमीबरोबर सर्व्ह करावी. हि भाजी नुसती खायलाही चविष्ट लागते.

टीप:
१) मला जितक्या भाज्या मिळाल्या तेवढ्या मी वापरल्या. परंतु ऋषींच्या भाजीमध्ये अजूनही काही भाज्या वापरल्या जातात. यामध्ये मुख्यत: लाल माठ, चवळी, आंबट चुका, अंबाडी यासारख्या पालेभाज्या वापराव्यात. पालक, मेथी, शेपू यांसारख्या उग्र चवीच्या भाज्या वापरू नयेत, भाजीची चव बिघडते. तसेच सुरण, रताळे, अळकुडी (अर्बी) यांसारखे कंदही वापरावेत. काकडी, तोंडली आणि दोडकाही घालता येतो.
२) जर अंबाडीचा पाला वापरणार असाल तर चिंचेचा कोळ घालू नकात अथवा चव पाहून अगदी कमी प्रमाणात घालावा.
३) मी अळूची पाने उकडून, बारीक वाटून घेतली होती. याचे कारण भाजी चांगली मिळून येते. पालेभाज्या नुसत्या बारीक चिरून इतर भाज्यांबरोबर फोडणीस घातल्या तरीही चालेल.
४) आंबट चवीच्या भाज्या आणि चिंच वापरायची नसेल तर भाजी तयार झाल्यावर उकळी काढताना, आंबटपणासाठी १ वाटी घट्ट ताक घालावे आणि थोडावेळ ढवळावे म्हणजे ताक फुटणार नाही.
५) भाजीला तूप-जिर्‍याची फोडणी घातली नाही तरीही चालते. कूकरमध्ये सर्व भाज्या फोडणीशिवाय शिजवाव्यात (वरील कृतीप्रमाणे). आणि भाजी सर्व्ह करताना १ टिस्पून तूप घालून सर्व्ह करावी.
६) भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त केले तरीही चालते.

Labels:
Rishi Panchami Bhaji, Rishi chi Bhaji, Ganapati Recipes