वाढणी: ३ सॅंडविचेस
वेळ:२० मिनिटे
६ ब्रेडचे स्लाईसेस
३ टेस्पून कांदा, उभा पातळ चिरून
३ टेस्पून भोपळी मिरची, उभे पातळ कप
१ टीस्पून चाट मसाला
३ टेस्पून हिरवी चटणी
१ टेस्पून बटर
स्टफिंग:::
७५ ग्राम पनीर, लहान चौकोनी तुकडे
१/२ टीस्पून जिरेपूड
२ ते ३ टेस्पून टोमॅटो केचप
चवीपुरते मीठ
कृती:
१) एका लहान बोलमध्ये टोमॅटो केचप, जिरेपूड आणि अगदी चिमुटभर मीठ घालून मिक्स करावे. यामध्ये पनीरचे तुकडे १० मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे.
२) पनीरचे तुकडे ग्रील करावे. जर ग्रील नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्या बटरवर किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे परतून घ्यावे. ग्रील केल्यावर पनीर बाजूला काढून ठेवावे.
३) ब्रेड स्लाईसेस वर बटर लावून घ्यावे. कमी आचेवर ब्रेड थोडे टोस्ट करून घ्यावे.
४) ३ ब्रेड स्लाईसेस वर हिरवी चटणी लावून घ्यावी. त्यावर पनीरचे तुकडे आणि भाज्या घालाव्यात. थोडा चाट मसाला भुरभुरावा. आता उरलेले ब्रेड स्लाईसेस घेउन त्यावर हिरवी चटणी लावावी. आणि पनीरच्या तुकड्यांवर ठेवून सॅंडविच तयार करावे.
५) सॅंडविचेस ग्रील करून घ्यावे किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर घालून दोन्ही बाजू मध्यम आचेवर टोस्ट करावे. जर नॉनस्टिक पॅन वापरणार असाल तर आच कमी ठेवावी. आणि २-३ मिनिटानी कालथ्याने हलकेच पलटावे. दुसरी बाजूही छान भाजून घ्यावी.
सॅंडविच हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.
टिपा:
१) जर लहान मुलांसाठी हि डिश बनवायची असेल तर कमी तिखट बनवावी किंवा फक्त कोथिंबीरीची मिरची न घालता चटणी बनवावी.
२) शक्यतो रेडीमेड पनीर वापरावे. रेडीमेड पनीर आच लागल्यावर पटकन वितळत नाही.
३) मॅरीनेशनमध्ये आवडीनुसार मसालेही घालू शकतो.
0 comments:
Post a Comment