Pages

Monday, 9 July 2012

तिखट मिठाच्या पुऱ्या - Tikhatmithachya Purya


वेळ: ३० मिनिटे
वाढणी: २० ते २२ मध्यम आकाराच्या पुऱ्या


साहित्य:
१ कप गव्हाचे पीठ (कणिक)
२ टेस्पून तांदुळाचे पीठ
२ टेस्पून बेसन
२ टीस्पून गरम तेल
१ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
१/४ टीस्पून हळद
चवीपुरते मीठ
पुऱ्या तळायला तेल

कृती:
१) मध्यम आकाराच्या वाडग्यात कणिक, बेसन, आणि तांदुळाचे पीठ एकत्र करावे. त्यात मीठ, लाल तिखट, धने-जिरेपूड आणि हळद घालून मिक्स करावे.
२) या मिश्रणात २ टीस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट पीठ मळावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
३) कढईत मंद आचेवर तेल गरम करायला ठेवावे. मधल्या वेळेत पीठाचे छोटे गोळे करावेत. या गोळ्यांच्या लाटून पुऱ्या कराव्यात. आच मिडीयम आणि हाय यांच्या मध्यावर आणावी. पुऱ्या दोन्ही बाजू पालटवून तळून घ्यावात.
४) पुरी तळताना ती फुलावी म्हणून पुरीवर  झाऱ्याने काळजीपुर्वक तेल उडवावे. पुरी सोनेरी रंगावर तळून घ्यावी.
पुरी तयार झाल्यावर बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवावी.
पुऱ्या गरम आणि गारही छान लागतात. २-३ दिवस टिकतात म्हणून प्रवासात न्यायलाही चांगला पर्याय आहे.

0 comments:

Post a Comment