Pages

Showing posts with label Party. Show all posts
Showing posts with label Party. Show all posts

Wednesday, 17 October 2012

व्हेजिटेबल क्रिस्पी - Veg Crispy


वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी


साहित्य:
भाज्या
१ मध्यम भोपळी मिरची, मोठे उभे तुकडे
१ मध्यम गाजर, पातळ चकत्या
१०० ग्राम पनीर, मोठे तुकडे
१ लहान कांदा, मोठे तुकडे आणि पाकळ्या वेगवेगळया कराव्यात
२ पातीकांद्याच्या काड्या
बॅटर
४ टेस्पून मैदा
६ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१ टीस्पून लसूण पेस्ट
१/२ टीस्पून मीठ
२ ते ३ चिमटी खायचा लाल रंग (किंवा गरजेनुसार)
२ चिमटी मिरपूड
इतर साहित्य
तळण्यासाठी तेल
१ टेस्पून तेल सॉस बनवण्यासाठी
२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आले पेस्ट
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१ लहान कांदा, बारीक चिरून
१ टेस्पून टोमॅटो केचप + १/२ टीस्पून सॉय सॉस + १ टेस्पून रेड चिली सॉस + १/४ कप पाणी
१/२ टीस्पून व्हिनेगर (किंवा आवडीनुसार)
१ टीस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टीस्पून मिरपूड
चवीपुरते मीठ

कृती:
१) "बॅटर" या लेबलखाली दिलेले सर्व साहित्य एका वाडग्यात घालून मिक्स करावे. [मैदा, कॉर्न फ्लोअर, लसूण पेस्ट, मीठ, खायचा लाल रंग, मिरपूड]. थोडे पाणी घालून घट्टसर पेस्ट बनवून घ्यावी. या बॅटरमध्ये भोपळी मिरची, गाजर, कांदा, आणि बेबीकॉर्न यांचे तुकडे घालून मिक्स करावे. सर्व भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवाव्यात.
२) भाज्या गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात. तळलेल्या भाज्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात. उरलेल्या बॅटरमध्ये पनीरचे तुकडे घोळवून तेही तेलात तळून घ्यावेत.
३) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. कांदा नीट परतावा.
४) कढईत टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, आणि १/४ कप पाणी घालावे. नीट ढवळावे. लागल्यास थोडे मीठ घालावे.
५) लहान वाटीत २ टेस्पून पाणी आणि १ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. कढईत घालून थोडे घट्टसर होवू द्यावे. मिनिटभर ढवळावे. त्यात व्हिनेगर घालावे.
६) आता यात तळलेल्या भाज्या आणि पनीर घालून १५-२० सेकंदच मिक्स करावे. वरून थोडी मिरपूड घालावी.
सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून चिरलेली कांद्याची पात घालून सर्व्ह करावे.

Tuesday, 21 August 2012

शाम सवेरा - Sham Savera

Sham Savera in English

वेळ: कोफ्त्यासाठी ४० मिनिटे | ग्रेव्हीसाठी ३० मिनिटे.
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
कोफ्त्यासाठी
१ मोठी जुडी पालक
४ ते ५ टेस्पून बेसन
३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून
१/२ टीस्पून जिरेपूड
चवीपुरते मीठ
१ कप किसलेले पनीर
१/४ टीस्पून वेलचीपूड
कोफ्ते तळण्यासाठी तेल
२ टीस्पून तेल
२ टेस्पून कॉर्न स्टार्च
माखनी ग्रेव्हीसाठी
५ मोठे टोमॅटो, लालभडक आणि पूर्ण पिकलेले
१ टीस्पून गरम मसाला
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून काश्मिरी लाल तिखट किंवा लहान चिमटी खायचा लाल रंग
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून कसूरी मेथी
१/२ टीस्पून जिरेपूड
२ टीस्पून लिंबाचा रस (टीप २ पहा)
१/४ ते १/२ कप क्रीम किंवा फेटलेली साय
चवीपुरते मीठ
२ टेस्पून बटर
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार (ऐच्छिक)

कृती:
माखनी ग्रेव्ही:
1) टोमॅटो मायक्रोवेव्हसेफ मोठ्या भांड्यात ठेवून त्यात टोमॅटो बुडतील इतपत पाणी घालावे. ५ ते ६ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये शिजवा. पाणी काढून टोमॅटो मिक्सरमध्ये वाटावे. गाळून त्यातील साले आणि बिया काढून टाकाव्यात.
२) पॅनमध्ये बटर गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे. १०-१५ सेकंद परतून त्यात टोमॅटो प्य्रुरी, धने-जिरेपूड, कसुरी मेथी, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. १० मिनिटे कमी आचेवर शिजवावे. मध्येमध्ये तळापासून ढवळा.
३) टोमॅटोचा कच्चा वास गेला कि गॅस बंद करा. ग्रेव्ही १-२ मिनिटे निवळू द्यावी. नंतर मिक्सरमध्ये हि ग्रेव्ही घालावी. ब्लेंड करावी. ब्लेंड करताना थोडे थोडे हेवी क्रीम घालत ब्लेंड करावे. ग्रेव्ही साधारण १ ते २ मिनिटे ब्लेंड करावी.
४) गुळगुळीत वाटलेली ग्रेव्ही पुन्हा पॅनमध्ये घालावी. साखर घालावी. मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावी.
कोफ्ते:
१) पालकाची पाने खुडून स्वच्छ धुवावीत. एक मोठे थंडगार पाण्याने भरलेले भांडे तयार ठेवावे. एक मोठे खोलगट पातेले घ्यावे. त्यात ३ ते ४ लिटर तरी पाणी उकळावे. या उकळत्या पाण्यात पालकाची पाने घालावीत. २ मिनिटे उकळी काढावी. चाळणीवर ओतून गरम पाणी काढून टाकावे आणि पाने थंड पाण्यात घालावी. म्हणजे रंग छान टिकून राहतो आणि गार पाण्यात शिजण्याची प्रोसेस थांबते. नंतर पालकाचे पाने दोन्ही हातात दाबून त्यातील पाणी काढून टाकावे..
२) कढईत २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात जिरे आणि मिरचीचा ठेचा घालावा. यात बेसन घालून रंग खुलून येईस्तोवर परतावे. यावेळी बेसनाचा छानसा सुगंध येईल. यात चिरलेली पालकाची पाने घालावीत. मीठ घालून मिक्स करावे. मिश्रण कोरडे आणि घट्टसर होईस्तोवर परतावे.
३) एका दुसऱ्या वाडग्यात पनीर, वेलची पूड, आणि मीठ असे मिक्स करावे.
४) पनीर आणि पालकाचे मिश्रण ६-६ समान भागात विभागून घ्यावे. पालकच्या मिश्रणाचा एक भाग घेउन हातावर पसरवून पारी तयार करावी (काळजीपूर्वक करावे. खूप पातळ करू नये, थोडे जाडसर ठेवावे.) त्याच्या मध्यभागी पनीरचे मिश्रण ठेवावे. आणि पालकाची पारी बंद करून गोळा तयार करावा. असे सर्व ६ कोफ्ते बनवून घ्यावे. हे कोफ्ते कॉर्न स्टार्चमध्ये घोळवून घ्यावेत. हातावर हलकेच धक्क्याने अधिकचे पीठ काढून टाकावे.
५) हे कोफ्ते गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावे. गोल्डन ब्राउन रंग येईस्तोवर तळावे. हे कोफ्ते धारदार सुरीने मधोमध कापावे.
६) सर्व्हिग प्लेटमध्ये गरम केलेली ग्रेव्ही घालावी. त्यावर कोफ्त्याचा पांढरा भाग वर येईल असे ठेवावे. पुलाव, जीरा राईस किंवा नान, रोटी अशा पंजाबी पद्धतीच्या इंडिअन ब्रेडबरोबर सर्व्ह करावी.

टीपा:
१) थोडीशी साखर घातल्याने हलकिशी गोड चव येते आणि ती चांगली लागते.
२) टोमॅटो जर आंबट असतील तर लिंबाचा रस घालू नये किंवा कमी घालावा.
३) लिंबाच्या रसाऐवजी चिमूटभर सायट्रिक acid छान लागते.
४) काजूची १/४ कप घट्ट पेस्ट घातल्यास चव छान येते आणि घट्टपणाही येतो.

from: www.sanjeevkapoor.com

Tuesday, 24 July 2012

काजूची उसळ - Kaju Usal


वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
पाव किलो ओले काजू
वाटण = २ टेस्पून ताजा नारळ + १/४ कप कोथिंबीर + २ ते ३ टेस्पून पाणी
१ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
२ टीस्पून तेल
फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद
१ टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ टीस्पून चिरलेला गूळ
चवीपुरते मीठ

कृती:
१) ओले काजू वापरत असाल तर साले काढून टाकावीत. जर ओले काजू नसतील तर वाळवलेले काजू कोमट पाण्यात ८ ते १० तास भिजत घालावेत.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात काजू, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करावे. आच मंद ठेवावी. झाकण ठेवून ५ मिनिटे काजू शिजू द्यावेत. कढईत तळाला काजू चिकटू नयेत म्हणून एक-दोनदा ढवळा.
३) ५ मिनिटानी नारळ-कोथिंबीर पेस्ट आणि चिंचेचा कोळ घालावा. २ मिनिटे परतून त्यात काजू बुडतील इतपत पाणी घालावे. झाकण ठेवून काजू शिजू द्यावेत. पाणी जर आटले तर अजून थोडे पाणी घालावे.
४) काजू शिजले कि त्यात गूळ घालून २-३ मिनिटे मंद आचेवर उकळी काढावी.
काजूची उसळ पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.

Friday, 6 July 2012

पालक राईस - Palak Rice

Spinach Rice in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी

spinach rice, palak rice, Healthy spinach riceसाहित्य:
३/४ कप बासमती तांदूळ
१ ते दिड कप बारीक चिरलेली पालकाची पाने + १/२ कप पाणी
३/४ कप गरम पाणी
१ टेस्पून बटर
१ टिस्पून बारीक चिरलेले आले
१ टिस्पून बारीक चिरलेले लसूण
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ लहान हिरवी मिरची
आख्खे गरम मसाले - २ तमालप्रत्र, १ हिरवी वेलची, २ लवंगा
चवीपुरते मिठ

कृती:
१) तांदूळ साध्या पाण्यात १० मिनीटे भिजवून ठेवावा. १० मिनीटांनी पाणी काढून टाकावे. आणि हा तांदूळ १० मिनीटे निथळत ठेवावा.
२) १/२ कप साधं पाणी आणि पालक एकत्र करून बारीक प्युरी करून घ्यावी.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये १ टेस्पून बटर किंवा तूप गरम करावे. त्यात जिरे आणि आख्खे मसाले घालावे. ५ ते १० सेकंद परतून आले-लसूण आणि मिरची घालावी. कांदा घालून परतावा.
४) निथळत ठेवलेला तांदूळ आता घालून व्यवस्थित कोरडा होईस्तोवर परतावा. सतत परतत राहा म्हणजे तांदूळ जळणार नाही. तांदूळ पूर्ण कोरडा झाला पाहिजे आणि व्यवस्थित भाजला गेला पाहिजे.
५) ३/४ कप गरम पाणी, मिठ आणि पालकाची प्युरी घालून मोठ्या आचेवर भात शिजू द्यावा. भाताच्या पृष्ठभागावर (सरफेस) पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच मिडीयम आणि लो च्यामध्यावर ठेवावी आणि पॅनवर झाकण ठेवावे. साधारण १० मिनीटे वाफ काढावी.
भात तयार झाला कि काट्याने (fork) हलकेच मोकळा करून घ्यावा. गरम भात रायते आणि पापडाबरोबर सर्व्ह करावा.

टीपा:
१) भात अधिक पौष्टिक बनवण्यासाठी मटार, गाजर, फरसबी अशा भाज्याही घालू शकतो.
२) तांदूळ चांगला भाजला गेल्याने भात मोकळा होतो. तसेच भात मोकळा होण्यासाठी गरम पाणी वापरावे आणि स्टेप क्र. ५ चे नक्की अवलंबन करावे.
३) लहान मुलांना हा भात नक्की आवडेल. वाटल्यास मिरची घालू नये.

Thursday, 3 May 2012

राजमा पुलाव - Rajma Rice


वेळ: ३५ ते ४० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
१/२ कप राजमा
१ कप बासमती तांदूळ
२ तमाल पत्र, २ लवंगा, २ वेलची
दीड टीस्पून गरम मसाला
२ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ टीस्पून आले पेस्ट
१ टीस्पून लसूण पेस्ट
२ टेस्पून तूप
१/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
चवीपुरते मीठ
१/४ कप कोथिंबीर, बारीक चीरून

कृती:
१) राजमा ७ ते ८ तास पाण्यात भिजत घालावा. प्रेशर कुकरमध्ये राजमा २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावा. शिजवताना थोडे मीठ घालावे. राजमा अख्खा राहिला पाहिजे पण शिजलाही पाहिजे.
२) तांदूळ पाण्यात १० मिनिटे भिजवावा. त्यातील पाणी निथळून टाकावे. तेल गरम करून त्यात तमाल पत्र, लवंगा, आणि वेलची परतून घ्यावी. निथळलेला तांदूळ घालून कोरडा होईस्तोवर परतावा. तांदूळ परतताना दुसऱ्या स्टोव्हवर २ कप पाणी गरम करावे.
३) तांदूळ चांगला भाजला गेला कि त्यात गरम पाणी घालावे. तांदुळाच्या वरती पाणी दिसायचे कमी झाले कि आच लगेच मंद करावी आणि झाकण ठेवून वाफेवर भात शिजवावा. मध्ये फक्त एकदा किंवा दोनदा हलकेच तळापासून ढवळावे. भात शिजला कि राजमा करी बनवेस्तोवर बाजूला काढून ठेवावा.
४) कढईत १ टेस्पून तूप गरम करावे त्यात हळद, लाल तिखट आणि आलेलसूण पेस्ट घालून परतावे. कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावा. टोमॅटो आणि मीठ घालून पूर्ण मऊ होईस्तोवर परतावे.
५) शिजवलेला राजमा आणि लागल्यास १/४ कप पाणी घालावे. थोडावेळ उकळी काढून गरम मसाला घालावा. ग्रेव्ही घट्टसर झाली पाहिजे कारण नंतर ती भातात घालायची आहे.
६) ग्रेव्ही घट्ट झाली कि त्यात भात घालून मिक्स करावे (टीप). झाकण ठेवून मंद आचेवर वाफेवर भात शिजवावा, साधारण ५ ते ८ मिनिटे. यामुळे ग्रेव्हीचा स्वाद भातात चांगला मुरेल.
कोथिंबीरिने भात सजवून रायत्याबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) कधीकधी टोमॅटो आतून पोकळ असला कि ग्रेव्ही कमी बनते. त्यामुळे भाताचे आणि ग्रेव्हीचे प्रमाण चुकू शकते. अशावेळी भात बेताबेतानेच घालावा आणि ग्रेव्हीमध्ये मावेल इतकाच भात घालावा.

Monday, 23 April 2012

ढोकळा - Dhokla

Dhokla in English

वेळ: ३० मिनिटे (फार्मेन्टेशनचा वेळ वगळून)
वाढणी: १५ ते १७ मध्यम तुकडे

साहित्य:
१ कप बेसन
३ टेस्पून रवा
१/२ कप दही, फेटलेले
१/२ कप पाणी (कदाचित १/४ कप पाणी जास्त लागू शकेल)
१/२ टीस्पून किसलेले आले, १/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, चिमटीभर सायट्रिक आम्ल (टीप २)
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
फोडणी आणि साखर-लिंबाचे पाणी::::
२ टीस्पून तेल, १/२ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हळद, १/८ टीस्पून हिंग, २ टेस्पून साखर, १/४ कप पाणी, १ लिंबाचा रस

कृती:

१) एक खोलगट मध्यम आकाराचे बोल घ्यावे. त्यात पाणी आणि दही घालून मिक्स करावे. बेसन आणि रवा घालून गुठळी न होता मिक्स करावे. दाटसर मिश्रण बनवावे. (कंसीस्टन्सी वडे-भाजीच्या पिठापेक्षा थोडे दाट हवे.)
२) हे भांडे झाकून उबदार ठिकाणी ठेवावे. मिश्रण किमान १० ते १२ तास आंबू द्यावे.(थंडीमध्ये पीठ आंबायला जास्त वेळ लागतो. माझ्याघरी पीठ आंबायला साधारण २० तास लागले.)
३) पीठ आंबले कि त्यात किसलेले आले, मिरची पेस्ट, मीठ आणि चिमटीभर सायट्रिक आम्ल घालावे. मिक्स करावे.
४) ढोकळा वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करावे. पाण्याची पातळी तळापासून २ इंच ठेवावी. ढोकळा प्लेट्सना आतून आणि कडेला तेलाचा हात लावून घ्यावा.
५) पाणी उकळायला लागले कि ढोकळा मिश्रणात बेकिंग सोडा घालावा आणि ढवळावे. मिश्रण फसफसेल. लगेच मिश्रण ग्रीस केलेल्या प्लेट्समध्ये घालावे. ढोकळा स्टॅंड स्टीमरमध्ये ठेवावा. झाकण लावून मोठ्या आचेवर १० ते १२ मिनिटे स्टीम करावा.
६) गॅस बंद करून  ७ ते ८ मिनिटे कुकरची वाफ जिरू द्यावी. कुकर उघडून ढोकळा थोडा गार होईस्तोवर ठेवावा. कडेने सुरी फिरवून घ्यावी. आणि अलगद ढोकळा थाळीमध्ये काढावा.
७) लहान कढले घ्यावे. त्यात तेल गरम करून मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी एका मध्यम वाटीत काढून ठेवावी. त्यात १/४ कप पाणी, लिंबू रस, आणि साखर घालून मिक्स करावे. थोडे मीठही घालावे. मिश्रण थोडे गोड झाले पाहिजे. त्यानुसार वाटल्यास थोडी साखर घालावी.
८) ढोकळा गार झाला कि त्यावर फोडणीचे साखर-लिंबाचे पाणी घालावे. हे पाणी ढोकळ्यात काही मिनिटे मुरू द्यावे.
ढोकळ्यावर चिरलेली कोथिंबीर आणि ताजा खोवलेला नारळ घालून सजवावे. ढोकळा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.

टिप्स:
१) ढोकळा अगदी बाहेरच्या सारखा दिसण्यासाठी ढोकळ्याच्या पिठात अगदी लहान चिमटी खायचा पिवळा रंग घालू शकतो. रंगासाठी हळद घालू नये. हळद आणि बेकिंग सोडा एकत्र केल्याने ढोकळ्याचा रंग लाल दिसतो.
२) सायट्रिक आम्ल घातल्याने ढोकळ्याला किंचित आंबट चव येते. थंडीमुळे माझ्याकडचे पीठ १०० % आंबले नव्हते आणि आंबल्यामुळे जो आंबटपणा येतो तो हवा तेवढा आला नव्हता. म्हणून मी सायट्रिक आम्ल घातले होते. पीठ व्यवस्थित आंबले असेल तर सायट्रिक आम्लाची गरज नाही.

Thursday, 29 March 2012

व्हेजिटेबल पुलाव - Vegetable Pulao

Vegetable Pulao in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

vegetable pulao, pulav recipe, how to make vegetable pulaoसाहित्य:
१ कप बासमती तांदूळ
पावणे दोन कप गरम उकळते पाणी
३/४ कप गाजर, लहान चौकोनी तुकडे
३/४ कप मटार
१/४ कप फरसबी, एक इंचाचे तुकडे
२ टेस्पून तूप
१ टेस्पून काजू बी
२ तमालपत्र, २ वेलची, २ लवंगा
१ हिरवी मिरची, उभी चिरून
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मीठ

कृती:
१) तांदूळ धुवून ५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. पाणी निथळू द्यावे आणि १०-१५ मिनिटे तसाच ठेवावा.
२) खोलगट नॉनस्टिक पातेले घेउन त्यात तूप गरम करावे. तमालपत्र, लवंग, आणि वेलची घालून ८-१० सेकंद परतावे. नंतर हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि काजू घालून परतावे.
३) निथळलेला तांदूळ घालून मिडीयम-हाय आचेवर कोरडा होईस्तोवर परतावा, साधारण ५ ते ७ मिनिटे. नंतर फरसबी, गाजर आणि मटार घालून १-२ मिनिटे परतावे.
४) आता उकळते पाणी घालावे. मीठ घालावे आणि ढवळावे. मोठ्या आचेवर उकळी येउ द्यावी. सुरुवातीला झाकण ठेवू नये.
५) काही मिनिटातच भाताच्या पृष्ठभागावर पाणी कमी होईल. तेव्हा लगेच आच एकदम मंद करावी आणि झाकण ठेवून वाफ काढावी. वाफेवर भात शिजू द्यावा. ३-४ मिनीटांनी एकदा असे हलकेच भात तळापासून ढवळावा. शिते मोडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. साधारण १५ मिनिटे वाफ काढावी.
गरम पुलाव टोमॅटो सूपबरोबर सर्व्ह करावा.

टीपा:
१) पुलाव भातात आवडीनुसार भाज्या घालू शकतो. पण शक्यतो गाजर, मटार आणि फरसबी असावीच. तसेच फक्त एकच भाजी वापरून जसे फक्त गाजर, किंवा फक्त मटार घालूनही पुलाव बनवता येतो.
२) तुपाचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करावे.

Thursday, 22 March 2012

व्हेजिटेबल कबाब - Vegetable Kebab

Vegetable Kabab in English

वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ जणांसाठी

vegetable kababसाहित्य:
३ मध्यम बटाटे, उकडलेले
१ मोठे गाजर, किसलेले
फरसबी १० शेंगा, बारीक चिरून
१/४ कप भोपळी मिरची, बारीक चिरून
१/४ कप मटार, उकडलेले
१/४ कप स्वीट कॉर्न, कॅनमधील
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
२ टीस्पून आलेलसूण पेस्ट
दीड टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
१ टेस्पून हिरवी मिरची पेस्ट
चवीपुरते मीठ
२ ते ३ टेस्पून तेल, कबाब शेकण्यासाठी
४ ते ५ स्क्युअर्स

कृती:
१) नॉनस्टिक पॅन गरम करून त्यात १ टीस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. नंतर त्यात फरसबी आणि गाजर घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे.
२) एका लहान वाटीत कॉर्न स्टार्च आणि २ टेस्पून पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. निट मिक्स करून पॅन वर झाकण ठेवावे. काही मिनिटे शिजू द्यावे.
३) नंतर मीठ, मटार आणि स्वीट कॉर्न घालावे. ३-४ मिनिटे शिजवून गॅस बंद करावा.
४) बटाटे सोलून कुस्करून घ्यावे. त्यात कोथिंबीर, लाल तिखट, हिरवी मिरची आणि मीठ घालावे. यामध्ये शिजवलेले भाज्यांचे मिश्र घालावे. हे मिश्रण ४ ते ५ समान भाग करावे.
५) मिश्रणाचा एक मध्यम गोळा घ्यावा. स्क्युअरच्या भोवती घट्ट चेपून लावावा. कबाब तयार करावेत. प्रत्येक कबाबवर तेल लावावे.
६) नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडे तेल लावावे. मध्यम आचेवर कबाब भाजून घ्यावे. दर २-३ मिनीटांनी कबाब थोडे फिरवावेत. अशाप्रकारे सर्व बाजूनी कबाब खरपूस भाजून घ्यावे.
कबाब गरमागरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना कांद्याच्या चकत्या, टोमॅटोच्या चकत्या यांवर थोडे लिंबू पिळून आणि मीठ भुरभुरून द्यावे.

Friday, 16 March 2012

मालपुवा - Malpuva

Malpua in English

वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: ८ ते १० मालपुवे


indian sweet, malpua, north indian sweetसाहित्य:
मालपुवाची धिरडी
१ कप मैदा
३/४ कप खवा
२ टेस्पून रवा
१ चिमुटभर बेकिंग सोडा
दीड कप दुध (रूम टेम्प.)
१ चिमटी मीठ
२ चिमटी बडीशेप
१/२ कप तूप
साखर पाक
१ कप साखर
१ कप पाणी
१ टीस्पून वेलचीपूड
१ चिमटी केशर
सजावटीसाठी
२ टेस्पून पिस्ते, भरडसर चिरलेले
केशर

कृती:
१) एक मध्यम वाडगे घ्यावे. त्यात मैदा, खवा, दुध, आणि मीठ घालून मिक्स करावे. मिश्रण एकदम स्मूथ व्हावे म्हणून मिक्सरमध्ये १०-१५ सेकंद फिरवावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यात बडीशेप घालून मिक्स करावे. मिश्रणाची कान्सीस्टन्सी इडलीच्या पिठाइतपत पातळ हवी. खूप घट्ट नको आणि एकदम पाणीसुद्धा नको.
२) साखरेचा पाक बनवण्यासाठी साखर, केशर आणि पाणी एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावे. ५ ते ६ मिनिटे मोठ्या आचेवर उकळी काढावी. पाकात चमचा बुडवून लहान ठिपका एका प्लेटमध्ये टाकावा. हा ठिपका ४-५ सेकंदातच हाताळण्यायोग्य होईल. अंगठा आणि पहिले बोट यात पाक धरून उघडझाप करा. आणि एक तार आली तर पाक तयार झाला असे समजावे. जर तार आली नाही तर अजून २-३ मिनिटे उकळी काढावी.
३) साखरेचा पाक तयार झाला कि एकदम मंद आचेवर हा पाक ठेवून द्यावा. गॅस बंद करू नये. पाक थोडा कोमट राहू द्यावा.
४) पाक तयार झाला कि लगेच धिरडी घालायला घ्यावीत. मिश्रणात बेकिंग सोडा घालून मिक्स करावे.
५) एक लहान फ्रायिंग पॅन गरम करून त्यात १ टेस्पून तूप घालावे. तूप वितळले कि एक डावभर मिश्रण घालून पातळसर धिरडे घालावे. मिडीयम-हाय फ्लेमवर दोन्ही बाजूनी लालसर शेकून घ्यावे.
६) तयार धिरडे गरम असतानाच पाकात घालावे. २ मिनिटे पाक मुरावायला ठेवावे. तयार मालपुवा प्लेटमध्ये काढून पिस्ता, केशर घालून लगेच सर्व्ह करा.
अशाप्रकारे सर्व मालपुवे तयार करा.

टीपा:
१) मालपुवा गरम असतानाच खावा. थंड झाल्यावर चव एकदम उतरते आणि पाक शोषल्याने मालपुवा फुगतो.
२) मी मालपुवा शालो फ्राय केला होता. पण मालपूवे भरपूर तुपात बनवतात. तुम्हाला आवडीप्रमाणे तूप कमी जास्त करता येईल. पण एकदम कमी तूपातही मालपुवा चांगला लागत नाही.
३) मालपुवा तूपतच बनवा, तेलात बनवू नका. तूपाऐवजी चालत असल्यास डालडामध्येही बनवू शकता.
४) मालपुवे पातळ बनवा. जाड मालपुवे वाईट लागत नाहीत पण पातळ असले कि जास्त छान लागतात.

Tuesday, 13 March 2012

बेबी कॉर्न मंचुरियन - Baby Corn Manchurian

Baby Corn Manchurian in English

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

how to make baby corn manchurianसाहित्य:
२० बेबी कॉर्न
१/४ कप भोपळी मिरची, उभे पातळ काप
१/४ कप कांदा, उभे पातळ काप
३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
२ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आले पेस्ट
१ टीस्पून सॉय सॉस
१ टीस्पून व्हिनेगर
२ टीस्पून तेल + तळण्यासाठी तेल
चवीपुरते मीठ
२ टेस्पून पाती कांद्याची पात, बारीक चिरून

कृती:
१) एक लहान वाडगे घ्यावे. त्यात २ टेस्पून कॉर्न फ्लोअर आणि थोडेसे पाणी घालावे. पातळसर पेस्ट करावी. थोडेसे मीठ घालून मिक्स करावे.
२) बेबी कॉर्नचे १ इंचाचे तुकडे करावे. कॉर्न फ्लोअर पेस्टमध्ये हे तुकडे घालावे. तळणीसाठी तेल गरम करावे. त्यात बेबी कॉर्नचे तुकडे तळून घ्यावे.
३) मध्यम पॅन घेउन त्यात २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालावी. कांदा आणि भोपळी मिरची घालून दोनेक मिनिटे परतावे. १/४ कप पाणी, सॉय सॉस आणि थोडे मीठ घालावे
४) एका लहान वाटीत २ टेस्पून पाणी आणि १ टेस्पून कॉर्न फ्लोअर घालुन पेस्ट बनवावी. हि पेस्ट हळूहळू पॅनमध्ये घालावी आणि मिक्स करावे, गुठळ्या होवू देउ नयेत. यामुळे सॉस थोडा घट्ट होईल. आता तळलेले बेबी कॉर्न घालून मिक्स करावे. व्हिनेगर घालावे. बेबी कॉर्न सॉसने व्यवस्थित कोट झाले पाहिजेत.
बेबी कॉर्न मंचुरियन सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून पाती कांद्याने सजवावे आणि गरमच सर्व्ह करावे.

Wednesday, 7 March 2012

चिली गार्लिक टोफू - Chili Garlic Tofu

Chili Garlic Tofu in English

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी

schezwan tofu, chili garlic tofuसाहित्य:
५ औंस फर्म टोफू (साधारण १०-१२ मध्यम तुकडे )
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
४ टीस्पून तेल
१ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आले पेस्ट
२ टीस्पून चिली गार्लिक पेस्ट
१/४ कप पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून
१/४ कप कांदा, मध्यम आकाराचे तुकडे (कांद्याच्या पाकळ्या विलग करा)
१/४ कप भोपळी मिरची, मध्यम तुकडे
१ टीस्पून सॉय सॉस
१/२ टीस्पून व्हिनेगर
चवीपुरते मीठ

कृती:
१) टोफू हलक्या हाताने प्रेस करून त्यातील थोडे पाणी काढून टाकावे. खूप जास्त प्रेस करू नये त्यामुळे टोफू कुस्करला जाउ शकतो. टोफूचे १ इंचाचे तुकडे करावेत. त्यावर कॉर्न स्टार्च भुरभुरावा. आणि हलकेच मिक्स करावे.
२) एक मध्यम पॅन घेउन त्यात १ टेस्पून तेल घालावे. त्यात टोफू शालो-फ्राय करून घ्यावा. सर्व बाजू थोड्या ब्राउन करून घ्यावात. शालो फ्राय करून झाले कि टोफू प्लेटमध्ये काढून ठेवावा.
३) त्यात पॅनमध्ये अजून १ टीस्पून तेल घालावे. त्यात आले लसूण पेस्ट परतावी. सॉय सॉस, भोपळी मिरची आणि कांदा घालून एक मिनिटभर परतावे. मीठ घालावे. कांदा आणि भोपळी मिरची क्रिस्पी राहिल्या पाहिजेत.
४) १ टीस्पून कॉर्न स्टार्च आणि ३ ते ४ टेस्पून पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. चिली गार्लिक पेस्ट आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करावे.
५) आता शालो फ्राय केलेला टोफू घालावा. हलकेच मिक्स करून मिनिटभर शिजवावे. प्लेटमध्ये सर्व्ह करावे. सर्व्ह करताना पाती कांद्याची चिरलेली पात घालून सजवावे.

टीपा:
१) वरील रेसिपी ड्राय टोफूची आहे. थोडी ग्रेव्ही हवी असेल १ टेस्पून कॉर्न स्टार्च १/२ कप पाण्यात घालून मिक्स करावे. आणि स्टेप ४ मध्ये चिली गार्लिक पेस्टसोबत हे मिश्रणही घालावे. बाकी सर्व कृती सेम. या ग्रेहीबरोबर थोडा पांढरा भातही सर्व्ह करू शकतो.
२) वरील रेसिपीसाठी "फर्म टोफू" च वापरावा. इतर टोफू एकदम मऊ असतात आणि फ्राय करता येत नाहीत.

Tuesday, 24 January 2012

गोटा भजी - Gota Bhaji Methi Gota

Gota Bhaji in English
वेळ: २५ ते ३० मिनीटे
साधारण १५-१८ मध्यम भजी

gujarati gota bhaji, methi gotaसाहित्य:
१/२ कप बेसन (टिप १)
१/२ कप मूगडाळ पीठ (टिप १)
१/४ कप कसुरी मेथी
१ टेस्पून लसूण पेस्ट
१/२ कप दही किंवा लागेल तेवढे
मसाले: २ लवंगा, २ चिमटी दालचिनी पावडर, १ टीस्पून अख्खे धणे, २ टीस्पून जिरे, ७-८ मिरी दाणे- सर्व कुटून भरडसर पावडर करावी.
२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
२ टीस्पून साखर
१/८ टीस्पून बेकिंग सोडा
चवीपुरते मीठ
गोटे तळण्यासाठी तेल

कृती:
१) एका खोलगट भांड्यात बेसन, मूगडाळ पीठ, कसुरी मेथी, लसूण पेस्ट, मसाला पावडर, लाल तिखट, हिंग, हळद, साखर आणि मीठ मिक्स करावे. यामध्ये दही घालून मिक्स करावे आणि दाटसर, चिकट असे पीठ भिजवावे. मिश्रणाचा कणकेसारखा गोळाही भिजला नाही पाहिजे आणि एकदम पातळही नाही असे पीठ भिजवावे. भजी करायच्या थोडा वेळ आधी सोडा घालून मिक्स करावे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की गॅस मिडियम-हायच्यामध्ये ठेवावा. हाताला तेल लावून चमचाभर मिश्रण हातात घ्यावे त्याचा गोळा बनवावा आणि तेलात सोडावा. अशाप्रकारे सर्व गोटा भजी तळून घ्यावी.
भजी हिरवी किंवा चिंच चटणीबरोबर सर्व्ह करावी.

टिप्स:
१) बेसन आणि मूगडाळ यांचे रवाळ पीठ मिळाल्यास भाजी जास्त चांगली होईल.
२) जर मिश्रणाचा कणकेसारखा गोळा बनवून त्याची भजी केल्यास आतून गच्च आणि कच्ची राहते. आणि मिश्रण गरजेपेक्षा पातळ झाल्यास गोल गोटे बनत नाहीत. म्हणून मिश्रण चिकट्‌सर घट्ट बनवावे. आणि पीठ हाताळताना हातांना तेल लावावे. नाहीतर मिश्रण हातालाच चिकटेल.
३) कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो. पण आवडत असल्यास फ्रेश मेथीची पानेसुद्धा बारीक चिरून घालू शकतो.

Thursday, 19 January 2012

पिटा ब्रेड पिझ्झा - Pita bread Pizza

Pita Bread Pizza in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

veggie pizza, quick pizza recipe, pita bread pizzaसाहित्य:
पिटा ब्रेड
१/२ कप पिझ्झा सॉस
१ लहान कांदा, गोल चकत्या करून त्या सोडवून रिंग्स कराव्यात
१ लहान भोपळी मिरची, पातळ उभे काप
५-६ मश्रूम्स, पातळ काप
२ टेस्पून स्वीट कॉर्न, उकडलेले
१ कप मोझेरेला चीज, किसलेले
१/२ टीस्पून रेड चिली फ्लेक्स
१/४ टीस्पून इटालियन सिझनिंग
२ टीस्पून ऑलिव्ह ऑइल
चवीपुरते मीठ

कृती:
१) ओव्हन ४०० F वर १० मिनिटे प्रीहीट करावे
२) एक पॅन गरम करून त्यात एक टीस्पून ऑलिव्ह ऑइल घालून त्यात कांदा, भोपळी मिरची, मश्रूम्स, आणि स्वीट कॉर्न घालून १ मिनिट परतावे. त्यावर थोडे रेड चिली फ्लेक्स, मीठ आणि इटालियन सिझनिंग घालावे. मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून ठेवावे.
३) पिटा ब्रेडला थोडे ऑलिव्ह ऑइल ब्रश करून घ्यावे. पिटा ब्रेड बेकिंग शीटवर ठेवून ओव्हनमध्ये २-३ मिनिटे गरम करून घ्यावे.
४) बाहेर काढून त्यावर पिझ्झा सॉस लावावा. प्रत्येक पिटा ब्रेडवर साधारण ४ ते ६ टेस्पून चीज घालून त्यावर परतलेल्या भाज्या घालाव्यात.
५) पिटा ब्रेड ओव्हनमध्ये ठेवून साधारण ८ मिनिटे बेक करावे किंवा चीज वितळून लाईट ब्राउन झाले कि बाहेर काढावे.
गरमच सर्व्ह करावे.

टीपा:
१) आपल्या आवडीनुसार दुसरी टॉपिंग्जसुद्धा वापरू शकतो. जसे अननसाचे छोटे तुकडे, ब्लॅक ऑलिव्ज, अल्पिनो पेपर्स, ब्रोकोली इत्यादी.

Wednesday, 11 January 2012

पनीर टोस्ट सॅंडविच - Paneer Toast Sandwich

Paneer Sandwich in English

वाढणी: ३ सॅंडविचेस
वेळ:२० मिनिटे

paneer sandwich, grilled paneer sandwich, paneer toast sandwich, paneer quick snacks recipes, one dish meal recipes, quick snack recipesसाहित्य:
६ ब्रेडचे स्लाईसेस
३ टेस्पून कांदा, उभा पातळ चिरून
३ टेस्पून भोपळी मिरची, उभे पातळ कप
१ टीस्पून चाट मसाला
३ टेस्पून हिरवी चटणी
१ टेस्पून बटर
स्टफिंग:::
७५ ग्राम पनीर, लहान चौकोनी तुकडे
१/२ टीस्पून जिरेपूड
२ ते ३ टेस्पून टोमॅटो केचप
चवीपुरते मीठ

कृती:
१) एका लहान बोलमध्ये टोमॅटो केचप, जिरेपूड आणि अगदी चिमुटभर मीठ घालून मिक्स करावे. यामध्ये पनीरचे तुकडे १० मिनिटे मॅरीनेट करून ठेवावे.
२) पनीरचे तुकडे ग्रील करावे. जर ग्रील नसेल तर नॉनस्टिक पॅनमध्ये थोड्या बटरवर किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये थोडे परतून घ्यावे. ग्रील केल्यावर पनीर बाजूला काढून ठेवावे.
३) ब्रेड स्लाईसेस वर बटर लावून घ्यावे. कमी आचेवर ब्रेड थोडे टोस्ट करून घ्यावे.
४) ३ ब्रेड स्लाईसेस वर हिरवी चटणी लावून घ्यावी. त्यावर पनीरचे तुकडे आणि भाज्या घालाव्यात. थोडा चाट मसाला भुरभुरावा. आता उरलेले ब्रेड स्लाईसेस घेउन त्यावर हिरवी चटणी लावावी. आणि पनीरच्या तुकड्यांवर ठेवून सॅंडविच तयार करावे.
५) सॅंडविचेस ग्रील करून घ्यावे किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये थोडे बटर घालून दोन्ही बाजू मध्यम आचेवर टोस्ट करावे. जर नॉनस्टिक पॅन वापरणार असाल तर आच कमी ठेवावी. आणि २-३ मिनिटानी कालथ्याने हलकेच पलटावे. दुसरी बाजूही छान भाजून घ्यावी.

सॅंडविच हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

टिपा:
१) जर लहान मुलांसाठी हि डिश बनवायची असेल तर कमी तिखट बनवावी किंवा फक्त कोथिंबीरीची मिरची न घालता चटणी बनवावी.
२) शक्यतो रेडीमेड पनीर वापरावे. रेडीमेड पनीर आच लागल्यावर पटकन वितळत नाही.
३) मॅरीनेशनमध्ये आवडीनुसार मसालेही घालू शकतो.

Tuesday, 13 December 2011

पनीर जाल्फ्रेझी - Paneer Jalfrezi

Paneer Jalfrezi in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३

साहित्य:
२०० ग्राम पनीर, उभे लांबडे तुकडे
१ कप भोपळी मिरची, पातळ काप (मी तीनरंगी भोपळी मिरच्या वापरल्या होत्या. लाल, हिरवी आणि पिवळी)
१/२ काप कांदा, उभे पातळ काप
१ मध्यम टोमॅटो, मध्यम चिरून
१ टीस्पून आलं, बारीक चिरून
२ टीस्पून लसूण, बारीक चिरून
१/८ टीस्पून हळद
२ चिमटी जिरे
१ टीस्पून धनेपूड, हलकेच भाजून भरडसर पूड करावी
रेड चिली फ्लेक्स, आवडीनुसार (मी १ टीस्पून वापरली होती)
२ चिमटी गरम मसाला
१/२ टीस्पून व्हिनेगर
चिमूटभर साखर
१ टेस्पून + १ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ

कृती:
१) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. आच मध्यम ठेवावी. पनीर घालून कडा ब्राउन होईस्तोवर परतावे. नंतर पॅनमधून काढून प्लेटमध्ये काढून ठेवावे.
२) उरलेले १ टेस्पून तेल पॅनमध्ये घालावे. त्यात जिरे घालावे, चिरलेले आलं लसूण घालावे. हळद आणि कांदा घालावा. थोडे मीठ घालावे. कांदा मिनिटभर परतावा. टोमॅटो घालून ते मऊ होईस्तोवर परतावे.
३) आता भोपळी मिरच्या घालाव्यात आणि नीट मिक्स करावे. २ मिनिटे परतून पनीर घालावे. धनेपूड, गरम मसाला, साखर, व्हिनेगर, आणि रेड चिली फ्लेक्स घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे मीठ घालावे. नीट मिक्स करून लगेच सर्व्ह करावे.
जाल्फ्रेझी भाताबरोबर सर्व्ह करावे. तसेच अपेटायझर म्हणूनही सर्व्ह करू शकतो.

Thursday, 8 December 2011

दही बुत्ती - Dahi Butti

Dahi Butti in English

वेळ: १५ मिनिटे
२ ते ३ जणांसाठी

dahi bhat, curd rice, dahi butti, rice recipes, leftover rice recipesसाहित्य:
३/४ कप तांदूळ
३/४ ते १ कप दही
१/४ ते १/२ कप दुध
१ टीस्पून तूप, ३-४ कढीपत्ता पाने, २ सुक्या लाल मिरच्या, १/४ टीस्पून उडीद डाळ, २ चिमटी जिरे, २ चिमटी हिंग, १/४ टीस्पून आले
चवीपुरते मीठ

कृती:
१) तांदूळ धुवून त्यात दीड ते दोन कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा. मीठ घालू नये.
२) भात एका खोलगट वाडग्यात काढून घ्यावा. त्यात गार दुध घालावे. गार दुध घातल्याने भात लवकर थंड व्हायला मदत होते. मिश्रण गार झाले (अगदी किंचित कोमट असेल तरी चालेल) कि त्यात दही आणि मीठ घाला. गरम मिश्रणात दही घातल्यास उष्णतेमुळे दही फुटते.
३) कढल्यात तूप गरम करावे. त्यात आधी उडीद डाळ घालावी. गुलाबीसर झाली कि त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करावी. मिरच्या जर तुपात भिजत नसतील तर चमच्याने थोडा दाब द्यावा. आता गॅस बंद करावा आणि फोडणीत आले घालावे. मिक्स करून हि फोडणी दही-भातावर घालावी.
मिक्स करून सर्व्ह करावे.

टीपा:
१) आदल्या दिवशीचा भात वापरला तरीही चालतो. फक्त या भाताला कुकरमध्ये एक वाफ काढावी, शिट्टी करू नये. फक्त ५ मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी. आदल्या दिवशीच्या भाताची शिते थोडी तडतडीत होतात. अशा भाताची दही-बुत्ती चांगली लागत नाही.
२) या भातात थोडा गोडपणा देण्यासाठी १/२ टीस्पून साखर घालू शकतो.
३) दह्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकतो.

Thursday, 24 November 2011

चॉकोलेट ट्रायफल - Chocolate Trifle

Chocolate Trifle in English

वाढणी: ४
वेळ: १५ मिनिटे
chocolate trifle, chocolate dessert, black forest cakeसाहित्य:
२ कप चॉकोलेट केक किंवा चॉकोलेट ब्राउनीचा चुरा
२० चेरीज, अर्धे दोन भाग करून त्यातील बिया काढून टाकाव्यात
२ ते ३ टेस्पून साखर
१/४ कप पाणी
अडीच कप व्हीप्प्ड क्रीम
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून कोको पावडर (अनस्वीटन्ड)
मिल्क चॉकोलेट, किसलेले (सजावटीसाठी)

कृती:
साखर पाकातल्या चेरीज
१) एक लहान पॅन घ्या. त्यात साखर आणि पाणी घाला. मिक्स करून गॅसवर ठेवा.साखर विरघळेस्तोवर मिक्स करावे. चेरीज घालून मध्यम आचेवर शिजवावे. चेरीज मऊ होवून त्यातील रस निघायला लागला कि गस बंद करावा. ज्यूस गाळून एका वाटीत काढून घ्यावा. चेरीज दुसऱ्या लहान वाडग्यात काढून ठेवाव्यात.
चॉकोलेट फ्लेवर्ड व्हीप्प्ड क्रीम
२) मोठा बोल घेउन त्यात गार पाणी भरावे. अजून एक मध्यम आकाराचा बोल घेउन त्यात व्हीप्प्ड क्रीम, साखर, आणि कोको पावडर घालावे. हे बोल गार पाण्याच्या बोलवर तळ टेकेल असे धरावे. यामुळे क्रीम थंड राहील आणि वितळणार नाही. बोल अधांतरी ठेवावे आणि त्यात पाणी जाउ देवू नये. साखर विरघळेस्तोवर व्हिस्क करावे. मिक्स झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.

१ सर्व्हीग कप घ्यावा. त्यात तळाला केकचा एक थर द्यावा. त्यावर थोडे व्हीप्प्ड क्रीम पसरावे. त्यावर थोडे चेरीजचे तुकडे घालावे. परत केकचा, व्हीप्प्ड क्रीमचा आणि चेरीजचा लेयर द्यावा.
फायनली, परत एक केकचा थर आणि व्हीप्प्ड क्रीमचा लेयर द्यावा. वरती चेरी आणि किसलेले चॉकोलेट घालावे. अशाच प्रकारे बाकीचे सर्व्हिंग कप्स भरावे आणि लगेच सर्व्ह करावे.

टीप:
१) लागल्यास केकच्या लेयरवर चमचाभर चेरी शिजवल्यावर राहिलेले शुगर सिरप घालावे.

Sunday, 13 November 2011

गुलाबजाम - Ricotta cheese gulabjamun

Gulabjam in English

वेळ: पूर्वतयारी- ४५ ते ५० मिनिटे | पाकृसाठी- ३० मिनिटे
४० ते ४५ मध्यम गुलाबजाम

gulabjam, indian sweet, gulabjamunसाहित्य:
१ lb रिकोटा चीज (मी लाईट रिकोटा चीज वापरले होते)
३ टेस्पून मैदा
१ चिमटी बेकिंग सोडा
अडीच कप साखर
अडीच कप पाणी
२ ते ३ वेलची
१ चिमूट केशर
गुलाबजाम तळण्यासाठी तेल

कृती:
१) नॉनस्टिक पॅनमध्ये रिकोटा चीज घालावे आणि मध्यम आचेवर आटवावे. आटवताना सतत ढवळत राहावे म्हणजे पॅनला चिकटणार नाही. रिकोटा चीज घट्ट होउन गोळा बनेस्तोवर आटवावे. याला साधारण ३० ते ४० मिनिटे लागतील. आटले कि थंड होवू द्यावे.
२) २ चमचे मैदा आणि चिमूटभर बेकिंग सोडा आटवलेल्या आणि थंड झालेल्या रिकोटा चीज मध्ये घालावा. व्यवस्थित मऊसर मळून घ्यावे. लागल्यास एखाद टीस्पून पाणी घालावे. छान मऊसर मळून घ्यावे.
३) खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये साखर आणि पाणी घालावे. ५ मिनिटे उकळवावे. नंतर आच अगदी मंद करून ठेवावी. केशर आणि वेलची पूड घालावी.
४) मध्यम आचेवर तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याची लहान गोटीएवढ्या आकाराचे गोळे करून घ्यावे. या गोळ्यांना तडा गेलेल्या नसाव्यात. सरफेस एकदम प्लेन असावा.
५) तेलाचे तापमान तपासण्यासाठी एक लहान गोळा तेलात सोडावा. प्रथम गोळा तळाला बसला पाहिजे आणि ५ ते ८ सेकंदानी तेलावर तरंगला पाहिजे. जर तेलात टाकल्यावर गोळा एकदम पटकन वर आला आणि लालसर रंग चढला म्हणजे तेल जास्त तापले आहे [रंग पटकन चढला तर गुलाबजाम आतून कच्चे राहतात.]. अशावेळी आच थोडी कमी करावी आणि थोडावेळ थांबावे. नंतर गुलाबजाम तळावे.
६) तेलाचे तापमान अड़जस्ट झाल्यावर एकावेळी ८ ते १० गुलाबजामचे गोळे तळावेत. तळताना गुलाबजामचे गोळे झाऱ्याने सतत हलवत ठेवावे म्हणजे सर्वबाजूनी रंग सारखा येतो आणि सर्वत्र सारखे शिजतात.
७) गुलाबजामला लाल रंग येईस्तोवर तळावे. झाऱ्याने गुलाबजाम बाहेर काढावे आणि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे. २-३ मिनीटांनी गरम साखरेच्या पाकात घालावे.
८) अशाप्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यावे आणि तळून झाल्यावर २ मिनीटांनी पाकात घालावे.

गुलाबजाम किमान २ तास तरी पाकात मुरू द्यावे. रात्रभर मुरल्यास उत्तम.

टीपा:
१) कमीत कमी मैदा वापरावा. गरजेपेक्षा जास्त मैदा घातल्यास गुलाबजाम चिवट होतात आणि पाक आतापर्यंत मुरत नाही.
२) गुलाबजाम तळल्यावर २ मिनिटे पेपरवर काढून ठेवावे. तळल्या तळल्या लगेच पाकात घातले तर गुलाबजाम वर जे काही थोडेफार तेल असेल ते पाकात उतरते आणि पाकावर तेलाचा तवंग दिसतो. तसेच गुलाबजाम कडकडीत होतात.
३) रिकोटा चीज पासून खवा बनवणे थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे. पण या पद्दतीने बनवलेले गुलाबजाम मऊसूत बनतात. चव तर खव्याच्या गुलाबजामच्या एकदम जवळची बनते.
४) जर गुलाबजाम फुटले तर अगदी थोडा मैदा घालावा आणि मळून परत गुलाबजाम ट्राय करावेत.

Wednesday, 28 September 2011

चॉकोलेट ब्राउनी सिझलर - Brownie Sizzler

Chocolate Brownie Sizzler in English

वेळ: १५ मिनिटे
४ जणांसाठी

chocolate brownie sizzler, sizzler recipesसाहित्य:
४ चॉकोलेट ब्राउनीज
चॉकोलेट सॉससाठी:- १ मिल्क चॉकोलेटचा बार, १/२ कप दुध
वेनिला आईसक्रीम
सिझलर प्लेट आणि त्याच्याखालील लाकडी ट्रे
ड्राय फ्रुट्स (अक्रोड आणि बदामाचे काप)

कृती:
१) चॉकोलेट सॉससाठी आधी चॉकोलेट वितळवण्याची गरज आहे. चॉकोलेटचे मध्यम तुकडे करून काचेच्या बोलमध्ये ठेवून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. एग बिटरने ढवळावे. गरजेप्रमाणे १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. प्रत्येकवेळी ढवळून पहावे. कारण मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ आतून बाहेर असे कुक होतो. गरजेपेक्षा जास्त मायक्रोवेव्ह केल्यास चॉकोलेट करपेल.
२) एकदा चॉकोलेट वितळले कि त्यात दुध घालून जोरात ढवळावे आणि गुठळ्या राहू देवू नयेत. थोडे थोडे दुध घालावे आणि मिक्स करावे. स्मूथ आणि चकचकीत असा सॉस बनेस्तोवर फेटावे. (सॉस जितका पातळ हवा असेल त्याप्रमाणे दुध जास्त-कमी करावे.)
३) ब्राउनिज जर गर असतील तर १० ते १५ सेकंद मायक्रोवेव्ह कराव्यात. म्हणजे थोड्या कोमट होतील.
४) सिझलर प्लेट गॅसवर गरम करावी. व्यवस्थित गरम होवू द्यात. पक्कडीने काळजीपूर्वक हि प्लेट लाकडी ट्रे मध्ये ठेवावी. मधोमध ब्राउनिज ठेवाव्यात. प्रत्येक ब्राउनीवर एकेक स्कूप वेनिला आईसक्रीम घालावे. आणि वरून चॉकोलेट सॉस घालावा. हा सॉस सिझलर प्लेटवर ओघळला पाहिजे. म्हणजे तो छान सिझल होईल. वरून अक्रोड बदामचे तुकडे घालून गर्निश करावे आणि लगेच सर्व्ह करावे.

कसे खावे? - चमच्यात आईसक्रीम + ब्राउनी + चॉकोलेट सॉस हे तीन्हीचे छोटे चंक्स घेउन खावे.

टीपा:
१) चॉकोलेट सॉस सिझलर प्लेटवर चिकटू नये म्हणून प्लेट गरम करताना त्यावर अल्युमिनम फॉइलचा तुकडा ठेवावा. आणि त्यावर मग ब्राउनी, आईसक्रीम आणि चॉकोलेट सॉस घालावा.
२) चॉकोलेट ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर तुम्ही नोटीस कराल कि बाहेरून चॉकोलेट वितळले नाहीये. पण ढवळल्यावर लक्षात येईल कि आतून चॉकोलेट मेल्ट व्हायला लागले आहे. म्हणून पहिली ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर, ढवळून गरजेनुसार १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. आणि प्रत्येकवेळी ढवळून चेक करावे.
३) खाताना काळजीपूर्वक खावे. सिझलर प्लेटवर जो सॉस आहे तो प्रचंड गरम असतो. आणि जीभ पोळू शकते. म्हणून सॉस कितपत गरम आहे ते चेक करूनच खावे.

Saturday, 24 September 2011

मसाला टोस्ट सॅंडविच - Potato Masala Sandwich

Masala Toast Sandwich in English

वेळ: पूर्वतयारी- १५ मिनिटे | पाकृ साठी वेळ- १० मिनिटे
४ सॅंडविचेस

masala toast sandwich, masala sandwich, Indian sandwich recipe, potato masala sandwich, vegetable sandwichसाहित्य:
८ ब्रेडचे स्लाईस
२ ते ३ टेस्पून बटर, रूम टेम्परेचर
१/४ कप हिरवी चटणी
कांद्याचे पातळ गोल चकत्या
मसाला:
२ मोठे बटाटे, उकडलेले
३ टेस्पून हिरवे मटार (फ्रोझन)
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १/४ टीस्पून हळद
४ ते ५ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
दीड टीस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मीठ

कृती:
मसाला
१) बटाटे सोलून मॅश करून घ्यावेत. कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी.
२) हिरवी मिरची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालून १५ सेकंद परतावे. कांदा घालून परतावे आणि झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यावे. नंतर मटार घालून झाकण ठेवून मटार शिजू द्यावे.
३) मॅश केलेले बटाटे घालावे. मिक्स करावे आणि झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी.

४) ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर लावावे. बटर लावलेल्या ८ पैकी ४ स्लाईस घेवून त्याला चटणी लावावी.
५) चटणी लावलेल्या ब्रेडवर तयार मसाल्याचा पातळ लेयर लावून घ्यावा. त्यावर कांद्याची एक चकती ठेवावी. वरती बटर लावलेला ब्रेड स्लाईस ठेवून किंचित प्रेस करावे.
६) बाहेरून थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे. जर टोस्टर नसेल तर सॅंडविच तव्यावर भाजावे. भाजताना किंचित दाब देउन दोन्ही बाजू लाईट ब्राऊन होईस्तोवर भाजावे.

गरम सॅंडविच हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

टीपा:
१) शक्यतो व्हाइट ब्रेड वापरावा.
२) मसाला तिखटसरच असावा. कमी तिखट मसाला असेल तर सॅंडविच मुळमुळीत लागतं.
३) मसाला बनवताना कमीतकमी तेल वापरावे. मसाला तेलकट झाला तर सॅंडविच चांगले लागत नाही.
४) जर लहान मुलांसाठी बनवायचे असल्यास मिरची अगदी कमी घालावी किंवा घालू नये.
५) चटणीमध्ये पुदिना पानेही घालू शकतो.