Pages

Showing posts with label Sabudana. Show all posts
Showing posts with label Sabudana. Show all posts

Wednesday, 11 July 2012

साबुदाणा पीठाचे लाडू - Sabudana Flour Ladu


वेळ: ३० मिनिटे
१५ मध्यम लाडू

साहित्य:
१ कप साबुदाणा पीठ
३/४ कप साजूक तूप, वितळलेले
१/२ कप पिठी साखर
१/२ कप खारीक पूड (भरडसर)
१/२ कप सुके खोबरे, किसून भाजलेले
१/२ टीस्पून वेलची पूड

कृती:
१) कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे. पिठाचा रंग किंचित बदलेस्तोवर भाजावे, साधारण १० मिनिटे. भाजताना  तळापासून ढवळावे.
२) साबुदाणा पीठ भाजले कि आच बंद करावी आणि कढई बाजूला करावी. यात खारीक पूड, साखर, भाजलेले खोबरे आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
३) मिश्रण हाताळण्याइतपत कोमट झाले कि लगेच लाडू वळावेत.

टीपा:
१) लाडू नाजूक असतात त्यामुळे वळताना काळजी घ्यावी. लागल्यास थोडे कोमट केलेले तूप वरून घालावे.
२) खारीक पावडर ऐच्छिक आहे. पण त्यामुळे चव आणि टेक्स्चर चांगले येते. लाडूचा चिकटा बसत नाही.

Wednesday, 27 June 2012

दही साबुदाणा - Dahi Sabudana


वेळ:  १० मिनिटे (साबुदाणा भिजलेला असल्यास)
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
१ कप साबुदाणा
१/२ कप पातळ ताक
२ ते ३ टेस्पून सायीचे दही (साईसकट) (टीप)
१ ते दीड कप साधे दही (गरजेप्रमाणे कमी-जास्त करावे)
फोडणीसाठी: २ टीस्पून साजूक तूप, १/४ टीस्पून जिरे, २ हिरव्या मिरच्या (बारीक तुकडे)
२ ते ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ ते २ टीस्पून साखर

कृती:
१) साबुदाणा एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालावा. साबुदाणा हाय पॉवरवर १ मिनिट मायक्रोवेव्ह करावा. बाहेर काढून ढवळावे आणि परत २ वेळा १-१ मिनिट मायक्रोवेव्ह करावा. साधारण ३-४ मिनिटात साबुदाण्याचा रंग थोडा बदलतो आणि किंचित फुललेलाही दिसतो.
२) मायक्रोवेव्ह केलेला साबुदाणा गार होवू द्यावा. नंतर एका पातेल्यात ठेवून त्यात पाणी घालावे. पाणी लगेच निथळून टाकावे. साधारण १/२ ते १ तासाने यात १/२ कप ताक घालावे. झाकण ठेवून साबुदाणा ४ ते ५ तास भिजू द्यावा.
३) साबुदाणा भिजला कि तूप, जिरे आणि हिरव्या मिरच्या अशी फोडणी करावी. हि फोडणी भिजलेल्या साबुदाण्यावर घालावी. दाण्याचा कूट, मिठ आणि थोडी साखरही घालावी.
४) साबुदाणा सुरीने किंवा काट्याने थोडा मोकळा करून घ्यावा. त्यात दही घालून मिक्स करावे. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे. चव पाहून मीठ किंवा साखर गरजेनुसार घालावी.
लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) सायीचे दही ऐच्छिक आहे पण त्यामुळे साबुदाणा चांगला मिळून येतो आणि सायीच्या दह्याची चवही उत्तम लागते.
२) दह्याचे प्रमाण नक्की नाही, अंदाजाने घालावे.
३) वरील रेसिपी बनवताना कोथिंबीर चिरून आणि थोड्याशा मिठात चुरडून घ्यावी. कोथिंबीर चुरडून घातल्याने स्वादही छान लागतो आणि दही-साबुदाणा खाताना कोथिंबीर दातात येत नाही.
 ४) साबुदाणा कढईतसुद्धा भाजता येईल. मध्यम आचेवर साबुदाणा कढईत सारखा ढवळत राहावा. रंग बदलला कि आच बंद करावी.

Tuesday, 19 October 2010

साबुदाणा कसा भिजवावा?

How to Soak Sabudana in English

साबुदाणा कसा भिजवावा?

how to soak sabudana, sabudana kasa bhijavavaसाबुदाणा भिजवताना प्रथम साबुदाणे एका स्टीलच्या पातेल्यात किंवा काचेच्या मध्यम बोलमध्ये घ्यावे. अगदी किंचीत कोमट पाणी घेऊन हलक्या हाताने १० ते १५ सेकंदच धुवावे. धुतलेल्या साबुदाण्यातील पाणी काढून टाकावे आणि साबुदाण्याच्या पातळीवर १/२ सेंमी राहील इतकेच पाणी घ्यावे. झाकण ठेवून साधारण ४ तास भिजू द्यावे. भिजल्यावर साबुदाण्याचे दाणे पुर्ण भिजले गेले पाहिजेत तसेच प्रत्येक दाणा मोकळा राहिला पाहिजे.

साबुदाणा खिचडीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा
तसेच इतर साबुदाण्याचे पदार्थ

टीप:
१) साबुदाणा गरम पाण्यात भिजवू नये. यामुळे साबुदाणा चिकट होतो.
२) बर्‍याचदा साबुदाण्याच्या क्वालिटीवर साबुदाणा भिजवणे अवलंबून असते. कधी-कधी साबुदाणा पिठूळ असतो आणि पाणी जास्त शोषत नाही. अशावेळी साबुदाणा धुवून घ्यावा आणि त्यातील पाणी काढून टाकावे. अधिकचे पाणी घालू नये. झाकण ठेवून ३ तास साबुदाणा भिजू द्यावा.
३) साबुदाणा भिजवल्यावर नेहमी झाकून ठेवावा, नाहीतर पाणी शोषले गेल्यावर साबुदाण्याचा वरचा थर कोरडा पडतो.