Pages

Showing posts with label Sweets. Show all posts
Showing posts with label Sweets. Show all posts

Thursday, 22 November 2012

बासुंदी - Basundi

Basundi in English

वेळ: साधारण दीड तास
वाढणी: ५ ते ६ जणांसाठी
साहित्य:
४ लिटर दुध
१/४ कप बदाम, पिस्ते (मीठ नसलेले)
२ टीस्पून चारोळी
३/४ ते १ कप साखर
१ टीस्पून वेलची पूड

कृती:
१) बदाम आणि पिस्ते ३ तास भिजत घालावेत. नंतर सोलून पातळसर काप करावेत.
२) एका जाड बुडाच्या पातेल्यात दुध उकळत ठेवावे. वर जी साय जमेल ती कालथ्याने मोडावी. कालथा उकळत्या दुधात ठेवून द्यावा म्हणजे दुध उतू जात नाही. दुध तळाला चिकटून करपू नये म्हणून तळापासून कालथ्याने हलवा. दुध निम्म्यापेक्षा कमी होईपर्यंत आटवा.
३) दुध आटले कि त्यात बदाम-पिस्त्याचे काप, चारोळी घालावी. तसेच साखर घाला. आधी १/२ कप साखर घाला, चव पाहून लागल्यास उरलेली साखर घाला.
४) अजून १० मिनिटे उकळवा. आच बंद करून वेलची पूड घाला.
५) बासुंदी गार होवू द्यात. नंतर फ्रीजमध्ये किमान ३ ते ४ तास ठेवा. थंड झाली कि बासुंदी दाट होईल. (फ्रीजमध्ये ठेवल्यावर बासुंदीवर जाड साय चढलेली दिसेल. ती डावेने मोडा आणि मिक्स करा. नंतरच सर्व्ह करा.)

बासुंदीबरोबर
पुरी
बटाटा भाजी
असा छोटासा बेत छान जमतो.

Wednesday, 7 November 2012

साट्याच्या करंज्या - Satyachya Karanjya (Kanavle)

Layered Karanji (kanavle) in English

महत्त्वाच्या स्टेप्सचे फोटो पाककृतीच्या तळाला पाहायला मिळतील.

वेळ: ५० मिनिटे
८  ते १० मध्यम करंज्या

साहित्य:
कव्हर-
१/२ कप मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तूप, मोहनासाठी
चिमुटभर मीठ
खायचा रंग (लाल किंवा हिरवा)
२ ते ४ टेस्पून दुध
सारण-
१/२ कप किसलेले सुके खोबरे, भाजलेले
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून बारीक चिरलेले बदाम, पिस्ते, चारोळ्या
१/२ टीस्पून वेलची पूड
साटा-
३ टेस्पून तूप
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
इतर साहित्य-
तळण्यासाठी तूप

कृती:
१) मैदा आणि रवा एकत्र करून २ टेस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळून मीठ घालावे. दुध घालून मध्यमसर मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे.
२) तोवर सारण बनवावे. भाजलेले खोबरे हाताने चुरून घ्यावे. त्यात पिठीसाखर, बदाम-पिस्ते, आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे.
३) तूप हाताने फेसून घ्यावे. तूप हलके झाले कि कॉर्न फ्लोअर एकत्र करून फेसावे.
४) भिजवलेले पीठ दोन समान भागात विभागून घ्यावे. एका भागात २-३ थेंब रंग घालून मळून घ्यावे.
५) पांढऱ्या रंगाचा गोळा घेउन एकदम पातळ लाटून घ्यावे. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. त्यावर फेसलेला साटा लावावा.
६) रंगीत गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. हि पोळी पहिल्या पोळीवर ठेवावी. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. यावर साटा लावावा. घट्ट रोल करावा. थोडावेळ हा रोल हवेवर ठेवावा. साट्यातील तूप सुकले कि रोल थोडा घट्ट होईल.
७) रोल घट्टसर झाला कि त्याचे १ इंचाचे तुकडे करावे. लेयर असलेली बाजू वर ठेवून पुरी एवढे लाटावे. त्यात एक-दीड चमचा सारण भरून कडा सील कराव्यात. कातणाने जास्तीची कड कापून घ्यावी.
८) कढईत तूप गरम करून करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

टीपा:
१) साटा तूपाऐवजी डालडाचा बनवला तरीही चालेल.
२) दोनऐवजी ३ पोळ्या सुद्धा करू शकतो.
३) रंग थोडे ठळक घ्यावे. जसे लाल, हिरवा. माझ्याकडे केशरी रंग होता. पण तो तळल्यावर खूप उठावदार दिसत नव्हता.
४) जर वातावरण उष्ण असेल तर तयार रोल १५ एक मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावा. म्हणजे आतील साट्याचे तूप लवकर गोठेल.
५) मोहन कडकडीत गरम पाहिजे नाहीतर करंज्या नरम पडतील.
६) ५० करंज्या करण्यासाठी अडीच ते ३ कप मैदा, ५ ते ६ टेस्पून रवा आणि ५ टेस्पून तुपाचे मोहन घालून पीठ भिजवावे. सारणसुद्धा दिलेल्या प्रमाणाच्या अडीचपट बनवावे.

महत्त्वाच्या स्टेप्सचे फोटो.

Monday, 5 November 2012

पाकातले चिरोटे - Pakatle Chirote

Glazed Chirote in English

वेळ: १ तास
२० मध्यम चिरोटे

 साहित्य:
३/४ कप मैदा
१/४ कप रवा
१ टेस्पून तूप मोहनासाठी
चिमुटभर मीठ
अंदाजे १/४ कप दुध
३ ते ४ टेस्पून तूप, वितळलेले
२ ते ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
तूप किंवा तेल चिरोटे तळण्यासाठी
१ कप साखर + ३ ते ४ टेस्पून पाणी, गोळीबंद पाकासाठी

कृती:

१) रवा आणि मैदा एका बोलमध्ये घ्यावे. त्यात १ टेस्पून कडकडीत गरम तूप घालावे. चिमूटभर मीठ घालून चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेउन दुध घालावे आणि मध्यमसर घट्ट असा गोळा भिजवावा. २० मिनिटे झाकूण ठेवावे.
२) २० मिनिटांनी भिजवलेल्या गोळ्याचे ६ सारखे भाग करावे. त्यातील ३ भाग घेउन बाकीचे ३ भाग नंतरसाठी झाकून ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पातळसर पोळी लाटावी. लाटताना शक्यतो नुसतीच लाटावी, पीठ घेउ नये.
३) २ ते ३ टेस्पून तूप वितळवावे. त्यात २ ते ३ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पेस्ट बनवावी. हि पेस्ट पातळसर असावी जेणेकरून ती पोळीवर व्यवस्थित पसरेल.
४) पोळपाटावर १ लाटलेली पोळी घ्यावी. त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेवावी. या पोळीवर तुप-कॉर्न फ्लोअरची पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट यावर लावावी.
५) दोन विरुद्ध बाजूंनी गुंडाळी करत मध्यभागी आणाव्यात. मग एक गुंडाळी दुसरीवर ठेवून घट्ट रोल बनवावा. वरून थोडा दाब द्यावा. अशाप्रकारे उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवावा. थोडावेळ न झाकता तसेच ठेवावे म्हणजे तूप थोडे गोठेल आणि रोल हाताळण्यायोग्य होईल.
६) मधल्या वेळेत साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. आच बंद करावी.
७) जेव्हा दोन्ही रोल थोडे सुकतील, तेव्हा कढईत तूप गरम करावे. रोलचे १ इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून साधारण अडीच इंचाची पुरी बनवावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे बनवावे. तयार झालेले चिरोटे तुपात मंद आचेवर तळावे.
८) चिरोटे बदामी रंगावर तळून घ्यावे. तळलेले चिरोटे स्टीलच्या चाळणीत उभे करावे म्हणजे अधिकचे तूप गळून चाळणीत जमेल. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा चिरोटा साधारण गरम असलेल्या पाकात घालावा. मिनिटभर ठेवून बाहेर काढावा. आणि उभा करून ठेवावा. चिरोटे एकावर न ठेवता थोडे सेपरेट ठेवावेत.
चिरोटे गार झाले कि वर पाकचे छान ग्लेझिंग येते.

टीपा:

१) तुपाऐवजी तेल किंवा डालडा वापरले तरी चालेल. पण तुपामुळे चव जास्त खमंग लागते.
२) साखरेचा पाक गोळीबंद करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चीरोत्यात पाक शोषला जावून चिरोटे नरम पडतील.
३) मोहनासाठी वापरलेले तूप कडकडीत गरम असावे. नाहीतर चिरोटे नरम पडतील.
४) कॉर्न फ्लोअरऐवजी तांदुळाचे पीठही वापरू शकतो.
५) मळलेल्या पीठ २० मिनिटे झाकून ठेवल्यावर घट्ट होवू शकते कारण रवा ओलेपणा शोषून फुगतो. अशावेळी चमचा-दोन चमचे दुध घालून पीठ परत मळावे.
६) साखरेच्या पाकात चिरोटा घालायचे नसल्यास, चिरोटे तळल्यावर बाहेर काढावे. १-२ मिनिटांनी चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरावी.
७) पाचव्या स्टेपमध्ये दोन विरुद्ध बाजू गुंडाळण्याऐवजी एकच बाजू शेवटपर्यंत गुंडाळली तरी चालते.
८) जर चौकोनी/आयताकृती आकारात चिरोटे हवे असल्यास रोलचा १ इंचाचा तुकडा घ्यावा. आणि प्लेन बाजू वर ठेवून उभे आणि आडवे लाटणे फिरवावे. (फक्त या आकारात चिरोटे बनवायचे झाल्यास स्टेप ५ मध्ये दिल्याप्रमाणेच रोल बनवावा.)

Thursday, 1 November 2012

चुरमा लाडू - Churma Laddu

Besan Churma Laddu in English

वेळ: ३० मिनिटे
६ मध्यम लाडू

साहित्य:
३/४ कप बेसन
१/२ कप साखर
१/४ कप पाणी
१/४ किलो तूप
१/२ टीस्पून वेलचीपूड
१ टेस्पून बेदाणे

कृती:
१) बेसन एका वाडग्यात घालावे. २ टीस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन बेसनात घालावे. मिक्स करून ३-४ टेस्पून पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
२) १५ मिनिटांनी परत एकदा मळून घ्यावे. खूप घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून मळावे. (पुरी लाटता येईल इतपतच मऊ करावे)
३) कढईत तूप गरम करावे. मळलेल्या बेसनाच्या पातळसर पुऱ्या लाटाव्यात. या पुऱ्या गरम तुपात तळून घ्याव्यात. आच मध्यम आणि मंद यांच्यामध्ये ठेवावी.
४) पुऱ्या तळल्यावर खुसखुशीत झाल्या पाहिजेत. पुऱ्या कोमट झाल्या कि हाताने चुरून घ्याव्यात. चाळणीवर चाळून चाळणीत उरलेला जाडसर भाग लाटण्याने लाटून बारीक करावे किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावे. (शॉर्टकट - मी पुऱ्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड केली)
५) साखर आणि पाणी एकत्र करून दोन तारी पाक करावा. साखर विरघळून उकळी फुटली कि ३-४ मिनिटांनी पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकावा. दोन चिमटीत घेउन उघडझाप करावी. दोन तारा दिसल्या तर पाक तयार झाला असे समजावे नहितर अजून थोडावेळ उकळावे. फक्त मध्येमध्ये तार चेक करत राहावी. गरम दोनतारी पाक कुटलेल्या बेसनात घालावा. वेलचीपूड आणि बेदाणे घालावे. मिक्स करून मिश्रण आळू द्यावे.
६) मिश्रण आळले कि लाडू वळावेत.

टीपा:
१) लाडूचे मिश्रण आळायला लागणारा वेळ बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. पाक जर दोन तारीपेक्षा थोडा जास्त झाला तर लाडूचे मिश्रण लवकर आळेल. पाक जर दोनतारी पेक्षा कमी आटला असेल वेळ जास्त लागेल. तसेच थंड प्रदेशात मिश्रण पटकन आळते. आणि याउलट उष्ण भागात आळायला वेळ जास्त लागतो.
२) पुऱ्या खूप डार्क रंग येईपर्यंत तळू नयेत. गडद रंग आल्यास लाडूसुद्धा काळपट रंगाचे होतील.
३) या लाडवांची चव थोडी बुंदी लाडूसारखी लागते.
४) वरील पाककृतीत बेसनाऐवजी गव्हाचे पीठ आणि थोडा रवा वापरूनसुद्धा चुरमा लाडू बनवता येतात. गव्हाची कणिक (७०%)  आणि रवा (३०%).
५) ६ कप बेसन आणि ४ कप साखर वापरून केलेला पाक यापासून साधारण ४५ ते ५० लाडू होतील.

Thursday, 13 September 2012

Milk Powder Pedha (Microwave Method)

Milk Powder Peda in Marathi

Time: 15 minutes
Makes: 20 small pedas


Ingredients:
1 cup Milk powder
1/2 cup Condensed milk
2 tsp pure ghee
1/2 tsp cardamom powder

Method:
1) Mix milk powder, condensed milk and pure ghee into a microwave-safe bowl. Microwave for 30 seconds. Stir and microwave for 1 minute.
2) Take the bowl out. Stir for a minute. Microwave for 30 seconds twice. Stir well each time.
3) Mixture should become thick now. However, if you think it needs to be little thick, microwave for 30 seconds. Add cardamom powder and mix well.
4) Let the mixture cool down. Once mixture becomes handleable, make pedas.

Tips:
1) These pedas become slightly chewy in first few hours. However, they harden next day. Try them on a small quantity first.
2) You may add essence like butterscotch, vanilla, saffron etc.
3) 1/2 cup Cashew powder or almond powder can be substituted for 1/2 cup milk powder.

Wednesday, 12 September 2012

आटीव आंब्याचा रस - Thickened Mango Pulp


साहित्य:
४ कप हापूस आंब्याचा रस (कॅनमधील साखर असलेला रस वापरू नये)
१ कप साखर

कृती:
१) आंब्याचा रस बारीक चाळणीतून गाळून घ्यावा. म्हणजे रसात जर दोरे आणि गुठळ्या असतील तर त्या निघून जातील.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये आंब्याचा रस आटवत ठेवावा. सतत ढवळावे. तळाला रस करपू नये म्हणून काळजी घ्यावी.
३) रस एकदम सुखा झाला कि साखर घालावी. आच कमी करून दोनेक मिनिटे ढवळावे. गॅस बंद करावा.
रस कोमट झाला कि जाड प्लास्टिकच्या डब्यात ठेवावा. गार झाला कि झाकण लावून टाकावे. असा आटीव रस फ्रीजरमध्ये आठ-दहा महिने सहज टिकतो.

टीप:
१) फ्रेश आंब्याचा रस वापरावा.
२) आटीव रसात साखर घातली असल्याने ज्या पदार्थात तो वापरणार असाल त्यात साखर घालायची जरूर नाही. किंवा लागल्यास अगदी थोडीच घालावी.
३) साखर शेवटी घालावी. आणि त्यानंतर जास्तवेळ आचेवर ठेवू नये. यामुळे रस काळपट होतो.

Monday, 10 September 2012

कोकोनट मोदक - Coconut Modak


वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: १० ते १२ लहान मोदक
coconut modak naralache modak ganpati prasad idea

साहित्य:
१/२ कप खवलेला नारळ
१/४ कप कंडेन्स मिल्क
२ टेस्पून खवा
२ चिमटी वेलची पूड

कृती:
१) एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात खवा घालून ५० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. भांडे बाहेर काढून काही सेकंद ढवळावे.
२) आता नारळ घालून ४५ सेकंद मायक्रोवेव्ह करावे, असे एकून ३ वेळा करावे. प्रत्येक ४५ सेकंदानी भांडे मायक्रोवेव्ह बाहेर काढून ढवळावे. यामुळे मिश्रण जळणार नाही.
३) कंडेन्स मिल्क आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. २ वेळा ३०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. मध्ये एकदा भांडे बाहेर काढून ढवळावे.
४) मिश्रण घट्टसर झाले कि मोल्डमध्ये घालून मोदक बनवावे.
५) जर मिश्रण चिकटसर राहिले तर मिश्रण २०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे.

टिप्स:
१) मायक्रोवेव्हमध्ये हॉटस्पॉट तयार होतात ज्यामुळे मिश्रण काही स्पेसिफिक जागी जास्त गरम होते. म्हणून मिश्रण ढवळले गरजेचे असते. नाहीतर जास्त गरम झालेल्या जागी मिश्रण करपू शकते.
२) जास्त प्रमाणात मोदक करायचे असल्यास साहित्यात दिलेले जिन्नस दुप्पट किंवा तीप्पट असे वाढवावे. तसेच मायक्रोवेव्हमधील कुकिंग टाईमसुद्धा वाढवावा लागेल.

Thursday, 6 September 2012

चॉकलेट मोदक - Chocolate Modak

Chocolate Modak in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ८ ते १० लहान मोदक
साहित्य:
१/४ कप खवा
१/४ कप + २ टेस्पून पिठी साखर (पिठी साखर चाळून मगच वापरावी.)
दीड ते २ टेस्पून कोको पावडर

कृती:

१) खवा ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावा. बाहेर काढून ढवळावे आणि परत १५ सेकंद मायक्रोवेव्ह करावे.
२) पुन्हा ढवळून २० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. जोवर खवा हलकासा ब्राउन होत नाही तोवर २०-२० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (एकूण साधारण दीड मिनिट लागेल.) खवा २ मिनिटे व्यवस्थित ढवळावा. थोडे निवळले कि पिठी साखर घालून मिक्स करावे.
३) एका वेळी १ टीस्पून कोको पावडर घालावी. मिक्स करावे. आता अजून एक टीस्पून पावडर घालावी. जोवर मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवरच कोको पावडर घालावी.
४) मिश्रण घट्ट झाले कि मोदकाच्या साच्यात मिश्रण घालून मोदक करावेत.

टिप्स:
१) कोको पावडरऐवजी मिल्क चॉकलेटसुद्धा वापरू शकतो. खवा मायक्रोवेव्ह करून बाहेर काढला कि लगेच त्यावर चॉकलेटचे तुकडे घालावे. तेवढ्या उष्णतेने चॉकलेट वितळेल. चॉकलेट घातले कि मायक्रोवेव्ह करू नये नाहीतर कडसर चव येउ शकते. त्यात पिठीसाखर आणि थोडी मिल्क पावडर घालून मिक्स करावे. नेहमीसारखे मोदक करावे.
२) मी हे मोदक कमी प्रमाणात बनवले होते. गणपतीला प्रसाद दाखवण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणात बनवावे. जास्त खवा घेतला कि थोडे जास्तवेळ मायक्रोवेव्ह करावे लागेल.
३) गॅसवर सुद्धा हे मोदक करता येतील. खवा नॉनस्टीक कढईत गरम करावा. आच मध्यम असावी. सतत ढवळत राहा. रंग किंचित बदलला कि खवा बाजूला काढून वरील दिलेल्या पद्धतीने मोदक बनवावे.
४) जर फ्रोजन खवा वापरला असेल तर मोदक बनवायच्या आधी तासभर बाहेर काढून ठेवावे. आणि मग खवा वापरावा.
५) जर डार्क चॉकलेटची चव आवडत असेल तर डार्क कोको पावडर वापरावी.  नाहीतर लाईट कोको पावडर वापरावी. लाईट कोको पावडरमुळे रंग फिकट येतो आणि डार्क कोकोमुळे डीप ब्राउन. अशावेळी दोन्ही पावडर मिक्स करून वापराव्यात.

Thursday, 30 August 2012

आंबा मोदक - Amba Modak

Mango Modak in English

वेळ:३० मिनिटे
२५ ते ३० लहान मोदक
साहित्य:
१/२ कप हापूस आंब्याचा मावा (रेसिपीसाठी इथे क्लिक करा)
३/४ कप साखर
१/२ कप खवा
१ टीस्पून तूप

कृती:
१) साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवावी. पिठीसाखर बारीक चाळणीतून चाळून घ्यावी. चाळणीत राहिलेली जाडसर साखर खलबत्त्यात कुटून बारीक करावी.
२) माय्क्रोबेव्हसेफ भांडे घ्यावे. त्यात तूप आणि आंब्याचा मावा घालावा. दीड मिनिट मायाक्रोबेव्ह करावे.भांडे बाहेर काढून ढवळावे. जरा निवळले कि परत १ मिनिट आणि नंतर ३० सेकंद असे मायक्रोवेव्ह करावे. मावा जळणार नाही याची काळजी घ्यावी.
३) भांडे बाहेर काढून ३० सेकंद ढवळा. आता खवा हाताने मोडून या माव्यात मिक्स करावा. ३०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (प्रत्येक ३० सेकंदानी भांडे बाहेर काढून मिश्रण ढवळावे.)
४) मिश्रण पातळसर वाटत असेल तर अजून २० ते ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. [मिश्रण बाहेर काढाल तेव्हा ते बुडबुडेयुक्त आणि थोडेसेच पातळ असेल. थोडावेळ चमच्याने ढवळले कि निवळून घट्टसर बनते.
५) मिश्रण घट्ट आणि चिकट बनेल. अगदी कोमट झाले कि साखर घालून मिक्स करा. साखर मात्र एकावेळी थोडीथोडीच घालावी. मिश्रण मायक्रोवेव्ह बाहेर काढल्या काढल्या साखर घालू नये. साखर वितळून मिश्रण एकदम पातळ होते.
६) मिश्रण घट्टसर झाले कि मोदकाच्या साच्यात मिश्रण भरून मोदक बनवावे.

टिप्स:
१) मिश्रण आळायला थोडा वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो. आंब्याचा रस कितपत आटवला आहे त्यावरून वेळ कमीजास्त लागू शकतो.
२) जर मिश्रण चिकटसरच राहिले तर घट्टपणासाठी थोडी मिल्क पावडर घालू शकतो.
३) साखर घातल्यावर मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये.
४) साखर मिक्सरमध्ये बारीक केल्यावर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावी. चाळणीत राहिलेली साखर परत बारीक करावी. जर पिठी साखर न चाळता घेतली तर साखरेचे बारीक बारीक कण मोदक खाताना दाताखाली येतात.
५) हे मोदक मायक्रोवेव्हमध्ये करायला सोप्पे आहेत. पण गॅसवर सुद्धा हे मोदक करता येतील. पॅनमध्ये खवा मोकळा करून मध्यम आचेवर भाजावा. त्यातील तूप बाहेर येईपर्यंत भाजला गेला पाहिजे. भाजलेला खवा दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावा. कोमटसर झाला कि चाळलेली पिठीसाखर यात घालावी आणि मळावे. मिश्रण चिकट झाले तर दोन-तीन चमचे मिल्क पावडर घालावी. मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.
६) अमेरिकेत खवा बहुतांश इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळू शकतो. (फ्रोझन सेक्शनमध्ये शोधा)
७) जर फ्रोझन खवा वापरणार असाल तर लागेल तेवढा खवा २ तास फ्रीज बाहेर काढून ठेवा आणि रूम टेम्परेचरला येउ द्या.
८) जर आंब्याचा मावा उपलब्ध नसेल तर कॅनमधील आंब्याचा रस वापरू शकतो. फक्त हा रस मायक्रोवेव्हमध्ये जास्तवेळ आटवावा लागेल. तसेच या रसात साखर असते, आटवल्यावर रसाचा रंग थोडासा बदलू शकतो.

Tuesday, 28 August 2012

खव्याचे मोदक - khavyache modak

Khoya modak in English

वेळ: २५ मिनिटे
साधारण १५  लहान मोदक

साहित्य:
१/२ कप खवा (रिकोटा चीजपासून खवा कसा करावा.)
१/२ कप साखर (महत्त्वाची टीप)
२ ते ३ टेस्पून मिल्क पावडर
२ चिमटी वेलची पूड

कृती:
१) साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा.
२) खवा मायक्रोवेव्हसेफ भांड्यात ठेवून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून ४० ते ४५ सेकंद ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा.
३) भांडे बाहेर काढून ढवळा. खवा कोमटसर झाला कि पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत.
४) मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घालावी. हाताने मळून घ्यावे. [खूप जास्त मळू नये, फक्त नीट मिक्स होईस्तोवर मळावे. नाहीतर गोळा तुपकट आणि चिकट होईल].
५) मिश्रण अगदी किंचित कोमट असेल तेव्हा मोदक बनवावेत.

टिप्स:
१) खव्याचे मिश्रण घट्ट झाले नसेल तर थोडी मिल्क पावडर घालावी.
२) साखर घातल्यावर मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये.
३) पिवळे मोदक हवे असल्यास खायचा पिवळा रंग चिमूटभर घालावा. मी ४ ते ५ थेंब लिक्विड कलर वापरला होता.
४) साखर मिक्सरमध्ये बारीक केल्यावर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावी. चाळणीत राहिलेली साखर परत बारीक करावी. जर पिठी साखर न चाळता घेतली तर साखरेचे बारीक बारीक कण मोदक खाताना दाताखाली येतात.
५) हे मोदक मायक्रोवेव्हमध्ये करायला सोप्पे आहेत. पण गॅसवर सुद्धा हे मोदक करता येतील. पॅनमध्ये खवा मोकळा करून मध्यम आचेवर भाजावा. त्यातील तूप बाहेर येईपर्यंत भाजला गेला पाहिजे. भाजलेला खवा दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावा. कोमटसर झाला कि चाळलेली पिठीसाखर यात घालावी, वेलचीपूड घालावी आणि मळावे. मिश्रण चिकट झाले तर दोन-तीन चमचे मिल्क पावडर घालावी. मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.
६) अमेरिकेत खवा बहुतांश इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळू शकतो. (फ्रोझन सेक्शनमध्ये शोधा)

Wednesday, 8 August 2012

कडबू - Kadbu

Kadbu in English

वेळ: ४५ ते ५० मिनिटे
वाढणी: १५ ते १६ कडबू

साहित्य:
१ कप पुरण (पुरणपोळीला करतो तसेच पुरण)
१ कप गव्हाचे पीठ (कणिक)
२ टीस्पून तेल
तेल किंवा तूप कडबू तळण्यासाठी
चिमूटभर मीठ

कृती:
१) पुरण बनवण्यासाठी चणाडाळ कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळून टाकावे. या पाण्याची कटाची आमटी बनवता येते.
२) पुरण बनवायला जेवढी चणाडाळ घेतली असेल तेवढाच गुळ घ्यावा, गोड जास्त हवे असेल तर २ चमचे गुळ जास्त घालावा. शिजलेली डाळ गरम असतानाच त्यात गुळ घालावा. आणि घट्ट होईस्तोवर पुरण ढवळावे. १/२ टीस्पून वेलची पूड आणि २ चिमटी जायफळ पूड घालावी.
३) २ टीस्पून गरम तेल गव्हाच्या पिठात घालावे. त्यात १ चिमटी मीठ घालावे. पाणी घालून घट्टसर माळून घ्यावे. पीठ १५ मिनिटे झाकून ठेवावे.
४) पीठाचे १ इंचाचे गोळे करावे. गोळे लाटून त्यात मध्यभागी पुरण ठेवावे. कडा जोडून करंजी बनवावी. कातण्याने कडा कापून घ्याव्यात. करंज्या घट्ट पिळलेल्या सुती कपड्याखाली झाकाव्यात. अशाप्रकारे सर्व करंज्या करून तुपात तळून घ्याव्यात.
करंज्या गरमच छान लागतात. वाढताना चमचाभर पातळ तुप घालावे.

Wednesday, 11 July 2012

साबुदाणा पीठाचे लाडू - Sabudana Flour Ladu


वेळ: ३० मिनिटे
१५ मध्यम लाडू

साहित्य:
१ कप साबुदाणा पीठ
३/४ कप साजूक तूप, वितळलेले
१/२ कप पिठी साखर
१/२ कप खारीक पूड (भरडसर)
१/२ कप सुके खोबरे, किसून भाजलेले
१/२ टीस्पून वेलची पूड

कृती:
१) कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा पीठ मंद आचेवर भाजून घ्यावे. पिठाचा रंग किंचित बदलेस्तोवर भाजावे, साधारण १० मिनिटे. भाजताना  तळापासून ढवळावे.
२) साबुदाणा पीठ भाजले कि आच बंद करावी आणि कढई बाजूला करावी. यात खारीक पूड, साखर, भाजलेले खोबरे आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
३) मिश्रण हाताळण्याइतपत कोमट झाले कि लगेच लाडू वळावेत.

टीपा:
१) लाडू नाजूक असतात त्यामुळे वळताना काळजी घ्यावी. लागल्यास थोडे कोमट केलेले तूप वरून घालावे.
२) खारीक पावडर ऐच्छिक आहे. पण त्यामुळे चव आणि टेक्स्चर चांगले येते. लाडूचा चिकटा बसत नाही.

Friday, 6 July 2012

बेक शंकरपाळे - Baked Shankarpale

Baked Shankarpale in English

वेळ: १ तास
साधारण ४ कप भरून शंकरपाळे
बेक केल्यावर

बेक करण्याआधी
साहित्य:
दिड ते २ कप गव्हाचे पिठ (कणिक)
१/२ कप पातळ तूप
१/२ कप पिठी साखर
१/२ कप दूध
१/२ टिस्पून बेकिंग पावडर

कृती:
१) तूप आणि साखर परातीत घ्यावे. मिक्स करून मिश्रण हलके होईस्तोवर एकत्र फेसावे.
२) कणिक आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी.
३) तूपसाखरेच्या मिश्रणात साधारण २ कप कणिक घालावी आणि दूध घालून घट्ट गोळा बनवावा.
४) पिठाचा गोळा १० मिनीट झाकून ठेवावा.
५) या १० मिनीटात ओव्हन ३०० F वर प्रिहीट करावे. बेकिंग ट्रेवर अल्यूमिनियम फॉईल पसरवून तयार करावेत.
५) मिश्रणाचे टेनिस बॉलएवढे गोळे बनवावे. किंचीत जाडसर पोळी लाटावी. शंकरपाळे कातणाने कापून तयार करावेत. बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ३० ते ३५ मिनीटे बेक करावेत. प्रत्येक शंकरपाळा सेपरेट राहिला पाहिजे.
ओव्हनमधून बाहेर काढून थोडे गार होवू द्यावेत.

टीप:
१) बेकिंग पावडर न टाकताही शंकरपाळे करता येतात पण खुसखुशीत होत नाहीत. वाईट लागत नाहीत, फक्त खुसखूशीत न होता जरा कडकडीत होतात.

साटोऱ्या - Satorya

वेळ: ३० ते ४० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ साटोऱ्या

satorya, how to make satori, khava poli, khoya roti, khavyachi poliसाहित्य:
आवरणासाठी
१/२ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तूप
चिमटीभर मीठ
पीठ मळायला पाणी
सारण
१/४ कप भाजलेला खवा
१/४ कप बारीक रवा
२ टेस्पून तूप
१/२ कप गूळ, किसलेला
१/४ कप दुध
इतर साहित्य:
तूप, साटोऱ्या भाजायला किंवा तळायला

कृती:
१) आवरणासाठी रवा, मैदा, आणि मीठ एकत्र करावे. त्यात गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून पीठ मळावे. पीठ अगदी घट्ट किंवा अगदी सैल मळू नये. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. त्यावर रवा खमंग भाजावा. दुधाचा हबका मारून रवा शिजवावा. जर रवा बराच भाजला असेल तर थोडे दुध जास्त लागू शकते. रवा पूर्ण शिजू द्यावा.
३) गॅस बंद करावा. शिजलेल्या रव्यात गूळ आणि खवा घालून मऊसर मळावे.
४) मळलेले पीठ आणि मळलेले सारण यांचे ५ किंवा ६ समान भाग करावे. पिठाचा एक गोळा घेउन लाटावे. मधोमध सारणाचा एक भाग घेउन सील करावे. थोडे कोरडे पीठ घेउन साटोरी लाटावी. पातळ लाटू नये. थोडी जाडसरच ठेवावी.
५) नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घेउन साटोरी खरपूस होईस्तोवर शालो फ्राय करून घ्यावी.
साटोरी गरम सर्व्ह करावी. सर्व्ह करताना थोडे तूप घालावे.

टीप:
१) साटोरी डीपफ्रायही करतात. त्यामुळे मर्जीनुसार शालो फ्राय किंवा डीपफ्राय करावी.

Friday, 16 March 2012

मालपुवा - Malpuva

Malpua in English

वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: ८ ते १० मालपुवे


indian sweet, malpua, north indian sweetसाहित्य:
मालपुवाची धिरडी
१ कप मैदा
३/४ कप खवा
२ टेस्पून रवा
१ चिमुटभर बेकिंग सोडा
दीड कप दुध (रूम टेम्प.)
१ चिमटी मीठ
२ चिमटी बडीशेप
१/२ कप तूप
साखर पाक
१ कप साखर
१ कप पाणी
१ टीस्पून वेलचीपूड
१ चिमटी केशर
सजावटीसाठी
२ टेस्पून पिस्ते, भरडसर चिरलेले
केशर

कृती:
१) एक मध्यम वाडगे घ्यावे. त्यात मैदा, खवा, दुध, आणि मीठ घालून मिक्स करावे. मिश्रण एकदम स्मूथ व्हावे म्हणून मिक्सरमध्ये १०-१५ सेकंद फिरवावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यात बडीशेप घालून मिक्स करावे. मिश्रणाची कान्सीस्टन्सी इडलीच्या पिठाइतपत पातळ हवी. खूप घट्ट नको आणि एकदम पाणीसुद्धा नको.
२) साखरेचा पाक बनवण्यासाठी साखर, केशर आणि पाणी एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावे. ५ ते ६ मिनिटे मोठ्या आचेवर उकळी काढावी. पाकात चमचा बुडवून लहान ठिपका एका प्लेटमध्ये टाकावा. हा ठिपका ४-५ सेकंदातच हाताळण्यायोग्य होईल. अंगठा आणि पहिले बोट यात पाक धरून उघडझाप करा. आणि एक तार आली तर पाक तयार झाला असे समजावे. जर तार आली नाही तर अजून २-३ मिनिटे उकळी काढावी.
३) साखरेचा पाक तयार झाला कि एकदम मंद आचेवर हा पाक ठेवून द्यावा. गॅस बंद करू नये. पाक थोडा कोमट राहू द्यावा.
४) पाक तयार झाला कि लगेच धिरडी घालायला घ्यावीत. मिश्रणात बेकिंग सोडा घालून मिक्स करावे.
५) एक लहान फ्रायिंग पॅन गरम करून त्यात १ टेस्पून तूप घालावे. तूप वितळले कि एक डावभर मिश्रण घालून पातळसर धिरडे घालावे. मिडीयम-हाय फ्लेमवर दोन्ही बाजूनी लालसर शेकून घ्यावे.
६) तयार धिरडे गरम असतानाच पाकात घालावे. २ मिनिटे पाक मुरावायला ठेवावे. तयार मालपुवा प्लेटमध्ये काढून पिस्ता, केशर घालून लगेच सर्व्ह करा.
अशाप्रकारे सर्व मालपुवे तयार करा.

टीपा:
१) मालपुवा गरम असतानाच खावा. थंड झाल्यावर चव एकदम उतरते आणि पाक शोषल्याने मालपुवा फुगतो.
२) मी मालपुवा शालो फ्राय केला होता. पण मालपूवे भरपूर तुपात बनवतात. तुम्हाला आवडीप्रमाणे तूप कमी जास्त करता येईल. पण एकदम कमी तूपातही मालपुवा चांगला लागत नाही.
३) मालपुवा तूपतच बनवा, तेलात बनवू नका. तूपाऐवजी चालत असल्यास डालडामध्येही बनवू शकता.
४) मालपुवे पातळ बनवा. जाड मालपुवे वाईट लागत नाहीत पण पातळ असले कि जास्त छान लागतात.

Tuesday, 17 January 2012

आल्याच्या वड्या - Alyachya Vadya


वेळ: २५ ते ३० मिनिटे
१५ माध्यम वड्या

alyachya vadya, ginger candy, alepak, adrak ki burfiसाहित्य:
१०० ग्राम आलं
दीड कप साखर (टीप ५)
१/२ कप खवा किंवा मिल्क पावडर
१ टीस्पून तूप

कृती:
१) आलं धुवून त्याची सालं काढावीत. आल्याचे १ सेमीचे लहान-लहान तुकडे करावे (साधारण १ कप वरपर्यंत भरून).
२) आल्याचे तुकडे, साखर आणि खवा एकत्र मिक्सरमध्ये बारीक प्युरी करावी.
३) स्टीलच्या ताटाला तूप लावून घ्यावे. तसेच स्टीलच्या वाटीला बाहेरून तळाला तूप लावावे.
४) एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून आलं-साखरेचे मिश्रण घालावे. मिडीयम-हाय फ्लेमवर मिश्रण सारखे ढवळत राहावे. मिश्रण तळाला बसू देवू नये.
५) मिश्रण साधारण १० मिनिटे झाल्यावर आटेल. मिश्रणात बुडबुडे असतात त्याच्या बाजूला पांढरा फेस तयार होईल (महत्त्वाची टीप ३ पहा). त्याचा अर्थ दोनेक मिनिटात मिश्रण थापायला तयार होईल. मिश्रण कडेने सुटून मधोमध जमा झाले कि लगेच तूप लावलेल्या ताटलीवर ओतावे.
६) लगोलग वाटीने मिश्रण समान थापावे आणि सुरीने वड्या पाडाव्यात.
७) गार झाले कि वड्या सोडवून घ्याव्यात. डब्यात भरून ठेवाव्यात.

टीपा:
१) आलं सोलून चिरून मगच मिक्सरमध्ये बारीक करावे. अल्यामध्ये आतील भागाला दोरे असतात. मोठे तुकडे करून आले बारीक केल्यास मिक्सरमध्ये निट बारीक होत नाही.
२) खवा किंवा मिल्क पावडर ऐवजी वाटीभर सायीसकट दुध घातले तरी चालते. फक्त मिश्रण पातळ झाल्याने काही मिनिटे जास्त आटवायला लागेल.
३) जर थंड प्रदेशात राहत असाल तर मिश्रण फेसाळायला लागले कि १ मिनिटातच मिश्रण ताटावर थापावे. कारण थंडीमुळे मिश्रण भरभर आळते आणि वड्या कडकडीत होतात किंवा वड्या पडत नाहीत.
४) फक्त आलं आणि साखरेच्या वड्याही करता येतात. दुध, खवा, मिल्क पावडर हे फक्त वड्यांचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी घातले आहे.
५) ग्रानुलेटेड शुगर वापरल्याने दीड कप साखर वापरली आहे. ग्रानुलेटेड शुगर ही पिठीसाखरेएवढी फाईन नसते पण रव्याएवढी बारीक असते. भारतात थोडी दाणेदार साखर असते. त्यामुळे १ कप भरून आल्याचे तुकडे असल्यास २ कप साखर वापरावी.

Tuesday, 29 November 2011

अळिव लाडू - Alivache Ladu

Aliv Ladu in English

वेळ: १५-२० मिनिटे
साधारण १८-२० मध्यम लाडू

alivache ladu, balantinicha ahar, postpartum recipe, healthy recipe, aliv ladduसाहित्य:
४ कप नारळाचा चव
दिड कप गूळ
१/२ कप अळिव
१५ बदाम, सोलून पातळ काप
३ ते ४ टेस्पून चारोळी
३ ते ४ टेस्पून बेदाणे
१/२ टिस्पून जायफळ पूड

कृती:
१) अळीव नारळाच्या पाण्यात किमान २ ते अडीच तास भिजत ठेवावे.
२) कढई गरम करून त्यात भिजवलेले अळिव, खवलेला नारळ, आणि गूळ घालून मिक्स करावे. मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईस्तोवर ढवळावे.
३) मिश्रण घट्टसर झाले कि त्यात बदाम, चारोळी, बेदाणे आणि जायफळ पूड घालून मिक्स करावे. मिश्रण गरमसर असतानाच लाडू वळावेत.

टीप:
१) जायफळऐवजी वेलची पूडही वापरू शकतो.
२) जर नारळाचे पाणी नसेल तर साध्या पाण्यात अळीव भिजवले तरी चालतील.

Related Recipes
Aliv Kheer

Sunday, 13 November 2011

गुलाबजाम - Ricotta cheese gulabjamun

Gulabjam in English

वेळ: पूर्वतयारी- ४५ ते ५० मिनिटे | पाकृसाठी- ३० मिनिटे
४० ते ४५ मध्यम गुलाबजाम

gulabjam, indian sweet, gulabjamunसाहित्य:
१ lb रिकोटा चीज (मी लाईट रिकोटा चीज वापरले होते)
३ टेस्पून मैदा
१ चिमटी बेकिंग सोडा
अडीच कप साखर
अडीच कप पाणी
२ ते ३ वेलची
१ चिमूट केशर
गुलाबजाम तळण्यासाठी तेल

कृती:
१) नॉनस्टिक पॅनमध्ये रिकोटा चीज घालावे आणि मध्यम आचेवर आटवावे. आटवताना सतत ढवळत राहावे म्हणजे पॅनला चिकटणार नाही. रिकोटा चीज घट्ट होउन गोळा बनेस्तोवर आटवावे. याला साधारण ३० ते ४० मिनिटे लागतील. आटले कि थंड होवू द्यावे.
२) २ चमचे मैदा आणि चिमूटभर बेकिंग सोडा आटवलेल्या आणि थंड झालेल्या रिकोटा चीज मध्ये घालावा. व्यवस्थित मऊसर मळून घ्यावे. लागल्यास एखाद टीस्पून पाणी घालावे. छान मऊसर मळून घ्यावे.
३) खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये साखर आणि पाणी घालावे. ५ मिनिटे उकळवावे. नंतर आच अगदी मंद करून ठेवावी. केशर आणि वेलची पूड घालावी.
४) मध्यम आचेवर तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याची लहान गोटीएवढ्या आकाराचे गोळे करून घ्यावे. या गोळ्यांना तडा गेलेल्या नसाव्यात. सरफेस एकदम प्लेन असावा.
५) तेलाचे तापमान तपासण्यासाठी एक लहान गोळा तेलात सोडावा. प्रथम गोळा तळाला बसला पाहिजे आणि ५ ते ८ सेकंदानी तेलावर तरंगला पाहिजे. जर तेलात टाकल्यावर गोळा एकदम पटकन वर आला आणि लालसर रंग चढला म्हणजे तेल जास्त तापले आहे [रंग पटकन चढला तर गुलाबजाम आतून कच्चे राहतात.]. अशावेळी आच थोडी कमी करावी आणि थोडावेळ थांबावे. नंतर गुलाबजाम तळावे.
६) तेलाचे तापमान अड़जस्ट झाल्यावर एकावेळी ८ ते १० गुलाबजामचे गोळे तळावेत. तळताना गुलाबजामचे गोळे झाऱ्याने सतत हलवत ठेवावे म्हणजे सर्वबाजूनी रंग सारखा येतो आणि सर्वत्र सारखे शिजतात.
७) गुलाबजामला लाल रंग येईस्तोवर तळावे. झाऱ्याने गुलाबजाम बाहेर काढावे आणि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे. २-३ मिनीटांनी गरम साखरेच्या पाकात घालावे.
८) अशाप्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यावे आणि तळून झाल्यावर २ मिनीटांनी पाकात घालावे.

गुलाबजाम किमान २ तास तरी पाकात मुरू द्यावे. रात्रभर मुरल्यास उत्तम.

टीपा:
१) कमीत कमी मैदा वापरावा. गरजेपेक्षा जास्त मैदा घातल्यास गुलाबजाम चिवट होतात आणि पाक आतापर्यंत मुरत नाही.
२) गुलाबजाम तळल्यावर २ मिनिटे पेपरवर काढून ठेवावे. तळल्या तळल्या लगेच पाकात घातले तर गुलाबजाम वर जे काही थोडेफार तेल असेल ते पाकात उतरते आणि पाकावर तेलाचा तवंग दिसतो. तसेच गुलाबजाम कडकडीत होतात.
३) रिकोटा चीज पासून खवा बनवणे थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे. पण या पद्दतीने बनवलेले गुलाबजाम मऊसूत बनतात. चव तर खव्याच्या गुलाबजामच्या एकदम जवळची बनते.
४) जर गुलाबजाम फुटले तर अगदी थोडा मैदा घालावा आणि मळून परत गुलाबजाम ट्राय करावेत.

Thursday, 20 October 2011

काजू कतली - Kaju Katli

Kaju Katli in English

वेळ: १५ ते २० मिनिटे
१२ ते १५ मध्यम वड्या

काजू कतली, Cashew burfi, kaju barfi, kaju katali, kaju katli, kaju katri, Indian cashew sweetसाहित्य:
सव्वा कप काजूची बारीक पूड
३/४ कप पिठी साखर
१/२ कप मिल्क पावडर
१/४ कप दूध
१ टीस्पून तूप
१/४ टीस्पून वेलचीपूड
चांदीचा वर्ख सजावटीसाठी

कृती:
१) सव्वा कपपैकी १ कप काजू पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दुध आणि वेलची पावडर एका काचेच्या बोलमध्ये एकत्र करावे. नीट मिक्स करावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
२) मिश्रण २ ते ३ मिनिटे मायक्रोवेव करावे. दर ५० सेकंदानी ढवळा. मिश्रण चांगले उकळले की बाहेर काढावे. आळेस्तोवर मध्येमध्ये ढवळावे.
३) मिश्रण जरा आळले कि त्यात लागल्यास थोडी काजू पावडर घालावी. नीट मिक्स करून कणिक जेवढी घट्ट असते तसा गोळा तयार करावा.
४) पोळपाटाला किंवा फ्लॅट सरफेसला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटावी. चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात.

टीपा:
१) काजूची पूड एकदम बारीक असावी. वाटल्यास बारीक केकेली पूड बारीक चाळणीने चाळून जाडसर काजूची पूड परत बारीक करावी.
२) काजू कतली मिश्रणात थोडे केशर घातले तरी रंग आणि चव खूप छान येते. गरम दुधामध्ये २-३ चिमटी केशर भिजवून चिमटीने कुस्करून घ्यावे. आणि हे दुध मिश्रणात घालावे.
३) मिल्क पावडरऐवजी हलकासा भाजलेला खवा वापरला तरीही चालेल.

कलाकंद - Kalakand

Kalakand In English

वेळ: ३० मिनिटे
१५ मध्यम तुकडे

kalakand, Indian sweet, paneer kalakand, khova kalakandसाहित्य:
१ लिटर दुध
१/२ टीस्पून सायट्रिक अॅसीड किंवा एका लिंबाचा रस
दीडशे ग्राम खवा
३/४ कप साखर (साधारण १५० ते १७५ ग्राम)
१/२ टीस्पून वेलची पुड
पिस्त्याचे पातळ काप

कृती:
१) दुध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले कि त्यात चिमटीचिमटीने सायट्रिक अॅसीड घालून तळापासून ढवळावे. दुध फाटले कि सुती कपड्यावर पनीर गाळून घ्यावे.
२) गाळलेले पनीर फडक्यातच असताना गार पाण्याने थोडे धुवून घ्यावे म्हणजे लिंबाची/ सायट्रिक अॅसीडची आंबट चव आणि वास निघून जाईल. गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.
३) खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. साखर वितळली कि मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी पनीर आणि वेलची पुड घालावी.
४) पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच टीनच्या ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे. वरून पिस्त्याचे काप घालावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

वड्या उरल्या तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

टीपा:
१) आवडीनुसार खवा किंवा पनीरचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) पनीर ताजेच बनवावे. तसेच दुध फाटल्यावर गाळून, घट्ट पिळून लगेच पनीर वापरावा. पाणी निथळण्यासाठी खूप वेळ टांगून ठेवू नये.
३) मी वेलची-केशर यांचे रेडीमेड सिरप मिळते ते चमचाभर वापरले होते. त्यामुळे रंगही पिवळसर येतो आणि केशर वेलचीचा स्वादही छान येतो.
४) मी खवा रिकोटा चीजपासून बनवला होता. साधारण ४२५ ग्राम रिकोटा चीजपासून पावणे दोनशे ग्राम खवा बनतो.
५) ३/४ कप साखरेमुळे बेताचे गोड होते. अजून गोड हवे असेल तर २ ते ३ टेस्पून साखर वाढवावी.
६) मिश्रण ट्रेमध्ये थापल्यानंतर वरून चांदीचा वर्खही लावू शकतो. त्यामुळे कलाकंद अधिक आकर्षक दिसेल.