Thursday, 26 July 2012
मुळ्याचे पराठे - Muli Paratha
वेळ: ३५ ते ४० मिनिटे
५ ते ६ मध्यम पराठे
साहित्य:
सारण:::
१ मोठा पांढरा मुळा, किसलेला
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
१/४ टीस्पून ओवा
चवीपुरते मीठ
आवरणाची कणिक:::
१ कप गव्हाचे पीठ (कणिक)
२ टीस्पून तेल
१ मध्यम बटाटा, उकडून सोललेला
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मीठ
इतर साहित्य:
तेल किंवा बटर पराठे भाजताना
कृती:
१) कणिक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, उकडलेला बटाटा, तेल जिरे, हळद आणि मीठ घालावे. थोडे पाणी घालून मध्यमसर कणिक माळून घ्यावी. १५ मिनिटे झाकून ठेवावी.
२) तोवर पराठ्याचे सारण बनवावे. किसलेला मुळा एका बोलमध्ये घ्यावा. त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे. १५ मिनिटात मिठामुळे मुळ्यातील पाणी बाहेर येईल. हे पाणी पिळून बाहेर काढावे. पिळलेला मुळा दुसऱ्या बोलमध्ये घ्यावा. त्यात धने-जिरेपूड, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे.
३) तवा मध्यम आचेवर गरम करत ठेवावा. तोवर कणकेचे आणि सारणाचे ५ किंवा ६ मध्यम आकाराचे सारखे भाग करावे.
४) कोरडे पीठ घेउन कणकेचा एक भाग ३ इंच गोल लाटावा. सारणाचा एक भाग मध्यभागी ठेवावा. कडा सर्व बाजूंनी एकत्र करून सील करावे. कोरडे पीठ घेउन पराठा लाटावा. लाटणे हलक्या हाताने फिरवावे म्हणजे पराठा फाटणार नाही.
५) गरम तव्यावर मिडीयम-हाय आचेवर दोन्ही बाजूंनी पराठा भाजून घ्यावा. भाजताना चमचाभर तेल सोडावे.
गरम पराठा रायते, लोणचे, दही किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.
टीपा:
१) मुळ्याला पाणी सुटले कि पराठा लाटता येत नाही, ठिकठिकाणी फाटतो. म्हणून सारण बनवले कि लगेच पराठे बनवायला घ्यावेत, म्हणजे सारण जास्त ओलसर होणार नाही.
२) पराठे लाटताना लागेल तसे कोरडे पीठ घ्यावे, ज्यामुळे पराठा पोळपाटाला चिकटणार नाही.
Labels:
Breakfast,
North Indian,
Paratha,
Snacks
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment