Pages

Showing posts with label Everyday Recipes. Show all posts
Showing posts with label Everyday Recipes. Show all posts

Monday, 8 October 2012

बिटाची भाजी - Beetachi Bhaji

Beetroot Dry sabzi in English

 वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी


साहित्य:
२ मध्यम बीट, उकडलेले
१ टेस्पून तेल, १/४ टीस्पून जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद
१ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
२ ते ३ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट, भरडसर
चवीपुरते मीठ
१ टीस्पून साखर
१ टीस्पून लिंबाचा रस

कृती:
१) उकडलेले बीट सोलून घ्यावे. बारीक चिरून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, आणि हिरवी मिरची पेस्ट घालावी. त्यात चिरलेले बीट आणि  मीठ घालावे.
३) नारळ घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी. नंतर शेंगदाणा कूट आणि चवीपुरती साखर घालून २ मिनिटे ढवळावे.
४) लिंबाचा रस घालून मिक्स करावे. गरम वाढावी.

Thursday, 26 April 2012

मेथीची पीठ पेरून भाजी - Methichi bhaji

Methichi Bhaji in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
२ मोठ्या मेथीच्या जुड्या (टीप १)
१ लहान जुडी पाती कांदा
४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, भरडसर चिरून
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, २ चिमटी हिंग, १/४ टीस्पून हळद
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून किंवा १/२ टीस्पून लाल तिखट
२ ते ३ टेस्पून बेसन (टीप २)
चवीपुरते मीठ

कृती:
१) मेथी निवडून घ्यावी. निवडलेली मेथी बारीक चिरून घ्यावी. पाती कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करावे. लसूण घालून थोडी लालसर परतून घ्यावी. मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परतावे.
३) चिरलेली मेथी आणि पाती कांदा फोडणीस घालावा. थोडे मीठ घालावे. मध्यम आचेवर एक-दोन मिनिटे परतावे. झाकण ठेवावे. जर मेथी कोरडी पडली तर थोडे पाणी शिंपडावे. मध्येमध्ये झाकण काढून भजी परतावी.
४) मेथी व्यवस्थित शिजेस्तोवर परतावी. साधारण ७ ते १० मिनिटे लागतील. बेसन भुरभुरून निट मिक्स करावे. आच मंद ठेवावी. झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ काढावी.

टीपा:
१) मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी मेथी चिरल्यावर मिठाच्या पाण्यात ५ मिनिटे बुडवून ठेवावे. नंतर मेथी पिळून घ्यावी. पण असे केल्याने मेथीतील जीवनसत्त्व नष्ट होतील.
२) बेसन आधी थोडे भाजून घेतल्यास चव चांगली लागते. तसेच पीठ भाजीत घातल्यावर पटकन शिजते आणि चिकट होत नाही.

Thursday, 12 April 2012

कुळीथ पिठले - Kulith Pithle


वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी








साहित्य:
१/४ कप कुळथाचे पीठ
१/४ ते १/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ ते ३ मोठ्या लसूण पाकळ्या, जाडसर चिरून (ऐच्छिक)
साधारण २ ते सव्वा दोन कप पाणी
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या (उभ्या चिरून), कढीपत्ता
२ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ ते ३ आमसुलं
चवीपुरते मीठ
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) १/२ कप पाण्यात १/४ कप कुळथाचे पीठ घालून मिक्स करावे. गुठळ्या राहू देउ नयेत. हे मिश्रण तयार ठेवावे.
२) कढईत तेल गरम करून आधी लसूण परतावी. लसणीच्या कडा लालसर झाल्या कि मोहोरी, हिंग, हळद, मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून तो लालसर होईस्तोवर परतावा.
३) कांदा परतला गेला कि त्यात २ कप पाणी, आमसूल आणि मीठ घालावे.
४) पाणी उकळू द्यावे. पाण्याला उकळी फुटली कि त्यात कुळीथ पीठाचे मिश्रण एकावेळी १ चमचा असे घालावे. डाव फिरवून अजून १ चमचा घालावे. एकदम सर्वच्या सर्व घालू नये. गुठळ्या होउ शकतात.
५) पिठले हळू हळू घट्ट होईल. गरजेपुरता घट्टपणा आला कि कुळथाचे मिश्रण घालावे थांबावे किंवा जर थोडेसे मिश्रण उरले असेल तर त्यात २ ते ४ टेस्पून पाणी घालून पिठल्यात घालावे.
६) पिठल्यात नारळ घालून थोडावेळ उकळी काढावी. कोथिंबीर घालुन मिक्स करावे. गरम भाताबरोबर पिठले चविष्ठ लागते.

टीपा:
१) खरंतर, कुळथाचे पीठ चिमटी-चिमटीने भुरभुरून पिठले बनवतात. पण, पाण्यात पीठ मिसळून हि पेस्ट थोडी-थोडी उकळत्या पाण्यात घातली तर सोपे पडते, आणि गुठळ्या होण्याचे चान्सेस पण कमी होतात.
२) जर पिठले जास्त घट्ट झाले तर थोडेसे पाणी घालून सारखे करावे. आणि २-३ मिनिटे उकळी काढावी.

Tuesday, 3 April 2012

वालपापडीची भाजी - Valpapdichi Bhaji

Valpapdichi Bhaji in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
१ पौंड वाल पापडी (गोल वालपापडी)
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्त्याची पाने
२ टेस्पून ताजा नारळ
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट (ऐच्छिक)
१ टीस्पून गोडा मसाला (ऐच्छिक)
२ आमसुलं
१ टेस्पून गुळ किंवा चवीनुसार
चवीपुरते मीठ

कृती:
१) वालपापडी धुवून देठं तोडून घ्यावीत. देठं काढताना जर कडेला शिरा असतील तर त्याही काढून टाकाव्यात. वालपापडी मध्यम चिरून घ्यावी.
२) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, जिरे, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
३) फोडणीत चिरलेली वालपापडी घालावी व १-२ मिनिटे परतावे. मीठ, कोकम आणि साधारण १/२ कप पाणी घालावे. मिक्स करून झाकण ठेवावे आणि ५ मिनिटे मिडीयम-हायच्या मध्ये आच ठेवून शिजवावे. भाजी कोरडी पडू देउ नये. भाजी कोरडी पडली तर तळाला लगेच जळेल. तसेच हि भाजी रसदार असेल तर जास्त चांगली लागते. त्यामुळे लागेल तेव्हा थोडे थोडे पाणी घालावे.
४) वालपापडी साधारण १२-१५ मिनिटे शिजवावी. वालपापडी पूर्ण शिजली कि त्यात नारळ, गोडा मसाला, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट घालावा. मिक्स करून २-३ मिनिटे गूळ विराघळेस्तोवर झाकण न ठेवता शिजवावे.

टीप:
१) वालपापडीला स्वतःचा छान स्वाद असतो. काही लोकांना मसाला न घालताच हि भाजी आवडते. त्यामुळे गोडा मसाला ऐच्छिक आहे. तसेच मसाला घालायचा झाला तर गरम मसाला किंवा किचन किंग मसालाही घालू शकतो.

Tuesday, 27 March 2012

पडवळ चणाडाळ भाजी - Padwal kachrya

Padwal kacharya in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

padwalachi bhaji, padwal dalimbya, padwal kacharya, snakegourd bhaji, padwal chana dal bhajiसाहित्य:
पाव किलो पडवळ
२ ते ३ टेस्पून चणा डाळ, ३ तास भिजवावी.
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, १/८ टीस्पून मोहोरी, चिमटीभर हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून ताजा नारळ, खवलेला
२ आमसुलं
१ टीस्पून गोड मसाला (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ

कृती:
१) पडवळ धुवून त्याची दोन्हीकडील टोके कापून टाकावी. पडवळ उभा कापून दोन भाग करावे. आतील भूसभुशीत गाभा चमच्याने काढून टाकावा. पडवळाच्या पातळ काचऱ्या कराव्यात.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. ५-७ सेकंद परतून त्यात आधी भिजलेली चणा डाळ घालावी. २ टेस्पून पाणी घालून झाकण ठेवून चणा डाळ २-३ मिनिटे शिजू द्यावी.
३) नंतर पडवळाच्या काचऱ्या आणि ३-४ चमचे पाणी घालावे. कोकम आणि मीठ घालावे. झाकण ठेवून पडवळ शिजू द्यावा. पडवळ कोरडा होवू देउ नये. पण एकदम पाणी न घालता गरज लागेल तेव्हा थोडे थोडे पाणी घालावे.
४) पडवळ एकदा शिजला कि गूळ, गोडा मसाला आणि नारळ घालावा. मध्यम आचेवर ३-४ मिनिटे शिजू द्यावे.
तयार भजी गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी.

Tuesday, 28 February 2012

आलू पालक - Aloo Palak

Aloo Palak in English

वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: २-३ जणांसाठी

Aloo Palak, Stir Fried aloo palak, spinach and potato dry sabzi

साहित्य:
४ कप पालक, बारीक चिरलेला
३ टेस्पून कसूरी मेथी, चुरडून
१ मध्यम बटाटा, सोलून मध्यम तुकडे
१/२ कप कांदा, बारीक चिरून
२-३ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ टेस्पून तेल
२ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
चवीपुरते मीठ

कृती:
१) मायक्रोवेव्ह सेफ बोलमध्ये बटाट्याचे तुकडे घ्यावे. बटाट्याचे तुकडे बुडतील इतपत पाणी घालावे. मायक्रोवेव्हमध्ये ८ ते १० मिनिटे शिजवून घ्यावे किंवा बटाटे शिजेस्तोवर शिजवून घ्यावे. पाणी निथळून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, लसूण, आणि मिरची पेस्ट घालून फोडणी करावी. १० सेकंद परतून मग कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
३) कांदा शिजल्यावर पालक आणि कसुरी मेथी घालावी. १/२ टीस्पून मीठही घालावे, मिडीयम-हाय फ्लेमवर ५-७ मिनिटे परतावे. पालकामधील अधिकचे पाणी निघून गेले पाहिजे.
४) आच मध्यम करावी. बटाटे घालून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. झाकण ठेवून २ मिनिटे शिजवावे.
गरम भाजी पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) पालक फोडणीला घातल्यावर लगेच मीठ घालावे. म्हणजे रंग चांगला राहतो. तसेच पालक शिजताना झाकण ठेवू नये, झाकण ठेवल्याने रंग थोडा काळपट होतो.
२) कसूरी मेथीमुळे चव छान येते. जर कसूरी मेथी आवडत नसेल तर ती नाही घातली तरीही चालेल.

Thursday, 2 February 2012

वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baingan Bhurta in English

वेळ: ३० मिनिटे
३ ते ४ जणांसाठी
vangyache bharit, baingan bharta, bhurta recipe, eggplant bhurtaसाहित्य:
१ मोठे वांगे (साधारण १ पौंड)
२ मध्यम कांदे, बारीक चिरून
१ मोठा टोमॅटो, बारीक चिरून
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या,
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) वांगे भाजून घ्यावे.
२) वांगे गार होवू द्यावे. वांगे सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने रफली चिरावे.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली लसूण घालून १०-१५ सेकंद परतावे.
४) कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावे. कांदा छान परतला गेला कि टोमॅटो घालून एकदम मऊ होईस्तोवर परतावे.
५) मीठ आणि सोललेले वांगे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळापासून परतावे म्हणजे तळाला वांगे चिकटून जाळणार नाही. कडेने तेल सुटेस्तोवर परत राहावे (साधारण ५ ते ८ मिनिटे)
गरम भरीत भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

Tuesday, 3 January 2012

बिसिबेळे भात - Bisibele Bhat

Bisibele Bhath in English

वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

bisibhele bhat, bhisibeli bath, bisibele bhatसाहित्य:
३/४ कप तांदूळ
१/४ कप तूर डाळ
१ टेस्पून चिंच
दीड कप चिरलेल्या भाज्या, मध्यम चौकोनी (बटाटा, फरसबी, वांगं, गाजर, कॉलीफ्लॉवर)
मसाले: १ इंच दालचिनीचा तुकडा, २ वेलच्या, २ तमालपत्र
फोडणीसाठी: १ टेस्पून तूप, १/२ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग, १४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
१ टेस्पून सांबार मसाला (शक्यतो घरगुती)
चवीपुरते मीठ
स्पेशल तडका :- २ टेस्पून तूप, १/४ टीस्पून हिंग, २ ते ३ टेस्पून शेंगदाणे, ७ ते८ कढीपत्ता पाने

कृती:
१) तूरडाळ धुवून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावी. (टीप १ पहा)
२) चिंच १/४ कप गरम पाण्यात भिजत ठेवावी. १० मिनिटांनी चिंच कुस्करून कोळ वेगळा काढावा.
३) नॉनस्टिक पातेल्यात १ टेस्पून तूप गरम करावे. त्यात दालचीनी, वेलची, तमालपत्र घालून ५-७ सेकंद परतावे. जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. या फोडणीत वांगे सोडून चिरलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. झाकण ठेवून २ मिनिटे वाफ काढावी. आता तांदूळ आणि ३ कप पाणी घालावे. चिंच कोळ आणि सांबार मसाला घालावा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावे.
४) आपल्याला एकदम मऊ आणि अगदी थोडा पातळसर भात शिजवायचा आहे त्यासाठी लागल्यास पाणी घालावे. भात ६०% शिजला कि शिजवलेली तूरडाळ आणि वांगी घालावी.
५) १० मिनिटे झाकण ठेवून किंवा भात पूर्ण शिजेस्तोवर शिजवावे.
६) भात ताटामध्ये वाढावा. लगेच कढल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. त्यात हिंग आणि शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे लालसर होईस्तोवर परतावे. शेंगदाणे लालसर झाले कि कढीपत्ता घालावा. हि फोडणी वाढलेल्या भातावर १-२ चमचाभर घालावी. हि फोडणी फार महत्त्वाची आहे आणि यामुळे भाताची चव अजून खुलते.

टीपा:
१) तूरडाळ शिजल्यावर प्रेशरकुकरमधून बाहेर काढावी. आमटीसाठी जशी रवीने डाळ मोडतो तशी डाळ रवीने घुसळू नये. अशीच वापरावी. घुसळलेली डाळ भातात घातल्यावर भाताचे टेक्स्चर बदलते.

Friday, 30 December 2011

दुधीची भाजी - Dudhichi Bhaji

Bottlegourd Sabzi in English
वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी

dudhi bhopalyachi bhaji, dudhi sabzi, lauki ki sabzi, sabji,साहित्य:
२ कप दुधीच्या लहान चौकोनी फोडी (दुधी सोलून आतील बिया काढून टाकाव्या)
२ ते ३ टेस्पून चणाडाळ (४ तास कोमट पाण्यात भिजवणे)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, २ हिरव्या मिरच्या
१/४ टिस्पून लाल तिखट (गरज वाटल्यास)
२ टेस्पून ओलं खोबरं
१/२ टिस्पून गोडा मसाला
२ टिस्पून गूळ किंवा चवीनुसार
चवीनुसार मिठ

कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद, मिरची घालून फोडणी करावी.
२) फोडणीत चणाडाळ घालून १ वाफ काढावी. नंतर दुधी आणि ओलं खोबरं घालून निट ढवळावे आणि वाफ काढावी. लागल्यास थोडे पाणी घालून चणाडाळ आणि दुधी शिजू द्यावा.
३) मिठ, गोडा मसाला घालून ढवळावे लागल्यास पाव चमचा लाल तिखट घालावे.
४) चणाडाळ व दुधी शिजला कि मग गूळ घालून मिक्स करावे व थोडावेळ वाफ काढावी.
कोथिंबीर घालून भाजी, पोळीबरोबर सर्व्ह करावी.

Monday, 19 September 2011

गवार भोपळ्याची भाजी - Gawar Bhopla Bhaji

Cluster Beans with Pumpkin in English

श्राद्धपक्षात गवार आणि भोपळ्याची भाजी करायची पद्धत आहे.

वेळ: पूर्वतयारी १५ मिनीटे । पाकृसाठी १५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
gawarichi bhaji, gawar bhopla, gawar batata bhaji, gavar bhaji, govar bhaji, gawar ani kalya vatanyachi bhaji, cluster beansसाहित्य:
पाव किलो गवार
फोडणीसाठी:- १ टेस्पून तेल, १०-१२ मेथी दाणे, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
१ वाटी लाल भोपळ्याच्या फोडी (टीप १ व २)
२ टेस्पून ताजा नारळ
१ टेस्पून दाण्याचा कूट
२ टिस्पून गूळ किंवा चवीपुरता
१/२ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ

कृती:
१) गवार स्वच्छ धुवून घ्यावी. प्रत्येक गवारीची दोन्ही बाजूची देठं मोडावीत आणि शिर असेल तर काढून टाकावी. गवारीचे १/२ ते १ इंचाचे तुकडे मोडून घ्यावेत.
२) गवार कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. वाफवताना गवारीमध्ये पाणी घालू नये. (वाफवण्यासाठी कूकरच्या तळाशी १ इंच पाणी असावे. गवार कूकरच्या आतील डब्यात ठेवावी व या डब्यात पाणी घालू नये.)
३) कढईत तेल गरम करावे. मेथीदाणे घालून थोडे लालसर होवू द्यावे. मग मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. प्रथम भोपळ्याच्या फोडी फोडणीस टाकाव्यात. २-३ वाफा काढून भोपळा शिजू द्यावा. भोपळा ६० % शिजला कि वाफवलेली गवार घालावी. निट मिक्स करावे.
४) लाल तिखट, गोडा मसाला, नारळ, दाण्याचा कूट आणि थोडे मिठ घालावे. मध्यम आचेवर १-२ वाफा काढाव्यात. नंतर गूळ घालून १ वाफ काढावी.

टीप:
१) गवारीची भाजी इतरवेळी करताना शिजवलेला बटाटाही वापरू शकतो. फक्त बटाटा शिजवून थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावा. गवार आणि बटाटा एकत्रच फोडणीस घालावे, बटाटा शिजलेला असल्या कारणाने अजून शिजवायची गरज नाही.
२) बटाट्याऐवजी काळे वाटाणे गवारीच्या भाजीत अधिक छान लागतात. जर काळे वाटाणे वापरायचे असतील तर ७-८ तास वाटाणे पाण्यात भिजत ठेवावेत व कूकरमध्ये शिजवून घ्यावेत.
३) हि भाजी थेट कूकरमध्येही फोडणीस टाकू शकतो, म्हणजे गवार वेगळी शिजवायची गरज नाही. लहान कूकरमध्ये फोडणी करून घ्यावी. त्यात मोडलेली गवार, बटाटा/ भिजवलेले काळे वाटाणे फोडणीस टाकावे. इतर साहित्यही घालावे व थोडे पाणी घालावे. २ ते ३ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली कि कूकर उघडून वाटल्यास १ उकळी काढावी.

Friday, 9 September 2011

दह्यातील वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baigan Bhurta (in yogurt) in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप भरीत
vangyache bharit, baingan bharta, baingan bhurta, dahyatil vangyache bharitसाहित्य:
१ कप भाजलेल्या वांग्याचा गर
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून तेल, १ चिमटी मोहोरी (ऐच्छिक) , २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ ते ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
३/४ कप किंवा गरजेनुसार दही
चवीपुरते मीठ

कृती:
१) वांग्याचा गर सुरीने थोडा कापून घ्यावा. कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे घालून तडतडेस्तोवर थांबावे. हिंग आणि हिरवी मिरची घालावी. तयार फोडणी वांग्यावर घालावी.
२) कांदा आणि मीठ घालून मिक्स करावे. दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत छान लागते.

Tuesday, 6 September 2011

मसाला वांगी - Masala Vangi

Spicy Eggplant Curry in English

वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

masala baingan, baingan recipes, eggplant recipes, masala vangi, vangyachee bhajiसाहित्य:
१० लहान वांगी
मसाला पेस्टसाठी:-
१ कप कांदा, पातळ उभा चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, चिरलेला
५ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
५ कढीपत्त्याची पाने
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
४ हिरव्या मिरच्या, चिरून
२ टेस्पून खवलेला ताजा नारळ
१/२ टिस्पून खसखस, भाजून पूड केलेली (ऐच्छिक)
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल
इतर साहित्य:-
२ टिस्पून तेल
५ ते ६ मेथीचे दाणे
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (लालसर रंग येण्यासाठी)
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ

कृती:
१) वांग्याचे देठ कापून प्रत्येक वांग्याच्या ६ ते ८ फोडी कराव्यात.
२) मसाला पेस्ट
i) पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आणि आलं घालावे. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावे.
ii) टोमॅटो घालून ते एकदम मऊसर होईस्तोवर परतावे.
iii) दाण्याचा कूट, नारळ, धणे-जिरेपूड, खसखस, गरम मसाला आणि मिठ घालून मिक्स करावे.
iv) हे मिश्रण गार होवू द्यावे. थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटून पेस्ट तयार करावी.
३) पॅनमध्ये तेल गरम करावे. मेथी दाणे घालून थोडा रंग बदलेस्तोवर थांबावे. नंतर हिंग, हळद, आणि वांग्याच्या फोडी घालाव्यात. थोडे मिठ घालावे. झाकण ठेवून फोडी थोडावेळ शिजू द्याव्यात. आता वाटलेला मसाला घालावा, चिंचेचा कोळ आणि लाल तिखट घालावे.
गरजेपुरते पाणी घालून कंसिस्टन्सी अड्जस्ट करावी. काही मिनीटे उकळी काढावी.
भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीपा
१) जांभळ्या रंगाची लहान वांगी निवडावीत. तसेच साल तुकतूकीत आणि डागविरहीत असावे.
२) काश्मिरी लाल तिखटाला तिखटपणा अगदी कमी असतो पण यामुळे भाजीला रंग सुरेख येतो. वाटल्यास हे तिखट घातले नाही तरी चालेल.
३) या भाजीत थोडा गोडपणा चांगला लागतो. आवडत असल्यास थोडा गूळ किंवा साखर घालावी. (१/२ किंवा १ टिस्पून)

Tuesday, 30 August 2011

मसूराची आमटी - Masoor Amti

Masoor Amti in English

वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

masoor amti, masoorachi amti, masoor recipeसाहित्य:
१/२ कप मसूर (टीप १)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ५ ते ६ कढीपत्ता पाने
४ ते ५ लसणीच्या मोठ्या पाकळ्या, जाडसर चिरून
२ टेस्पून ओला नारळ
१ टीस्पून गोड मसाला
३ कोकमचे तुकडे
२ टीस्पून गूळ किंवा चवीनुसार
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकावे. १/४ चमचा मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये २ शिट्ट्या करून, पाणी न घालता शिजवून घ्यावे. वाफ जीरली कि मसूर बाहेर काढावेत आणि डावेने थोडेसे चेचून घ्यावे. आणि १ कप पाणी घालावे.
२) कढईमध्ये तेल गरम करावे. लसूण घालावी आणि कडा ब्राऊन होईतोवर परतावी (जळू देऊ नयेत). लसूण नीट परतली गेली नाही तर आमटीला लसणीचा कच्चट वास राहतो.
३) मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी.
४) नारळ घालून काही सेकंद परतावे. आता मसूर घालून ढवळावे. लागल्यास पाणी घालावे. कोकम आणि गोडा मसाला घालावा. आमटीला उकळी काढावी. गूळ आणि मीठ घालून ३ ते ४ मिनिटे मध्यम आचेवर उकळी काढावी.
५) चव पाहून लागेल तो जिन्नस वाढवावा. कोथिंबीर घालून तूप भाताबरोबर आमटी सर्व्ह करावी.

टीप:
१) मसुराला मोडसुद्धा काढू शकतो. मोड काढण्यासाठी मसूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. पाणी निथळून घ्यावे. नंतर सुती कपड्यात घट्ट बांधून उबदार ठिकाणी किमान ८ तास तरी ठेवावेत. मोड आल्यावर वरील पद्धतीनेच आमटी करावी.

Tuesday, 9 August 2011

मुगाची उसळ - Mugachi usal

Mung beans Usal in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: २० ते २५ मिनिटे (मूग भिजवण्याचा कालावधी वगळून)

mugachi usal, moong beans usali, mung beans recipe, sprouted mung beans, indian mung curryसाहित्य:
३/४ कप मुग
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२- ३ मोठ्या लसणीच्या पाकळ्या, जराशा ठेचून
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप ताजा खोवलेला नारळ
२ ते ३ आमसूलं
१/२ टीस्पून गोड मसाला (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार

कृती:
१) मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर सकाळी पाणी काढून टाकावे. मूग निवडून घ्यावे, जर खडा किंवा न भिजलेला कडक मूग असेल तर काढून टाकावा. सुती कापडात भिजलेले मूग घट्ट बांधून ठेवावे. मोड यायला साधारण १० तास तरी लागतील. आणि जर थंडीचा सिझन असेल तर अजून काही तास लागतील. मुगाला मोड आले कि उसळ बनवायच्या आधी पाण्यात घालून लगेच उपसावेत. यामुळे मूग थोडे ओलसर होतात आणि फोडणीला टाकल्यावर कोरडे राहत नाहीत. आणि करपण्याचा संभव टळतो.
२) कढईत तेल गरम करून. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि कांदा नीट परतून घ्यावा.
३) कांदा छान परतला कि मूग घालून परतावे. आमसूल, मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. मूग कोरडे पडू देवू नये. यासाठी मध्येमध्ये पाण्याचा हबका मारावा. एकाचवेळी खूप जास्त पाणी घालू नये. त्यामुळे चव बिघडते. मूग शिजायला १५ ते २० मिनिटे लागतील.
४) मूग साधारण ९०% शिजले कि त्यात नारळ, लागल्यास मीठ आणि गोड मसाला घालावा. उसळीला थोडा रस ठेवायचा असल्यास गरजेपुरते पाणी घालावे. साखर घालून उकळी काढावी.
गरम उसळ पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) मुगाची उसळ कांदा आणि लसणीशिवाय सुद्धा करता येईल. पण, मुग आणि कांदा-लसूण यांचे कॉम्बिनेशन खूप छान लागते.
२) मी शक्यतो कोणताही मसाला (गोड/गरम) मुगाच्या उसळीला वापरत नाही. वापरल्यास अगदी थोडासा वापरते. पण आपल्या आवडीनुसार मसाल्याचा वापर करावा.

Tuesday, 2 August 2011

वांगी बटाटा काचऱ्या - Vangi Batata Kacharya

Aloo Baingan Stir Fry in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

aloo baingan, vangi batata kachrya,  batata kachrya, eggplant stir fry, healthy cookingसाहित्य:
८ ते १० लहान वांगी (टीप १)
२ मध्यम बटाटे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
४ ते ५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार

कृती:
१) वांगी धुवून घ्यावीत आणि देठं कापून टाकावीत. प्रत्येक वांग्याच्या उभ्या चार फोडी कराव्यात. आणि चतकोर आकाराच्या काचऱ्या कराव्यात. गार पाण्यात बुडवून ठेवाव्यात.
२) बटाटे सोलून उभे चार भाग करून पातळ काचऱ्या कराव्यात.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा आणि बटाटा घालावा. थोडे मीठ घालावे. झाकण ठेवून बटाटे ५०% शिजवावे.
४) वांग्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. वांग्याच्या काचऱ्या कढईत घालाव्यात. झाकण न ठेवता वांगी परतत राहावी. वांगी पटकन शिजतात, म्हणून कढईवर झाकण ठेवू नये.
५) वांगी शिजली कि चव पाहून लागल्यास मीठ घालावे. आता शेंगदाण्याचा कूट, साखर, आणि नारळ घालून मिक्स करावे. एक दोन मिनिटे भाजी परतावी आणि गरमच पोळीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर वाढावी.

टीपा:
१) मोठे वांगेसुद्धा वापरता येईल. तेव्हा वांगं-बटाट्याचे प्रमाण १ कप वांग्याच्या काचऱ्यांना ३/४ कप बटाट्याच्या काचऱ्या असे असावे.
२) आंबटपणासाठी १ टीस्पून लिंबाचा रस भाजी तयार झाल्यावर शेवटी घालावा.

Tuesday, 26 July 2011

भरली कारली - Bharli Karli

Stuffed Karela in English

वाढणी: २ ते ४ जणांसाठी
वेळ: २५ मिनिटे

stuffed karela, stuffed bitter gourd, karela recipe, karlyachi bhaji
साहित्य:
४ कोवळी कारली
तळण्यासाठी तेल
::सारण::
२ टेस्पून भाजलेले तिळ
२ टेस्पून भाजलेले बेसन (१ टेस्पून तेलावर भाजावे)
२ टेस्पून भाजलेले खोबरे
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून बडिशेप
१ टिस्पून साखर
१ टिस्पून खसखस (ऐच्छिक)
चवीनुसार मिठ

कृती:
१) कारली धुवून घ्यावी. कारल्याची खरखरीत पाठ हलकेच किसणीने किसून प्लेन करून घ्यावी. प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा आणि बिया काढून साफ करावे. आतल्या बाजूने मिठ चोळून ठेवावे.
२) तिळ खोबरं एकत्र कुटून घ्यावे. त्यात धणेजिरेपूड, आमचूर, तिखट, साखर, भाजून कुटलेली खसखस, तेलावर भाजलेले बेसन आणि अगदी थोडे मिठ घालून मिक्स करावे (कारल्याला चोळलेले मिठ लक्षात ठेवावे)
३) मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा आणि कारली कुरकूरीत तळावी.
वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा. भरली कारली आमटी भाताबरोबर छान लागते. पोळीबरोबर खायचे झाल्यास बरोबर आमटी किवा तत्सम पातळ पदार्थ घ्यावा.

टीप:
१) कारली लहान पॅनमध्ये थोडे जास्त तेल घालून शालो फ्राय करता येतात. जास्त तेलाची फोडणी करून त्यात कारली परतून झाकावी. १० मिनीटे अधून मधून बाजू बदलावी आणि चमच्याने जरा प्रेस करत राहावे म्हणजे निट शिजले जाईल.
२) शक्यतो लहान व कोवळी कारली वापरावीत. लहान कारली लवकर शिजतात आणि वाढायला सोपी जातात. साधारण एक कारले एका व्यक्तीसाठी पुरेसे होते.

Tuesday, 12 July 2011

पालकाची भाजी - Palakachi Bhaji

Palakachi Bhaji in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

spinach stir fry, palakachi paratun bhaji, palak sabzi, palak stir fry, spinach indian recipes, Palak bhaaji, spinach indian curry, iron rich spinachसाहित्य:
३ कप बारीक चिरलेली पालकाची पाने
१ लहान कांदा, बारीक चिरून (साधारण १/४ कप)
१/२ टीस्पून उडीद डाळ (ऐच्छिक)
फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, एक चिमटी जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद
१ हिरवी मिरची, उभी चिरून
चवीपुरते मीठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. उडीद डाळ घालून गुलाबीसर होईस्तोवर थांबावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि शेवटी हिरवी मिरची घालावी. १० सेकंद परतून घ्यावे.
२) चिरलेला कांदा घालून २ ते ३ चिमटी मीठ घालावे. कांदा लालसर होईतोवर परतावा.
३) आता चिरलेला पालक घालून झाकण न ठेवता परतावे. पालक आळेस्तोवर परतावे. पालाकातील बहुतांश पाणी निघून गेले कि चव पहूल लागल्यास मीठ घालावे.
पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर हि भाजी गरमच वाढावी.

टीप:
१) उडदाच्या डाळीने चवीमध्ये फरक पडत नाही. फक्त मध्येमध्ये दिसायला छान दिसते. त्यामुळे नको असल्यास घातली नाही तरी चालेल.

Tuesday, 28 June 2011

काकडीचा कायरस - Kakdicha Kayras

Kakdi Kayras in English

वेळ: १० ते १५ मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

cucumber salad, kakdicha kayras, kakdichi koshimbiसाहित्य:
१ कप बारीक चिरलेली काकडी (सोलून)
१ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
३ ते ४ टेस्पून किसलेला गूळ किंवा चवीनुसार
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट (थोडा भरडसर)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/८ टिस्पून जिरे, २ चिमटी हिंग, १/८ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मिठ

कृती:
१) चिंचेचा कोळ एका मध्यम वाडग्यात घ्यावा. त्यात साधारण १/२ कप पाणी घालून मिक्स करावे. मिठ, गूळ घालून गूळ विरघळेस्तोवर मिक्स करावे. (पाण्याची चव आंबटगोड असली पाहिजे, त्यानुसार चिंच किंवा गूळ आवडीनुसार वाढवावा)
२) चिंचेच्या पाण्यात काकडी घालावी. मिश्रण पातळसरच असावे, तेव्हा लागल्यास अजून थोडे पाणी घालावे. दाण्याचा कूटही घालावा.
३) कढल्यात तेल गरम करावे. जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. हि फोडणी कायरसावर घालावी. कोथिंबीर घालून मिक्स करावे.
काकडी कायरस जेवणात तोंडीलावणी म्हणून घ्यावे.

टीप:
१) आवडीनुसार चिंचेचा कोळ किंवा गूळ कमी जास्त करू शकतो.

Thursday, 16 June 2011

पडवळ डाळिंब्या - Padwal Dalimbya

Padwal dalimbi in english

वेळ: २५ ते ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

padwal dalimbya, dalimbi usal, padwal bhaji, snake gourd stir fry, snake gourd sabzi, vaal bhaji, vaal recpe, indian curry
साहित्य:
दीड कप चिरलेले पडवळ (स्टेप २)
१ कप सोललेल्या डाळिंब्या (स्टेप १)
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने
२ ते ३ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ टेस्पून गूळ
चवीपुरते मीठ
इतर ऐच्छिक साहित्य: २ कोकमचे तुकडे, १ टीस्पून गोडा मसाला, १/२ टीस्पून जिरे भाजून केलेली ताजी पुड

कृती:
१) १/२ कप वाल पाण्यात साधारण १२ तास भिजत ठेवावे. वाल भिजले कि पाणी काढून चाळणीत निथळत ठेवावे. नंतर स्वच्छ सुती कपड्यात घट्ट बांधून उबदार जागी ठेवावे. मोड यायला किमान १० तास तरी लागतील. जर हवामान थंड असेल तर अजून वेळ लागू शकतो. मोड आले कि वाल कोमट पाण्यात घालावे. १० मिनिटानी सोलावेत. वाल खूप नाजूक असतात, आणि काळजीपूर्वक सोलले नाहीत तर ते तुटू शकतात. १/२ कप वालाच्या साधारण १ कप डाळिंब्या तयार होतात.
२) पडवळ मधोमध उभे चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. आणि १ सेमीचे तुकडे करावे.
३) तेल तापवून मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. डाळिंब्या आणि पडवळ घालावे. थोडे पाणी शिंपडावे आणि थोडे मीठ घालावे.
४) झाकण ठेवून मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. मध्येमध्ये थोडे पाणी घालावे म्हणजे कढईच्या तळाला भाजी चिकटून करपणार नाही. तरीही खूप जास्त पाणी एकावेळी घालू नये. यामुळे भाजीचा स्वाद कमी होतो. मध्येमध्ये गरजेपुरतेच थोडेसे पाणी घालावे.
५) एक डाळिंबी घेउन बोटाने चेपून पहावी. जर शिजली असेल तर नारळ, गूळ, मीठ आणि रस राहील इतपत पाणी घालावे. या भाजीला थोडा रस चांगला लागतो. खूप सुकी झाली भाजी तर तेवढी चविष्ट लागत नाही.
भाजी शिजली कि पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टिप्स:
१) जर ऐच्छिक साहित्य वापरायचे असेल तर कोकम डाळिंबी-पडवळ बरोबरच घालावे. आणि गोड मसाला व जिरेपूड नारळ घालताना त्याबरोबर घालावी.
२) पडवळ आणि डाळिंब्यांचे प्रमाण आवडीनुसार बदलता येईल. माझ्या घरी या भाजीत डाळिंब्या पडवळापेक्षा जास्त असलेल्या आवडतात. जर पडवळ जास्त असावे असे वाटत असेल तर पडवळाचे प्रमाण जास्त ठेवावे.

Wednesday, 1 June 2011

दह्यातील काकडी कोशिंबीर - Cucumber Yogurt Raita

Cucumber Raita in English

वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: १० मिनीटे

cucumber raita, kakdichi koshimbir, dahyatil kakdi koshimbir, Indian raita, biryaniसाहित्य:
१ कप बारीक चोचवलेली काकडी (आधी काकडी सोलावी)
३/४ कप दही, घोटून
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ टिस्पून तूप
२ चिमटी जिरे
चवीपुरते मिठ

कृती:
१) चोचवलेली काकडी आणि दही एकत्र करावे. मिरची आणि थोडेसे मिठ एकत्र करून चुरडावे आणि दही-काकडीमध्ये घालावे.
२) लहान कढल्यात तूप गरम करून जिरे फोडणीस घालावे. जिरे तडतडले कि दही-काकडीत घालावे.
३) कोथिंबीर आणि लागल्यास मिठ घालून मिक्स करावे.
हे रायते रोजच्या जेवणात तोंडीलावणी म्हणून छान लागते.

टीपा:
१) रायते अजून तिखट हवे असल्यास अजून थोडी मिरची चुरडून घालावी.
२) सर्व दही एकदम काकडीत घालू नये. थोडे घालून मिक्स करून लागेल तसे दही घालावे. जर तुम्हाला जास्त दही हवे असेल तर अजून दही घातले तरीही चालेल.
३) १ ते २ टेस्पून दाण्याचा कूटही घालू शकतो.