Wednesday, 27 June 2012
दही साबुदाणा - Dahi Sabudana
वेळ: १० मिनिटे (साबुदाणा भिजलेला असल्यास)
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
१ कप साबुदाणा
१/२ कप पातळ ताक
२ ते ३ टेस्पून सायीचे दही (साईसकट) (टीप)
१ ते दीड कप साधे दही (गरजेप्रमाणे कमी-जास्त करावे)
फोडणीसाठी: २ टीस्पून साजूक तूप, १/४ टीस्पून जिरे, २ हिरव्या मिरच्या (बारीक तुकडे)
२ ते ३ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ ते २ टीस्पून साखर
कृती:
१) साबुदाणा एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालावा. साबुदाणा हाय पॉवरवर १ मिनिट मायक्रोवेव्ह करावा. बाहेर काढून ढवळावे आणि परत २ वेळा १-१ मिनिट मायक्रोवेव्ह करावा. साधारण ३-४ मिनिटात साबुदाण्याचा रंग थोडा बदलतो आणि किंचित फुललेलाही दिसतो.
२) मायक्रोवेव्ह केलेला साबुदाणा गार होवू द्यावा. नंतर एका पातेल्यात ठेवून त्यात पाणी घालावे. पाणी लगेच निथळून टाकावे. साधारण १/२ ते १ तासाने यात १/२ कप ताक घालावे. झाकण ठेवून साबुदाणा ४ ते ५ तास भिजू द्यावा.
३) साबुदाणा भिजला कि तूप, जिरे आणि हिरव्या मिरच्या अशी फोडणी करावी. हि फोडणी भिजलेल्या साबुदाण्यावर घालावी. दाण्याचा कूट, मिठ आणि थोडी साखरही घालावी.
४) साबुदाणा सुरीने किंवा काट्याने थोडा मोकळा करून घ्यावा. त्यात दही घालून मिक्स करावे. कोथिंबीर घालून एकदा ढवळावे. चव पाहून मीठ किंवा साखर गरजेनुसार घालावी.
लगेच सर्व्ह करावे.
टीपा:
१) सायीचे दही ऐच्छिक आहे पण त्यामुळे साबुदाणा चांगला मिळून येतो आणि सायीच्या दह्याची चवही उत्तम लागते.
२) दह्याचे प्रमाण नक्की नाही, अंदाजाने घालावे.
३) वरील रेसिपी बनवताना कोथिंबीर चिरून आणि थोड्याशा मिठात चुरडून घ्यावी. कोथिंबीर चुरडून घातल्याने स्वादही छान लागतो आणि दही-साबुदाणा खाताना कोथिंबीर दातात येत नाही.
४) साबुदाणा कढईतसुद्धा भाजता येईल. मध्यम आचेवर साबुदाणा कढईत सारखा ढवळत राहावा. रंग बदलला कि आच बंद करावी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment