Pages

Showing posts with label Dessert. Show all posts
Showing posts with label Dessert. Show all posts

Thursday, 13 September 2012

Milk Powder Pedha (Microwave Method)

Milk Powder Peda in Marathi

Time: 15 minutes
Makes: 20 small pedas


Ingredients:
1 cup Milk powder
1/2 cup Condensed milk
2 tsp pure ghee
1/2 tsp cardamom powder

Method:
1) Mix milk powder, condensed milk and pure ghee into a microwave-safe bowl. Microwave for 30 seconds. Stir and microwave for 1 minute.
2) Take the bowl out. Stir for a minute. Microwave for 30 seconds twice. Stir well each time.
3) Mixture should become thick now. However, if you think it needs to be little thick, microwave for 30 seconds. Add cardamom powder and mix well.
4) Let the mixture cool down. Once mixture becomes handleable, make pedas.

Tips:
1) These pedas become slightly chewy in first few hours. However, they harden next day. Try them on a small quantity first.
2) You may add essence like butterscotch, vanilla, saffron etc.
3) 1/2 cup Cashew powder or almond powder can be substituted for 1/2 cup milk powder.

Wednesday, 8 August 2012

कडबू - Kadbu

Kadbu in English

वेळ: ४५ ते ५० मिनिटे
वाढणी: १५ ते १६ कडबू

साहित्य:
१ कप पुरण (पुरणपोळीला करतो तसेच पुरण)
१ कप गव्हाचे पीठ (कणिक)
२ टीस्पून तेल
तेल किंवा तूप कडबू तळण्यासाठी
चिमूटभर मीठ

कृती:
१) पुरण बनवण्यासाठी चणाडाळ कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळून टाकावे. या पाण्याची कटाची आमटी बनवता येते.
२) पुरण बनवायला जेवढी चणाडाळ घेतली असेल तेवढाच गुळ घ्यावा, गोड जास्त हवे असेल तर २ चमचे गुळ जास्त घालावा. शिजलेली डाळ गरम असतानाच त्यात गुळ घालावा. आणि घट्ट होईस्तोवर पुरण ढवळावे. १/२ टीस्पून वेलची पूड आणि २ चिमटी जायफळ पूड घालावी.
३) २ टीस्पून गरम तेल गव्हाच्या पिठात घालावे. त्यात १ चिमटी मीठ घालावे. पाणी घालून घट्टसर माळून घ्यावे. पीठ १५ मिनिटे झाकून ठेवावे.
४) पीठाचे १ इंचाचे गोळे करावे. गोळे लाटून त्यात मध्यभागी पुरण ठेवावे. कडा जोडून करंजी बनवावी. कातण्याने कडा कापून घ्याव्यात. करंज्या घट्ट पिळलेल्या सुती कपड्याखाली झाकाव्यात. अशाप्रकारे सर्व करंज्या करून तुपात तळून घ्याव्यात.
करंज्या गरमच छान लागतात. वाढताना चमचाभर पातळ तुप घालावे.

Wednesday, 4 July 2012

सॉर क्रीम कॉफी केक - Sour Cream Coffee Cake

Sour Cream Coffee Cake in English

वेळ: ६० ते ७० मिनिटे
१० जणांसाठी

साहित्य:
टॉपींगसाठी::
१/४ कप ब्राउन शुगर, चेपून भरलेली
१ टीस्पून दालचीनी पुड
३/४ कप अक्रोड
केकसाठी::
१ कप घट्टसर सॉर क्रीम
१ टीस्पून बेकिंग सोडा
१ + ३/४ कप मैदा
दीड टीस्पून बेकिंग पावडर
१/२ कप अनसॉल्टेड बटर, रूम टेम्प.
१ कप साखर
१/२ टीस्पून मीठ
२ मोठी अंडी
२ टीस्पून वनिला एक्सट्रॅक्ट


कृती:
ओव्हन ३५० F वर प्रीहिट करावे.
१) टॉपींग: अक्रोड ओव्हनमध्ये ८ ते १० मिनिटे टोस्ट करून घ्यावे. अक्रोड टोस्ट झाले कि बाहेर काढून थोडे गार होवू द्यावे. शार्प सुरीने भाजलेले अक्रोड भरडसर चिरावे. किंवा मिक्सरमध्ये अगदी किंचित फिरवावे. आपल्याला थोडा भरडसर अक्रोड हवे आहेत. यात दालचीनी पावडर आणि ब्राउन शुगर घालून मिक्स करावे. हे मिश्रण केकचे मिश्रण तयार होईस्तोवर बाजूला ठेवावे.
२) मध्यम वाडग्यामध्ये सॉर क्रीम आणि बेकिंग सोडा एकत्र करून मिक्स करावे.
३) दुसऱ्या एका भांड्यात मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे.
४) एका मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये बटर, साखर, आणि मीठ एकत्र करून मिश्रण हलके होईस्तोवर फेटावे (साधारण २ ते ४ मिनिटे). एक अंडे फोडून घालावे. मिक्स करून दुसरे अंडे घालावे. वानिला इसेन्सही घालावे आणि फेटावे.
५) मैदा ३ बॅचेसमध्ये घालावा. प्रत्येक बॅच नंतर अर्धे सॉर क्रीम घालावे आणि मिक्स करावे.
६) २ बेकिंग पॅन घ्यावेत (८" x ८" x २"). पॅनला आतून चांगले बटर लावून घ्यावे. मिश्रणाचे २ सारखे भाग करून पॅनमध्ये घालावे. ओव्हनमध्ये साधारण ३० ते ३५ मिनिटे बेक करावे. (३० मिनीटांनंतर केक बाहेर काढून विणकामाच्या सुईने किंवा स्क्युअरने केकच्या मध्यभागी आतपर्यंत टोचून पहावे. सुई जर एकदम क्लीन बाहेर आली तर केक झाला. सुईवर जर ओलसर केक बॅटर लागलेले असेल तर अजून काही मिनिटे केक बेक करावा.)
केक बेक झाल्यावर गार होवू द्यावा. सुरीने पॅनच्या कडेने सोडवून घ्यावा. कापून सर्व्ह करावा.

टीप:
१) जास्त खोलगट केक टीन असेल आणि केक एकाच भांड्यात करायचा असेल तर बेकिंगसाठी ४५ ते ५० मिनिटे लागतील. तसेच या केकला तयार टॉपींगचा आणखी एक लेयर देउ शकतो. त्यासाठी अर्धे बॅटर केक टीनमध्ये घालून त्यावर एकूण टॉपींगपैकी अर्धे टॉपींग घालावे त्यावर बॅटर घालून वरती परत टॉपींग घालावे. केक बेक करावा.
२) सॉर क्रीमला घट्ट आंबट दही पर्याय म्हणून वापरू शकतो. (दही आंबट असावे, आंबूस वास येत असलेले दही वापरू नये.)

Friday, 16 March 2012

मालपुवा - Malpuva

Malpua in English

वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: ८ ते १० मालपुवे


indian sweet, malpua, north indian sweetसाहित्य:
मालपुवाची धिरडी
१ कप मैदा
३/४ कप खवा
२ टेस्पून रवा
१ चिमुटभर बेकिंग सोडा
दीड कप दुध (रूम टेम्प.)
१ चिमटी मीठ
२ चिमटी बडीशेप
१/२ कप तूप
साखर पाक
१ कप साखर
१ कप पाणी
१ टीस्पून वेलचीपूड
१ चिमटी केशर
सजावटीसाठी
२ टेस्पून पिस्ते, भरडसर चिरलेले
केशर

कृती:
१) एक मध्यम वाडगे घ्यावे. त्यात मैदा, खवा, दुध, आणि मीठ घालून मिक्स करावे. मिश्रण एकदम स्मूथ व्हावे म्हणून मिक्सरमध्ये १०-१५ सेकंद फिरवावे. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यात बडीशेप घालून मिक्स करावे. मिश्रणाची कान्सीस्टन्सी इडलीच्या पिठाइतपत पातळ हवी. खूप घट्ट नको आणि एकदम पाणीसुद्धा नको.
२) साखरेचा पाक बनवण्यासाठी साखर, केशर आणि पाणी एकत्र करून पातेल्यात उकळत ठेवावे. ५ ते ६ मिनिटे मोठ्या आचेवर उकळी काढावी. पाकात चमचा बुडवून लहान ठिपका एका प्लेटमध्ये टाकावा. हा ठिपका ४-५ सेकंदातच हाताळण्यायोग्य होईल. अंगठा आणि पहिले बोट यात पाक धरून उघडझाप करा. आणि एक तार आली तर पाक तयार झाला असे समजावे. जर तार आली नाही तर अजून २-३ मिनिटे उकळी काढावी.
३) साखरेचा पाक तयार झाला कि एकदम मंद आचेवर हा पाक ठेवून द्यावा. गॅस बंद करू नये. पाक थोडा कोमट राहू द्यावा.
४) पाक तयार झाला कि लगेच धिरडी घालायला घ्यावीत. मिश्रणात बेकिंग सोडा घालून मिक्स करावे.
५) एक लहान फ्रायिंग पॅन गरम करून त्यात १ टेस्पून तूप घालावे. तूप वितळले कि एक डावभर मिश्रण घालून पातळसर धिरडे घालावे. मिडीयम-हाय फ्लेमवर दोन्ही बाजूनी लालसर शेकून घ्यावे.
६) तयार धिरडे गरम असतानाच पाकात घालावे. २ मिनिटे पाक मुरावायला ठेवावे. तयार मालपुवा प्लेटमध्ये काढून पिस्ता, केशर घालून लगेच सर्व्ह करा.
अशाप्रकारे सर्व मालपुवे तयार करा.

टीपा:
१) मालपुवा गरम असतानाच खावा. थंड झाल्यावर चव एकदम उतरते आणि पाक शोषल्याने मालपुवा फुगतो.
२) मी मालपुवा शालो फ्राय केला होता. पण मालपूवे भरपूर तुपात बनवतात. तुम्हाला आवडीप्रमाणे तूप कमी जास्त करता येईल. पण एकदम कमी तूपातही मालपुवा चांगला लागत नाही.
३) मालपुवा तूपतच बनवा, तेलात बनवू नका. तूपाऐवजी चालत असल्यास डालडामध्येही बनवू शकता.
४) मालपुवे पातळ बनवा. जाड मालपुवे वाईट लागत नाहीत पण पातळ असले कि जास्त छान लागतात.

Thursday, 24 November 2011

चॉकोलेट ट्रायफल - Chocolate Trifle

Chocolate Trifle in English

वाढणी: ४
वेळ: १५ मिनिटे
chocolate trifle, chocolate dessert, black forest cakeसाहित्य:
२ कप चॉकोलेट केक किंवा चॉकोलेट ब्राउनीचा चुरा
२० चेरीज, अर्धे दोन भाग करून त्यातील बिया काढून टाकाव्यात
२ ते ३ टेस्पून साखर
१/४ कप पाणी
अडीच कप व्हीप्प्ड क्रीम
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून कोको पावडर (अनस्वीटन्ड)
मिल्क चॉकोलेट, किसलेले (सजावटीसाठी)

कृती:
साखर पाकातल्या चेरीज
१) एक लहान पॅन घ्या. त्यात साखर आणि पाणी घाला. मिक्स करून गॅसवर ठेवा.साखर विरघळेस्तोवर मिक्स करावे. चेरीज घालून मध्यम आचेवर शिजवावे. चेरीज मऊ होवून त्यातील रस निघायला लागला कि गस बंद करावा. ज्यूस गाळून एका वाटीत काढून घ्यावा. चेरीज दुसऱ्या लहान वाडग्यात काढून ठेवाव्यात.
चॉकोलेट फ्लेवर्ड व्हीप्प्ड क्रीम
२) मोठा बोल घेउन त्यात गार पाणी भरावे. अजून एक मध्यम आकाराचा बोल घेउन त्यात व्हीप्प्ड क्रीम, साखर, आणि कोको पावडर घालावे. हे बोल गार पाण्याच्या बोलवर तळ टेकेल असे धरावे. यामुळे क्रीम थंड राहील आणि वितळणार नाही. बोल अधांतरी ठेवावे आणि त्यात पाणी जाउ देवू नये. साखर विरघळेस्तोवर व्हिस्क करावे. मिक्स झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.

१ सर्व्हीग कप घ्यावा. त्यात तळाला केकचा एक थर द्यावा. त्यावर थोडे व्हीप्प्ड क्रीम पसरावे. त्यावर थोडे चेरीजचे तुकडे घालावे. परत केकचा, व्हीप्प्ड क्रीमचा आणि चेरीजचा लेयर द्यावा.
फायनली, परत एक केकचा थर आणि व्हीप्प्ड क्रीमचा लेयर द्यावा. वरती चेरी आणि किसलेले चॉकोलेट घालावे. अशाच प्रकारे बाकीचे सर्व्हिंग कप्स भरावे आणि लगेच सर्व्ह करावे.

टीप:
१) लागल्यास केकच्या लेयरवर चमचाभर चेरी शिजवल्यावर राहिलेले शुगर सिरप घालावे.

Sunday, 13 November 2011

गुलाबजाम - Ricotta cheese gulabjamun

Gulabjam in English

वेळ: पूर्वतयारी- ४५ ते ५० मिनिटे | पाकृसाठी- ३० मिनिटे
४० ते ४५ मध्यम गुलाबजाम

gulabjam, indian sweet, gulabjamunसाहित्य:
१ lb रिकोटा चीज (मी लाईट रिकोटा चीज वापरले होते)
३ टेस्पून मैदा
१ चिमटी बेकिंग सोडा
अडीच कप साखर
अडीच कप पाणी
२ ते ३ वेलची
१ चिमूट केशर
गुलाबजाम तळण्यासाठी तेल

कृती:
१) नॉनस्टिक पॅनमध्ये रिकोटा चीज घालावे आणि मध्यम आचेवर आटवावे. आटवताना सतत ढवळत राहावे म्हणजे पॅनला चिकटणार नाही. रिकोटा चीज घट्ट होउन गोळा बनेस्तोवर आटवावे. याला साधारण ३० ते ४० मिनिटे लागतील. आटले कि थंड होवू द्यावे.
२) २ चमचे मैदा आणि चिमूटभर बेकिंग सोडा आटवलेल्या आणि थंड झालेल्या रिकोटा चीज मध्ये घालावा. व्यवस्थित मऊसर मळून घ्यावे. लागल्यास एखाद टीस्पून पाणी घालावे. छान मऊसर मळून घ्यावे.
३) खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये साखर आणि पाणी घालावे. ५ मिनिटे उकळवावे. नंतर आच अगदी मंद करून ठेवावी. केशर आणि वेलची पूड घालावी.
४) मध्यम आचेवर तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याची लहान गोटीएवढ्या आकाराचे गोळे करून घ्यावे. या गोळ्यांना तडा गेलेल्या नसाव्यात. सरफेस एकदम प्लेन असावा.
५) तेलाचे तापमान तपासण्यासाठी एक लहान गोळा तेलात सोडावा. प्रथम गोळा तळाला बसला पाहिजे आणि ५ ते ८ सेकंदानी तेलावर तरंगला पाहिजे. जर तेलात टाकल्यावर गोळा एकदम पटकन वर आला आणि लालसर रंग चढला म्हणजे तेल जास्त तापले आहे [रंग पटकन चढला तर गुलाबजाम आतून कच्चे राहतात.]. अशावेळी आच थोडी कमी करावी आणि थोडावेळ थांबावे. नंतर गुलाबजाम तळावे.
६) तेलाचे तापमान अड़जस्ट झाल्यावर एकावेळी ८ ते १० गुलाबजामचे गोळे तळावेत. तळताना गुलाबजामचे गोळे झाऱ्याने सतत हलवत ठेवावे म्हणजे सर्वबाजूनी रंग सारखा येतो आणि सर्वत्र सारखे शिजतात.
७) गुलाबजामला लाल रंग येईस्तोवर तळावे. झाऱ्याने गुलाबजाम बाहेर काढावे आणि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे. २-३ मिनीटांनी गरम साखरेच्या पाकात घालावे.
८) अशाप्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यावे आणि तळून झाल्यावर २ मिनीटांनी पाकात घालावे.

गुलाबजाम किमान २ तास तरी पाकात मुरू द्यावे. रात्रभर मुरल्यास उत्तम.

टीपा:
१) कमीत कमी मैदा वापरावा. गरजेपेक्षा जास्त मैदा घातल्यास गुलाबजाम चिवट होतात आणि पाक आतापर्यंत मुरत नाही.
२) गुलाबजाम तळल्यावर २ मिनिटे पेपरवर काढून ठेवावे. तळल्या तळल्या लगेच पाकात घातले तर गुलाबजाम वर जे काही थोडेफार तेल असेल ते पाकात उतरते आणि पाकावर तेलाचा तवंग दिसतो. तसेच गुलाबजाम कडकडीत होतात.
३) रिकोटा चीज पासून खवा बनवणे थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे. पण या पद्दतीने बनवलेले गुलाबजाम मऊसूत बनतात. चव तर खव्याच्या गुलाबजामच्या एकदम जवळची बनते.
४) जर गुलाबजाम फुटले तर अगदी थोडा मैदा घालावा आणि मळून परत गुलाबजाम ट्राय करावेत.

Thursday, 20 October 2011

काजू कतली - Kaju Katli

Kaju Katli in English

वेळ: १५ ते २० मिनिटे
१२ ते १५ मध्यम वड्या

काजू कतली, Cashew burfi, kaju barfi, kaju katali, kaju katli, kaju katri, Indian cashew sweetसाहित्य:
सव्वा कप काजूची बारीक पूड
३/४ कप पिठी साखर
१/२ कप मिल्क पावडर
१/४ कप दूध
१ टीस्पून तूप
१/४ टीस्पून वेलचीपूड
चांदीचा वर्ख सजावटीसाठी

कृती:
१) सव्वा कपपैकी १ कप काजू पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दुध आणि वेलची पावडर एका काचेच्या बोलमध्ये एकत्र करावे. नीट मिक्स करावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.
२) मिश्रण २ ते ३ मिनिटे मायक्रोवेव करावे. दर ५० सेकंदानी ढवळा. मिश्रण चांगले उकळले की बाहेर काढावे. आळेस्तोवर मध्येमध्ये ढवळावे.
३) मिश्रण जरा आळले कि त्यात लागल्यास थोडी काजू पावडर घालावी. नीट मिक्स करून कणिक जेवढी घट्ट असते तसा गोळा तयार करावा.
४) पोळपाटाला किंवा फ्लॅट सरफेसला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटावी. चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात.

टीपा:
१) काजूची पूड एकदम बारीक असावी. वाटल्यास बारीक केकेली पूड बारीक चाळणीने चाळून जाडसर काजूची पूड परत बारीक करावी.
२) काजू कतली मिश्रणात थोडे केशर घातले तरी रंग आणि चव खूप छान येते. गरम दुधामध्ये २-३ चिमटी केशर भिजवून चिमटीने कुस्करून घ्यावे. आणि हे दुध मिश्रणात घालावे.
३) मिल्क पावडरऐवजी हलकासा भाजलेला खवा वापरला तरीही चालेल.

कलाकंद - Kalakand

Kalakand In English

वेळ: ३० मिनिटे
१५ मध्यम तुकडे

kalakand, Indian sweet, paneer kalakand, khova kalakandसाहित्य:
१ लिटर दुध
१/२ टीस्पून सायट्रिक अॅसीड किंवा एका लिंबाचा रस
दीडशे ग्राम खवा
३/४ कप साखर (साधारण १५० ते १७५ ग्राम)
१/२ टीस्पून वेलची पुड
पिस्त्याचे पातळ काप

कृती:
१) दुध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले कि त्यात चिमटीचिमटीने सायट्रिक अॅसीड घालून तळापासून ढवळावे. दुध फाटले कि सुती कपड्यावर पनीर गाळून घ्यावे.
२) गाळलेले पनीर फडक्यातच असताना गार पाण्याने थोडे धुवून घ्यावे म्हणजे लिंबाची/ सायट्रिक अॅसीडची आंबट चव आणि वास निघून जाईल. गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.
३) खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. साखर वितळली कि मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी पनीर आणि वेलची पुड घालावी.
४) पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच टीनच्या ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे. वरून पिस्त्याचे काप घालावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

वड्या उरल्या तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

टीपा:
१) आवडीनुसार खवा किंवा पनीरचे प्रमाण कमीजास्त करावे.
२) पनीर ताजेच बनवावे. तसेच दुध फाटल्यावर गाळून, घट्ट पिळून लगेच पनीर वापरावा. पाणी निथळण्यासाठी खूप वेळ टांगून ठेवू नये.
३) मी वेलची-केशर यांचे रेडीमेड सिरप मिळते ते चमचाभर वापरले होते. त्यामुळे रंगही पिवळसर येतो आणि केशर वेलचीचा स्वादही छान येतो.
४) मी खवा रिकोटा चीजपासून बनवला होता. साधारण ४२५ ग्राम रिकोटा चीजपासून पावणे दोनशे ग्राम खवा बनतो.
५) ३/४ कप साखरेमुळे बेताचे गोड होते. अजून गोड हवे असेल तर २ ते ३ टेस्पून साखर वाढवावी.
६) मिश्रण ट्रेमध्ये थापल्यानंतर वरून चांदीचा वर्खही लावू शकतो. त्यामुळे कलाकंद अधिक आकर्षक दिसेल.

Friday, 14 October 2011

पाईनॅपल पेस्ट्री - Pineapple layer cake Pastry

Pineapple Pastry in English

वेळ: १५ मिनिटे

pineapple pastry, pineapple cake, birthday cake recipeसाहित्य:
८ oz व्हीप क्रीम (कूल व्हीप)(टीप १ आणि २)
२ ते ३ टेस्पून पिठी साखर
४ ते ५ थेंब पाईनॅपल इसेन्स
१/४ कप पाईनॅपलचे छोटे तुकडे
८ ते १० ग्लेझ चेरीज
२ पाईनॅपल स्पंज केकच्या आयताकृती शीट्स (८ x ४ x १) (टीप ३ )
१० x १० इंचाचा चौकोनी कार्डबोर्ड (पुठ्ठा), अलुमिनियम फॉईलमध्ये रॅप केलेला
sponge cake, dessert, whipping cream, whipped cream
कृती:
१) व्हीप क्रीममध्ये पाईनॅपल इसेन्स आणि साखर घालून हलकेच मिक्स करावे. जोरजोरात फेटू नये. व्हीप्प क्रीमचे फोमी टेक्स्चर निघून जाते. आणि मोजक्याच वेळा मिक्स करावे.
२) कार्डबोर्डवर एक केकची शीट ठेवावी. त्यावर व्हीप क्रीम पसरावे. आणि अननसाचे तुकडे घालावेत.
३) त्यावर दुसरी केकची शीट ठेवावी. त्यावरही व्हीप क्रीम पसरावे आणि उभ्या चारही बाजूंना व्हीप क्रीमचा समान थर लावावा.
४) आयसिंग बॅग असल्यास त्यात व्हीप क्रीम भरून केक डेकोरेट करावा. वरती अननसाचे तुकडे आणि चेरी यांनी केक सजवावा. कापून लगेच सर्व्ह करावा किंवा फ्रीजमध्ये ठेवावा.

टीपा:
१) रूम टेम्परेचरला व्हीप क्रीम वितळते, म्हणून व्हीप क्रीम हाताळताना जलद गतीने काम करावे. आधी सर्व साहित्य तयार ठेवून मगच व्हीप क्रीम फ्रीजच्या बाहेर काढावे.
२) मी रेडीमेड व्हीप क्रीम वापरले होते. जर व्हीप क्रीम घरी बनवायचे असेल तर हेवी क्रीम आणावे. हेवी क्रीम आणि काचेचे एक खोलगट भांडे एकदम थंड करावे. बाहेर काढून लगेच हॅंड मिक्सरने फेटावे. क्रीम सॉफ्ट पिकला पोहोचले कि त्यात २टेस्पून साखर आणि थोडा पाईनॅपल इसेन्स घालावा. क्रीम केकवर पसरण्याइतपत घट्ट आणि फोमी होईस्तोवर फेटावे.
३) केकचे मिश्रण केक टीनमध्ये ओतल्यावर आत हवेचे बुडबुडे राहिले असले तर बेक करताना ते बाहेर पडतात आणि केकवर टेकडीसारखा बंप तयार होतो. जेव्हा पेस्ट्री बनवाची असते तेव्हा प्लेन सरफेसचा केक लागतो. म्हणून हा उंचवटा सुरीने कापून केक प्लेन करावा. नंतर चौरस आकाराचा केक मधोमध कापून दोन समान आयात तयार करावेत. अशाप्रकारे दोन समान आयताकृती केक शीट मिळतील.

Wednesday, 12 October 2011

पाईनॅपल केक - Pineapple Flavored Cake (With Egg)

Pineapple Flavored Cake recipe in English

वेळ: पूर्वतयारी- २० मिनिटे | बेकिंगसाठी- ५० मिनिटे
१५ ते १६ पिसेस

pineapple cake, pineapple flavored cake, easy cake recipe, sponge cake, pound cake
हा केक अंडी न वापरताही करू शकतो. रेसिपी लिंक आणि काय काय बदल करावे ते
टीप नंबर ५ मध्ये लिहिले आहे

साहित्य:

दीड कप मैदा
दीड स्टिक अनसॉल्टेड बटर, रूम टेम्परेचर (दीड स्टिक = ३/४ कप)
१ कप ग्रानुलेटेड साखर
३ मध्यम अंडी (रूम टेम्परेचर)
१/४ ते १/२ टीस्पून पाईनॅपल इसेन्स
१ टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा
२ टेस्पून दही
१/२ कप दूध (रूम टेम्परेचर)
चिमूटभर मीठ
pineapple cake, eggless pineapple cake, Pineapple pastryकृती:
१) ओव्हन ३५० F (१७५ C) किमान १० मिनिटे प्रीहिट करावे. ८" x ८" चा पॅन आतून बटर लावून ग्रीस करावा.
२) मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, आणि मीठ चाळणीतून दोनदा चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे बारीक गोळे असतील तर हाताने फोडावेत.
३) मोठ्या ग्लास बोलमध्ये साखर आणि बटर घालावे. हॅंड मिक्सरने किंवा इलेक्ट्रॉनिक स्टॅंड मिक्सरने मध्यम स्पीडवर मिश्रण फेटावे. मिश्रण क्रिमी होईस्तोवर फेटावे. १ ते २ मिनिट लागतील.
४) आता अंडी फोडून घालावीत. आणि परत फेटावे. मिश्रण एकदम हलके आणि फ्लफी होईल. मिश्रण फ्लफी झाले कि फेटणे थांबवावे. {अंडी किंवा बटर प्रमाणाबाहेर फेटल्यास विलग होउन मिश्रण फाटल्यासारखे दिसते.}
५) दही आणि पाईनॅपल इसेन्स घालावा. मैदा आणि दुध ३ बॅचेसमध्ये आलटून पालटून घालावे. मैदा नीट मिक्स होईस्तोवरच मिश्रण फेटावे.
६) बटर लावलेल्या पॅनमध्ये मिश्रण ओतावे. मिश्रण सर्वत्र सारखे पसरले पाहिजे. त्यासाठी लाकडी किंवा प्लास्टिक कालथ्याने मिश्रण एकसारखे पसरवा. पृष्ठभाग प्लेन करा.
७) पॅन ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर ठेवून ओव्हन बंद करा. ४० ते ४५ मिनिटे बेक करा.
८) ४० मिनिटानंतर केकच्या मध्यभागी स्क्यूअरने आतपर्यंत टोचून बाहेर काढा. जर स्क्यूअरवर केकचे बॅटर लागले असेल तर अजून ७-८ मिनिटे बेक करा आणि परत मध्यभागी "स्वच्छ" केलेली स्क्यूअर टोचून पहा. जर त्यावर केक बॅटरचा अजिबात अंश नसेल तर केक झाला असे समजावे.
साधारण ४५ मिनिटात केक बेक होतो.

टीपा:
१) केक बॅटरमध्ये फ्रेश अननसाचे तुकडे घालू नकात. अननसातील रसामुळे केक आतून ओला राहतो. वाटल्यास सुकवलेले अननसाचे तुकडे वापरू शकता.
२) एकदा का मिश्रण बेकिंगसाठी ओव्हनमध्ये गेले कि ओव्हन उघडू नये. आतील तापमान कमी झाल्याने केक बेक होण्यात बाधा निर्माण होते.
३) जर एकदम मोठी अंडी वापरत असाल तर ३ ऐवजी २ अंडी पुरे होतील.
४) दही (आंबट पदार्थ) घातल्याने बेकिंग सोडा कार्यरत होउन कार्बन डाय ऑक्साईड वायू तयार करतो. ज्यामुळे केक फ्लफी होतो. फक्त मिक्सिंगचे काम जमेल तेवढ्या जलद करावे म्हणजे बेकिंग सोड्याचा परिणाम जास्त चांगला होईल.
५) एगलेस केक रेसिपीसाठी इथे क्लिक करा
फक्त वानिला इसेंसऐवजी पाईनॅपल इसेन्स वापरा. "एगलेस केक" रेसिपीमध्ये दिलेले साहित्याचे प्रमाण हे वरील रेसिपीपेक्षा निम्मे आहे. त्यानुसार आठच केक पिसेस होतील म्हणून जर १६ पिसेस हवे असतील तर प्रमाण दुप्पट करा.

Wednesday, 28 September 2011

चॉकोलेट ब्राउनी सिझलर - Brownie Sizzler

Chocolate Brownie Sizzler in English

वेळ: १५ मिनिटे
४ जणांसाठी

chocolate brownie sizzler, sizzler recipesसाहित्य:
४ चॉकोलेट ब्राउनीज
चॉकोलेट सॉससाठी:- १ मिल्क चॉकोलेटचा बार, १/२ कप दुध
वेनिला आईसक्रीम
सिझलर प्लेट आणि त्याच्याखालील लाकडी ट्रे
ड्राय फ्रुट्स (अक्रोड आणि बदामाचे काप)

कृती:
१) चॉकोलेट सॉससाठी आधी चॉकोलेट वितळवण्याची गरज आहे. चॉकोलेटचे मध्यम तुकडे करून काचेच्या बोलमध्ये ठेवून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. एग बिटरने ढवळावे. गरजेप्रमाणे १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. प्रत्येकवेळी ढवळून पहावे. कारण मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ आतून बाहेर असे कुक होतो. गरजेपेक्षा जास्त मायक्रोवेव्ह केल्यास चॉकोलेट करपेल.
२) एकदा चॉकोलेट वितळले कि त्यात दुध घालून जोरात ढवळावे आणि गुठळ्या राहू देवू नयेत. थोडे थोडे दुध घालावे आणि मिक्स करावे. स्मूथ आणि चकचकीत असा सॉस बनेस्तोवर फेटावे. (सॉस जितका पातळ हवा असेल त्याप्रमाणे दुध जास्त-कमी करावे.)
३) ब्राउनिज जर गर असतील तर १० ते १५ सेकंद मायक्रोवेव्ह कराव्यात. म्हणजे थोड्या कोमट होतील.
४) सिझलर प्लेट गॅसवर गरम करावी. व्यवस्थित गरम होवू द्यात. पक्कडीने काळजीपूर्वक हि प्लेट लाकडी ट्रे मध्ये ठेवावी. मधोमध ब्राउनिज ठेवाव्यात. प्रत्येक ब्राउनीवर एकेक स्कूप वेनिला आईसक्रीम घालावे. आणि वरून चॉकोलेट सॉस घालावा. हा सॉस सिझलर प्लेटवर ओघळला पाहिजे. म्हणजे तो छान सिझल होईल. वरून अक्रोड बदामचे तुकडे घालून गर्निश करावे आणि लगेच सर्व्ह करावे.

कसे खावे? - चमच्यात आईसक्रीम + ब्राउनी + चॉकोलेट सॉस हे तीन्हीचे छोटे चंक्स घेउन खावे.

टीपा:
१) चॉकोलेट सॉस सिझलर प्लेटवर चिकटू नये म्हणून प्लेट गरम करताना त्यावर अल्युमिनम फॉइलचा तुकडा ठेवावा. आणि त्यावर मग ब्राउनी, आईसक्रीम आणि चॉकोलेट सॉस घालावा.
२) चॉकोलेट ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर तुम्ही नोटीस कराल कि बाहेरून चॉकोलेट वितळले नाहीये. पण ढवळल्यावर लक्षात येईल कि आतून चॉकोलेट मेल्ट व्हायला लागले आहे. म्हणून पहिली ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर, ढवळून गरजेनुसार १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. आणि प्रत्येकवेळी ढवळून चेक करावे.
३) खाताना काळजीपूर्वक खावे. सिझलर प्लेटवर जो सॉस आहे तो प्रचंड गरम असतो. आणि जीभ पोळू शकते. म्हणून सॉस कितपत गरम आहे ते चेक करूनच खावे.

Tuesday, 17 May 2011

मँगो आइसक्रीम - Mango Ice cream

Mango Icecream in English

A delicious Homemade Mango Ice-cream.

वेळ: ३० ते ३५ मिनीटे
८ जणांसाठी

Mango Icecream, how to make Icecream at home, eggless icecream, creamy ice creamसाहित्य:
१ कप हेवी व्हिपींग क्रिम, थंडगार
२ कप आंब्याचा रस, थंडगार (मी रेडीमेड कॅन मधील साखर असलेला आंबा रस वापरला होता)
१/२ कप पिठी साखर
वेलचीपूड (ऐच्छिक)

homemade delicious mango icecream, whipping cream, mango pulp, heavy whipping creamकृती:
१) एक मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बोल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
२) गार झालेले काचेचे बोल घेऊन त्यात गार व्हिपींग क्रिम घाला आणि हॅण्ड मिक्सरने जास्त स्पिडवर फेटा.
३) क्रिम थोडे फ्लफी व्हायला लागले कि २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रिम व्यवस्थित फ्लफी झाले कि फेटणे थांबवावे. गरजेपेक्षा जास्त फेटल्याने क्रिम पिवळसर होवून त्यातील स्निग्धांश (fat content) विलग होतो.
४) यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलचीपूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो एसेन्स घालायचा असल्यास २ -३ थेंब घाला. निट मिक्स करा.
५) जर तुमच्याकडे आइसक्रिम मशिन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटवा.
६) जर आईसक्रिम मशिन नसेल तर हे मिश्रण फ्रिझर सेफ प्लास्टिक किंवा फ्रिझर सेफ मेटलच्या भांड्यात घाला (बेकिंगसाठी जे मेटलचे भांडे वापरतात तेही चालेल). साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रिजरमधून काढा. आईसक्रिम भांड्याच्या कडेने सुटेस्तोवर थांबा. नंतर हे गोठलेले मिश्रण मिक्सरमध्ये काही मिनीटे ब्लेंड करा. परत भांड्यात ओतून १-२ तास फ्रिजमध्ये ठेवा. २ तासांनी परत मिक्सरमध्ये फिरवा. असे किमान ३ ते ४ वेळा करा म्हणजे आईसक्रिम स्मूथ लागेल.

टीपा:
१) रेडीमेड आमरसाऐवजी घरी बनवलेला हापूस आंब्याचा रसही वापरता येईल. फक्त आमरस चाळणीतून गाळून घ्यावा म्हणजे गुठळ्या किंवा आंब्यातील धागे निघून जातील. तसेच घरगुती आमरस वापरल्यास जास्त साखरही घालावी लागेल तेव्हा चव पाहून साखर घालावी.
२) भाजलेला खवाही आईसक्रिममध्ये वापरू शकतो. वरील प्रमाणासाठी १/२ ते १ कप खवा वापरावा.
३) बारीक चिरलेले बदाम पिस्ताही घालू शकतो.
४) ३-४ वेळा मिक्सरमध्ये मिश्रण ब्लेंड केल्याव शेवटी जेव्हा आईसक्रिम सेट करण्यास ठेवाल त्यावेळी आंब्याचे साल काढून बारीक तुकडे मिश्रणात घालू शकता, छान लागतात.

Wednesday, 4 May 2011

आम्रखंड - Amrakhand

!! अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

Amrakhand in English
वेळ: ३० मिनीटे
५ ते ६ जणांसाठी

amrakhand, sweets, shrikhand puri, Gudhi padvaसाहित्य:
३२ OZ चोबानी प्लेन ग्रिक योगर्ट किंवा १/२ किलो चक्का
३/४ ते १ कप आंब्याचा रस (मी कॅनमधील मँगो पल्प वापरला होता)
१ कप साखर
१/२ टिस्पून वेलची पावडर
२ टेस्पून चारोळी
२ टेस्पून पिस्ता, जाडसर पूड करावी किंवा पातळ काप करावे

कृती:
१) ग्रिक योगर्ट सुती कपड्यात बांधून ८ ते १० तास त्यातील पाण्याचा अंश जाईस्तोवर लटकवून ठेवा. खाली एखादे पसरट भांडे ठेवा म्हणजे गळलेले पाणी त्यात जमा होईल.
२) तयार चक्का मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये घ्यावा. त्यात १/२ कप आंब्याचा रस आणि १/२ कप साखर घाला. मिक्स करून १५ मिनीटे साखर विरघळण्यासाठी तसेच ठेवून द्या. परत चमच्याने घोटून चव पाहा. जर आंब्याचा फ्लेवर तसेच गोडपणा हवा असेल तर आवडीप्रमाणे आंब्याचा रस आणि साखर घाला. नंतर पूरणयंत्रातून हे मिश्रण फिरवून घ्या.
३) यात वेलचीपूड, चारोळी, पिस्ता घालून मिक्स करा. फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा आणि पुर्‍यांबरोबर सर्व्ह करा.

टीपा:
१) चक्क्यामध्ये एकाचवेळी सर्व आंब्याचा रस आणि साखर घालू नये. साखर चक्क्यात विरघळली कि चक्का थोडा पातळ होतो. तसेच आंब्याच्या रसाचा पातळपणा आहेच. म्हणून बेताबेताने आंबारस आणि साखर घालून चव पाहावी. आणि गरजेनुसार जिन्नस वाढवावे.
२) घरी काढलेला हापूस आंब्याचा रस रेडीमेड आमरसाऐवजी वापरू शकतो. हा रस पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करावा आणि गाळून घ्यावा. तसेच वरील प्रमाणापेक्षा जास्त साखर घालावी लागेल.
३) किंचीत भरड ठेवलेली साखर किंवा ग्रॅन्युलेटेड शुगर वापरल्यास कदाचित चक्का-साखर पूरणयंत्रातून बारीकही करावे लागणार नाही. फक्त एकदम बारीक पिठी साखर शक्यतो वापरू नये, श्रिखंडाचे टेक्श्चर बदलते.
४) वेलचीऐवजी जायफळ पूडसुद्धा वापरू शकतो.
५) पिस्त्याबरोबर बदाम काजू ही घातले तरी छान लागतात.

Thursday, 28 April 2011

प्रेशर कूकरमधील केक - Pressure Cooker Cake

Cake in Pressure cooker in English

८ ते १० मध्यम तुकडे
पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ मिनीटे

pressure cooker cake, Cake in pressure cooker, chocolate cake in cookerसाहित्य:
३/४ कप मैदा
२५० ते ३०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ ते ३/४ कप )
१/४ कप बटर (मिठविरहित)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)

how to bake cake in pressure cookerकृती:
१) प्रेशर कूकरमधील रींग आणि शिट्टी काढून ठेवावी. आणि प्रेशर कूकर झाकण लावून मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवावा. साधारण ८ ते १० मिनीटे गरम करावा. कूकरमध्ये पाणी घालू नये. कोरडाच गरम करावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे. केकटीनला आतून बटरचे कोटींग करावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. बॅटर एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेपुरतेच बॅटर एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे. खुप जास्त फेटल्याने केक मध्यभागी सिंक होतो.
५) तयार बॅटर केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). कूकरची आच मध्यम करावी. गरम कूकरचे झाकण उघडून त्यात पकडीच्या सहाय्याने केकटीन ठेवावा. झाकण लावावे आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. २५ मिनीटे होईस्तोवर कूकर अजिबात उघडू नये. बेकिग करताना मधेमधे झाकण उघडल्यास कूकरच्या आतील तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण २५ मिनीटांनी कूकरचे झाकण उघडावे. आता केक फुललेला दिसेल पण आतून शिजला नसावा. तरीही मध्यभागी टूथपिकने टोचून पाहावे, जर ओलसर बॅटर लागले असेल तर अजून १०-१२ मिनीटे केक बेक होवू द्यावा.
७) १०-१२ मिनीटांनी टूथेपिकने मध्यभागी टोचून पाहावे. जर टूथपिकला ओलसर बॅटर लागले नसेल आणि टूथपिक क्लिन बाहेर आली तर केक बेक झाला असे समजावे. केकटीन पकडीच्या सहाय्याने बाहेर काढावा.
५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.

टीपा:
१) कंडेन्स मिल्क आवडीनुसार वाढवावे. वरील प्रमाणात बेताचा गोड होतो. काहीजणांना कमीगोड लागू शकतो, म्हणून बॅटर तयार झाले कि त्याची चव पाहावी, लागल्यास थोडे कंडेन्स मिल्क वाढवावे.
२) कूकरची रींग आणि शिट्टी काढायला विसरू नये. तसेच कूकरमध्ये पाणी घालू नये.
३) केकटीन जाड हिंडालियमचा असावा. पातळ मेटल घेऊ नये. उष्णतेमुळे भांड्याला तडा जाऊ शकते.
४) जर दोन कलरमध्ये केक बनवयाचा असेल तर केक बॅटरचे २ भाग करावे. एक भाग तसाच ठेवावा, दुसर्‍या भागात २ ते ३ टेस्पून डार्क कोको पावडर आणि थोडे कंडेन्स मिक्स घालावे. आधी पांढरा तसाच ठेवलेला भाग केकटीनमध्ये ओतावा. त्यावर कोको घातलेले बॅटर घालावे.आणि बेक करावे.
५) केकटीन कूकरमध्ये निट राहतो आहे कि नाही ते आधी तपासून पाहावे. नाहीतर कूकर लहान असल्यास काही करता येणार नाही.
६) केकचे बॅटर केकटीनमध्ये अर्ध्यापेक्षा किंचीत जास्त भरावे. भांडे पूर्ण भरू नये त्यामुळे केक फुलल्यावर भांड्याच्या बाहेर येतो.

Thursday, 10 March 2011

दुधी हलवा - Dudhi Halwa

Dudhi Halwa in English

वेळ: साधारण ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

indian sweets, indian dessert recipe, easy dessert, quick dudhi halva, lauki halwa, bottle gourd halwaसाहित्य:
अडीच कप किसलेला दुधी भोपळा (सोलून बिया काढून)
१ टिस्पून तूप
पाऊण कप कंडेन्स मिल्क
१ टिस्पून चारोळी (३ तास कोमट पाण्यात भिजवावी)
१ टेस्पून बदामाचे काप, (बदाम भिजवून साल काढावे)
१ टेस्पून इतर ड्राय फ्रुट्स जसे काजू, पिस्ता, बेदाणे
१/४ टिस्पून वेलची पूड

कृती:

१) पॅन गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि किसलेला दुधी घालून परतावे. मिडीयम-हाय हिटवर परतत राहावे.
२) साधारण ५ ते ८ मिनीटांनी दुधीमधील पाणी निघून जाईल. आता किसलेल्या दुधीची एक काडी चावून पाहावी. जर कच्चेपणा वाटत असेल तर अजून काही मिनीटे शिजवावे.
३) दुधी शिजला कि कंडेन्स मिल्क घालावे आणि घट्ट्पणा येईस्तोवर परतत राहावे. सुकामेवा घालावा, वेलची पूड घालून मिक्स करावे. थोडावेळ परतून घ्यावे.
असा हा झटपट दुधी हलवा गार किंवा कोमट कसाही छान लागतो.

टीप:
१) कंडेन्स मिल्कचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
२) दुधी शिजवताना झाकण न ठेवता शिजवावा.

दुधी हलवा रेसिपी - दुध आणि साखर वापरून

Thursday, 3 March 2011

फ्रुट सलाड - Fruit Salad

Fruit Salad in English

वेळ: २० ते २५ मिनीटे
वाढणी: ४ ते ५ जणांसाठी

fruit salad, indian fruit salad, fruit dessertसाहित्य:
१ मध्यम केळं
१ लहान सफरचंद
१ मध्यम संत्र
१/२ कप द्राक्षं
१/२ कप पिकलेल्या पपईचे मध्यम तुकडे
ड्राय फ्रुट्स: २ टेस्पून बदामाचे काप, १ टेस्पून पिस्त्याचे काप, २ टेस्पून बेदाणे, १ टेस्पून काजू
१/२ कप कंडेंन्स मिल्क
१/२ कप दूध

कृती:
१) फळांची तयारी
द्राक्षं: द्राक्षांचा आकार लहान असेल तर अख्खी द्राक्षं वापरावी. मोठी द्राक्षं असतील तर प्रत्येकाचे दोन भाग करून घ्यावे.
संत्र: संत्र्याचे साल काढून आतील फोडी विलग कराव्यात. प्रत्येक फोड सोलून घ्यावी आणि आतील गर फक्त वापरावा.
पपई: पपई सोलून आतील बिया फेकून द्याव्यात. पपईचे मध्यम तुकडे करावे.
केळं: केळं सोलून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात.
सफरचंद: नेहमी सफरचंद शेवटी कापावे म्हणजे काळे पडत नाही. सफरचंदातील बिया काढून टाकाव्यात आणि सफरचंदाचे बारीक किंवा मध्यम तुकडे करावेत.

२) सर्व फळं एकत्र करावीत. त्यात कंडेंन्स मिल्क आणि साधे दुध घालून मिक्स करावे. [दूध आणि कंडेंन्स मिल्कचे प्रमाण कमी-जास्त होवू शकते. म्हणून आधी १/४ कप दूध आणि १/४ कप कंडेंन्स मिल्क एकत्र करून फळांमध्ये घालावे. मिक्स करून चव पाहावी. जर गोडपणा बरोबर असेल पण फ्रुट सलाड जास्त घट्ट झाले असेल तर थोडे साधे दुध घालावे.]
ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करावे. (थोडे बेदाणे, पिस्ता, बदाम सजावटीसाठी ठेवावे)
फ्रिजमध्ये गार करून जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) आवडीनुसार तसेच अव्हेलेबल असल्यास चिकू, डाळींब, स्ट्रॉबेरी, हापूस आंबा, पेरू (कमी बियांचे) इत्यादींचे लहान तुकडे फ्रुट सलाडमध्ये घालू शकतो. (तसेच इतर आंबटगोड किंवा फक्त गोड रसाळ अशी फळे वापरता येतील)

Monday, 14 February 2011

बेसिक एगलेस केक - Eggless sponge cake

Eggless Vanilla Cake in English

पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ ते ४० मिनीटे
नग: १० लहान तुकडे

eggless cake, cake without egg, plain sponge cake recipeसाहित्य:
३/४ कप मैदा (१०० ग्राम)
२०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ कप + २ ते ४ चमचे)
१/४ कप बटर (मिठविरहित) (६० ग्राम)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर) (१२० मिली)

ओव्हन नसल्यास प्रेशर कुकरमध्येही केक बनवता येईल. रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

कृती:
१) प्रथम ओव्हन ३५० F (१८० C) ला प्रिहिट करत ठेवावे. तसेच केक टीनला (बेक करण्यासाठीचा डबा) आतून बटरचा हात लावून तयार ठेवावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. मिश्रण एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेनुसार मिश्रण एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे.
५) तयार मिश्रण केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). केक टीन ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर ठेवावा आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. ३५ मिनीटे होईस्तोवर ओव्हन अजिबात उघडू नये. ओव्हन बेकिग करताना मधेमधे उघडल्यास ओव्हनचे तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण ३५ ते ३७ मिनीटांनंतर केकच्या मध्यभागी टूथपिकने किंवा सुरीने खालपर्यंत टोचून तशीच टूथपिक बाहेर काढावी. जर टूथपिकला ओलसट मिश्रण चिकटले नसेल तर केक बेक झाला असे समजावे. जर टूथपिकला ओलसट मिश्रण लागलेले असेल तर अजून थोडावेळ केक बेक करावा.
एकदा का केक बेक झाला कि ५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.



टीप:
१) केक टीनचे बरेच आकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात, जसे की बदाम, गोल, अंडाकृती, चौकोन इत्यादी. तसे केकटीन वापरून विविध आकारात आपण केक बनवू शकतो.
२) वरील प्रमाणातून २ ते ३ जणांसाठी केक बनवता येईल. जर जास्त प्रमाणात केक बनवायचा असेल तर दुप्पट किंवा तिप्पट प्रमाण घेऊन केक बनवावा.
३) वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. मी ८" लांब x ३" रूद असा केकटीन वापरला होता. मिश्रण टीनमध्ये ओतल्यावर, तळापासून दिड ते २ इंच उंचीपर्यंत टीन भरला होता. वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. जर तुमच्याकडे मोठा केकटीन असेल तर मिश्रण दुप्पट घ्या.
४) प्लेन सोडा वॉटरच वापरावे. सोडा वॉटरमुळे केक हलका होतो. कोक, पेप्सी, जिंजर एल, लेमन सोडा वापरू नये. यामुळे केकच्या चवीत फरक पडेल.
५) सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर मिश्रणाची चव पाहावी. जर मिश्रण अगोड वाटले तर काही चमचे कंडेन्स मिल्क घालून मिक्स करावे आणि मगच बेक करावे.

Tuesday, 2 November 2010

मलई चॉप - Malai Chops

Malai Chop in English

वेळ: ४५ मिनिट्स
नग: साधारण ६ ते ८ लहान पीसेस

rasgulla, malai sandwich, malai chop, sweets, malayee sandwich
साहित्य:
अडीच कप दूध (2 ‍% reduced Fat)
1 टीस्पून विनेगर
२ टेस्पून पाणी
१ कप साखर
३ कप पाणी
१०० ग्राम खवा
२ टिस्पून साखर
४ टेस्पून दूध/ व्हिपींग क्रिम (टीप १)
लहान चिमूट केशरी रंग (टीप २)
वेलची पूड (टीप १)
३ पिस्त्यांचे पातळ काप सजावटीसाठी

कृती:
पनीर (step by step images)
१) पनीर बनवण्यासाठी पातेल्यात अडीच कप दूध, मध्यम आचेवर गरम करत ठेवावे आणि ढवळत राहावे म्हणजे दूध पातेल्याला चिकटणार नाही. एका वाटीत १ ते दिड टिस्पून विनेगर आणि २ टेस्पून पाणी मिक्स करून ठेवावे. दूध गरम झाले कि हळूहळू विनेगर आणि पाण्याचे मिश्रण घालावे. गॅस मंद आचेवर करून ढवळत राहावे. पनीर आणि पाणी विलग होईल. सुती कपडा चाळणीवर पसरवून ठेवावा. आणि पनीर गाळून घ्यावे आणि त्यावर गार पाणी ओतावे म्हणजे विनेगरचा वास जाईल. कपड्याच्या कडा एकत्र करून पनीर घट्ट पिळून घ्यावे. एका फ्लॅट सरफेसवर किंवा एखाद्या ताटात हे पनीर मळून घ्यावे. त्यातील सर्व बारीक गुठळ्या मोडून एकदम स्मूद असा गोळा बनवावा. रवाळपणा एकदम गेला पाहिजे. याचे एकसारखे ८ गोळे बनवावे दोन बाजूंनी किंचीत दाब द्यावा.
पाक(step by step images)
२) एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र उकळवत ठेवावे. मिश्रण उकळायला लागले कि त्यात पनीरचे गोळे टाकावेत आणि वरून झाकण ठेवून २० ते २२ मिनीटे शिजवावेत. (पातेले पुर्ण न झाकता ९० % झाकावे आणि १० % उघडे ठेवावे.). शिजवून झाले कि गॅस बंद करावा आणि पनीरचे गोळे किमान ३ ते ४ तास पाकात मुरू द्यावेत.
खव्याचे मिश्रण: (step by step images)
३) खवा गुलाबीसर भाजून घ्यावा. गार झाल्यावर बोटांनी चुरडून त्यातील गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यात दूध आणि साखर घालून मिक्स करावे. हे मिश्रण निट मळून घ्यावे आणि एकदम स्मूद अशी पेस्ट करावी. रंगासाठी केशरी रंग घालून निट मिक्स करावे. हे मिश्रण झाकून फ्रिजमध्ये ठेवावे.
मलई सॅंडविच (step by step images)
४) पनीरचे मुरलेले गोळे पाकातून बाहेर काढावेत. सुरीने सावकाशपणे हॉरिझॉंटल कापून दोन समान तुकडे करावेत. एका तुकड्यावर खव्याचे मिश्रण पसरवावे. दुसरा तुकडा त्यावर ठेवून अलगद चेपावे. पिस्ता काप घालून सजवावे. (टीप ३)
थोडावेळ थंड करून सर्व्ह करावे.

टीप:
१) मिठाईच्या दुकानात मलई सॅंडविचमधील खव्याच्या मिश्रणात वेलचीपूडऐवजी गुलाबपाणी वापरतात. जर गुलाबपाणी वापरायचे असेल तर ४ टेस्पून दूधाऐवजी ३ टेस्पून दूध घ्यावे आणि १ टेस्पून गुलाबपाणी घ्यावे. मी दुधाऐवजी व्हिपींग क्रिम वापरले होते त्यामुळे दाटपणा येतो.
२) केशरी रंगाऐवजी केशर वापरू शकतो.
३) सजावटीसाठी चांदीचा वर्खही लावू शकतो.

Labels:
Malai Sandwich, Bengali Sweets, Malai sandwich

Sunday, 14 March 2010

गुलाबजाम - Gulabjamun

Gulabjam in English

सर्व चकलीच्या वाचकांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

साधारण १५ ते १८ गुलाबजाम
वेळ: साधारण १ ते सव्वा तास

gulabjamun recipe, gulabjam recipe, jamun recipe, indian dessertसाहित्य:
२५० ग्राम गुलाबजामचा खवा
साखरेचा पाक बनवण्यासाठी
दिड कप साखर
सव्वा कप पाणी
१/२ टिस्पून वेलचीपावडर
इतर साहित्य
तळण्यासाठी तेल किंवा तूप
१ टेस्पून मैदा
गरजेप्रमाणे दुध
चिमूटभर बेकिंग सोडा

कृती:
१) खव्याचा गोळा बारीक किसणीवर किसून घ्यावा. यात मैदा आणि अगदी किंचीत बेकिंग सोडा घालावा. निट मिक्स करावे. किंचीत दुध शिंपडून मळून घ्यावे. लागल्यास अगदी थोडे तूप हाताला लावून मध्यम मळावे. ओल्या कपड्याने हा गोळा झाकून ठेवावा.
२) दिड कप साखर, सव्वा कप पाणी एकत्र करून उकळत ठेवावे. एकतारी पाक करून घ्यावा. वेलचीपूड घालावी. पाक तयार होत असतानाच मळलेल्या गोळ्याचे दिड ते दोन सेमीचे गोळे बनवावे. गोळ्यांना चिर असू नये त्यामुळे तेलात टाकल्यावर गुलाबजाम फुटतात.
३) तेल व्यवस्थित गरम करून आच मध्यम (मिडीयम लो) करावी. तेलाचे तापमान तपासण्यासाठी प्रथम एक गोळा टाकावा. जर गोळा लगेच वर तरंगला तर तेल जास्त तापले आहे असे समजावे. आधी गोळा तळाला जाऊन काही सेकंदांनी तेलावर तरंगला पाहिजे. म्हणजे तेलाचे तापमान बरोबर आहे असे समजावे. मग आता जास्त गोळे तळणास सोडावेत. हे तरंगलेले गोळे अलगदपणे झार्‍याने गोलगोल हलवावे म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा रंग येईल. तसेच तळताना गुलाबजामवर तेल उडवावे म्हणजे निट तळले जातील. लालसर रंग आला कि तळलेले गोळे तेलातून बाहेर काढावे. व गुलाबजामची दुसरी बॅच तळून होईस्तोवर वार्‍यावर ठेवावी.
४) वरील पद्धतीनेच गुलाबजामची दुसरी बॅच तळण्यास सोडावी. गुलाबजाम तळावेत, बाहेर काढावेत आणि तळलेली पहिली बॅच गरम पाकात सोडावी. पाक एकदम उकळता गरम असू नये तसेच कोमटही नसावा.
गुलाबजाम पाकात किमान ५ ते ६ तास मुरवावे. शक्यतो आदल्या रात्री करून मुरवल्यास व्यवस्थित मुरतात.

टीप:
१) काही जणांना गुलाबजामला गुलाबाचा सुगंध आवडतो त्यासाठी पाकात १ ते २ थेंब रोज इसेंस घालावा.
२) जरा वेगळ्या पद्धतीने गुलाबजाम करायचे असतील तर खव्याचा गोळा वळताना लहान आकाराचे ड्रायफ्रुटचे तुकडे (काजू तुकडा, पिस्ता), खडीसाखरेचा चौकोन किंवा वेलचीचा दाणा असे गोळ्याच्या मध्यभागी घुसवून निट गोळा वळावा आणि तळावे.
३) मैद्याऐवजी आरारूट पावडर किंवा कॉर्न फ्लोर वापरले तरी चालते.
४) गुलाबजाम तळताना तेलाचे तापमान फार महत्त्वाचे असते. जास्त गरम तेल असेल तर गुलाबजामला लगेच लालसर रंग येतो पण आतून कच्चाच राहतो. आणि पाकात टाकल्यावर न शिजलेल्या भागात पाक मुरत नाही. त्यामुळे सुरूवातीला एकदोन गुलाबजाम टाकून तापमान अड्जस्ट करून घ्यावे.
५) गुलाबजामसाठीचा पाक खुप घट्ट करू नये त्यामुळे पाक गुलाबजाममध्ये निट मुरत नाही.
६) गुलाबजामसाठी वेगळा रवाळ असा खवा मिळतो तो वापरावा.

Labels:
Gulabjamun, Gulabjam, gulabjam from khoya