Pages

Showing posts with label Coconut. Show all posts
Showing posts with label Coconut. Show all posts

Monday, 10 September 2012

कोकोनट मोदक - Coconut Modak


वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: १० ते १२ लहान मोदक
coconut modak naralache modak ganpati prasad idea

साहित्य:
१/२ कप खवलेला नारळ
१/४ कप कंडेन्स मिल्क
२ टेस्पून खवा
२ चिमटी वेलची पूड

कृती:
१) एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात खवा घालून ५० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. भांडे बाहेर काढून काही सेकंद ढवळावे.
२) आता नारळ घालून ४५ सेकंद मायक्रोवेव्ह करावे, असे एकून ३ वेळा करावे. प्रत्येक ४५ सेकंदानी भांडे मायक्रोवेव्ह बाहेर काढून ढवळावे. यामुळे मिश्रण जळणार नाही.
३) कंडेन्स मिल्क आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. २ वेळा ३०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. मध्ये एकदा भांडे बाहेर काढून ढवळावे.
४) मिश्रण घट्टसर झाले कि मोल्डमध्ये घालून मोदक बनवावे.
५) जर मिश्रण चिकटसर राहिले तर मिश्रण २०-३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे.

टिप्स:
१) मायक्रोवेव्हमध्ये हॉटस्पॉट तयार होतात ज्यामुळे मिश्रण काही स्पेसिफिक जागी जास्त गरम होते. म्हणून मिश्रण ढवळले गरजेचे असते. नाहीतर जास्त गरम झालेल्या जागी मिश्रण करपू शकते.
२) जास्त प्रमाणात मोदक करायचे असल्यास साहित्यात दिलेले जिन्नस दुप्पट किंवा तीप्पट असे वाढवावे. तसेच मायक्रोवेव्हमधील कुकिंग टाईमसुद्धा वाढवावा लागेल.

Tuesday, 29 November 2011

अळिव लाडू - Alivache Ladu

Aliv Ladu in English

वेळ: १५-२० मिनिटे
साधारण १८-२० मध्यम लाडू

alivache ladu, balantinicha ahar, postpartum recipe, healthy recipe, aliv ladduसाहित्य:
४ कप नारळाचा चव
दिड कप गूळ
१/२ कप अळिव
१५ बदाम, सोलून पातळ काप
३ ते ४ टेस्पून चारोळी
३ ते ४ टेस्पून बेदाणे
१/२ टिस्पून जायफळ पूड

कृती:
१) अळीव नारळाच्या पाण्यात किमान २ ते अडीच तास भिजत ठेवावे.
२) कढई गरम करून त्यात भिजवलेले अळिव, खवलेला नारळ, आणि गूळ घालून मिक्स करावे. मध्यम आचेवर मिश्रण घट्ट होईस्तोवर ढवळावे.
३) मिश्रण घट्टसर झाले कि त्यात बदाम, चारोळी, बेदाणे आणि जायफळ पूड घालून मिक्स करावे. मिश्रण गरमसर असतानाच लाडू वळावेत.

टीप:
१) जायफळऐवजी वेलची पूडही वापरू शकतो.
२) जर नारळाचे पाणी नसेल तर साध्या पाण्यात अळीव भिजवले तरी चालतील.

Related Recipes
Aliv Kheer

Tuesday, 26 April 2011

रवा नारळाचे लाडू - Rava naralache ladu

Rava Coconut laddu in English

२२ ते २४ मध्यम लाडू
वेळ: ३० मिनीटे (मिश्रण आळायला लागणारा वेळ न धरता)

rava laddu, rava recipes, laddu recipes, rava naralache ladu, coconut laddu, semolina ladoo, semolina laddu, semolina coconut ladduसाहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप खवलेला ताजा नारळ
दिड कप साखर
१ कप पाणी
३ ते ४ टेस्पून तूप
१/२ टिस्पून वेलची पूड
२५ बेदाणे

कृती:
१) रवा मध्यम आचेवर ४ मिनीटे कोरडाच भाजावा. तळापासून सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही. [रंग बदलेस्तोवर भाजू नये, अगदी हलकेच भाजावे. नंतर परत रवा भाजायचा आहे.]
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे. नारळातील ओलसरपणा रव्यात उतरेस्तोवर (१० मिनीटे) तसेच ठेवावे.
३) कढई गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि रवा-नारळाचे मिश्रण घालावे. ८ ते १० मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे. काही वेळाने रवा आणि तूपाचा छान वास येईल. रव्याचा रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि साधारण ३ ते ४ मिनीटांनी पाकाचा थेंब पहिले बोट आणि अंगठा यात पकडून उघडझाप करावी. जर एक तार दिसली कि पाक तयार आहे असे समजावे [हि तार अगदी सेकंदभरच दिसेल]. किंवा एकतारी पाक ओळखता येत नसेल. मिश्रण उकळायला लागले कि ३ ते ४ मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.
५) लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.
मिश्रण आळले कि लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.

टीपा:
१) हे लाडू फार काळ टिकत नाहीत, जास्तीत जास्त ७-८ दिवस टिकतील. उष्ण आणि दमट हवामानात ३-४ दिवसच टिकतील. अशावेळी २-३ दिवसांनी लाडू फ्रिजमध्ये ठेवावे.
२) रवा साधारण ३ प्रकारचा मिळतो. जाड (coarse), बारीक (fine), एकदम बारीक (super fine). वरील रेसिपीसाठी बारीक रवा वापरावा. जाड रव्यामुळे लाडू चरचरीत लागतात. एकदम बारीक रवा पिठासारखाच दिसतो त्यामुळे रवा लाडूसाठी योग्य नसतो.
३) लाडूचे मिश्रण जर कोरडे झाले तर एकतारी पाक जरा जास्त आटल्याने दोन तारी किंवा तीन तारी झाला असावा. अशावेळी १/२ कप पाणी + ३ टेस्पून साखर असे मिश्रण उकळवावे. ३ ते ४ मिनीटे उकळवून पाक लाडू मिश्रणावर ओतावा. मिक्स करून मिश्रण आळले कि लाडू करावे.
४) आवडीनुसार सुका मेव्याचे तुकडे घालावे.
५) नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यावा. करवंटीकडील काळपट भाग घेऊ नये.

Tuesday, 24 August 2010

नारळी भात - Narali Bhat

Narali Bhat in English

वेळ: साधारण ४५ ते ५० मिनीटे(पूर्वतयारी: २० ते ३० मिनीटे । पाककृतीस लागणारा वेळ: २५ मिनीटे)
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

coconut rice, Indian coconut recipes, vegetarian recipes, coconut jaggery rice, naralache padarth, coconut sweets, Indian sweets, Indian curry recipes, Indian vegetarian foodसाहित्य:
३/४ कप तांदूळ
दिड कप पाणी
२ + १ टेस्पून साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ टिस्पून वेलची पूड
१ कप गूळ, किसलेला (टीप २)
१ कप ताजा खोवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे

कृती:
१) तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे.
३) तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे.
४) गरम पाणी परतलेल्या तांदूळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. भात शिजला कि हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
५) नारळ आणि गूळ एकत्र मिक्स करावे. भात गार झाला कि हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे.
६) जाड बुडाचे पातेले गरम करावे. त्यात तूप गरम करून काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे.
७) झार्‍याने काजू आणि बेदाणे दुसर्‍या वाटीत काढावे. गॅस मंद करून उरलेल्या तूपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालावे. वेलचीपूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करावा. साधारण १० ते १५ मिनीटे शिजवावे.
८) भात सुरूवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनीटांनी आळेल. शेवटची २-३ मिनीटे झाकण न ठेवता भात शिजवा. तळलेले काजू, बेदाणे घालावे. सर्व्ह करताना तूप घालून सर्व्ह करावे.

टीप्स:
१) गूळ-नारळ-भात यांचे मिश्रण शिजवताना गूळ वितळल्याने सुरूवातीला ते पातळ होते. काहीवेळ शिजवल्यावर ते आळत जाईल. तसेच नारळीभात तयार झाल्यावर शेवटची काही मिनीटे झाकण न ठेवता शिजवावे म्हणजे अधिकचा ओलसरपणा निघून जाईल.
२) जर नारळीभात खुप गोड नको असेल तर गूळाचे प्रमाण १ कप ऐवजी पाऊण कप वापरा.
३) जर नारळीभात तयार झाल्या झाल्या लगेच चव पाहिली तर प्रचंड गोड लागेल, पण काही कालावधीनंतर गुळाचा पाक भातात मुरल्याने गोडपणा काहीप्रमाणात कमी होतो.
४) तांदूळ परफेक्ट शिजवावा. कमी शिजलेल्या भाताची शिते, गूळाच्या संपर्कात आल्यामुळे कडकडीत होतात. तसेच जास्त शिजलेल्या भाताचा, गूळ आणि नारळ घालून शिजवल्यावर गोळा होतो आणि शिते आख्खी राहात नाहीत.
५) भात शिजवताना थोडे केशर घातल्यास स्वाद आणि रंग छान येतो.

Labels:
coconut rice, narali bhat, narali paurnima, raksha bandhan