२० मध्यम डोसे
वेळ: २ ते ३ मिनिट्स/डोसा
१ कप तांदूळ
१ कप उडीद डाळ
३ कप रोल्ड ओट्स (क्विक कुकिंग ओट्स)
१/२ टीस्पून मेथी दाणे
चवीपुरते मीठ
तेल डोसे बनवताना
कृती:
१) उडीद डाळ आणि तांदूळ ५ ते ६ तास पाण्यात वेगवेगळे भिजवावे. मेथी दाणे उडीद डाळीबरोबरच भिजवावे.
२) डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटण्याच्या आधी १० मिनिटे ओट्स भिजवावे. साधारण २ कप पाण्यात १० मिनिटे भिजवावे.
३) तांदुळामधील पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गरजेपुरते पाणी घालून वाटावे. खूप जास्त पाणी घालू नये.
४) उडीद डाळीमधील पाणी काढून टाकावे. थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटावी. वाटलेल्या डाळीत भिजवलेले ओट्स घालून परत एकदा वाटावे.
५) वाटलेला तांदूळ आणि वाटलेली डाळ एकत्र करून त्यात मीठ घालावे. थोडेथोडे पाणी घालून कन्सिस्टन्सी अड्जस्ट करावी. झाकून उबदार ठिकाणी ठेवावे. ८ ते १० तास मिश्रण आंबवावे.
६) मिश्रण आंबले कि त्यातील २ कप मिश्रण बाजूला काढावे. जर मिश्रण घट्ट असेल तर थोडे पाणी घालावे. इडलीच्या पिठापेक्षा डोशाचे पीठ थोडे पातळ असावेत म्हणजे डोसे पातळ व कुरकुरीत होतात. अशाप्रकारे लागेल तसे मिश्रण घेउन पातळ करावे आणि मग डोसे घालावे.
७) तवा तापवून त्यावर थोडे तेल घालावे आणि काळजीपूर्वक पेपर टॉवेलने पुसून टाकावे. आच मिडीयम हायवर असावी. मध्यम पळीभर मिश्रण घेउन तव्याच्या मध्यावर घालावे. क्लॉकवाईज गोल फिरवावे आणि डोसा बनवावा. ३० सेकंदानी थोडे तेल कडेने आणि डोशावर सोडावे. एक बाजू झाली कि कालथ्याने दुसरी बाजू पलटावी. दोन्ही बाजू भाजल्या कि सांबार किंवा चटणीबरोबर डोसा गरमच सर्व्ह करावा.
टीपा:
१) पीठ आंबवताना नेहमी मोठे भांडे घ्यावे. म्हणजे ज्यात मिश्रण घातल्यानंतर वरती एकदीड वीत जागा राहिली पाहिजे. मध्यमसर भांडे घेतले तर मिश्रण आंबून भांड्याबाहेर उतू जाते.
२) थंडीमध्ये पीठ आंबत नाही अशावेळी ओव्हन २०० F वर ३-४ मिनिटे गरम करावा ओव्हन स्वीच ऑफ करून पिठाचे भांडे झाकून ओव्हनमध्ये ठेवावे. आणि ओव्हन सारखा उघडू नये. पीठ ओव्हनमध्ये आंबवणार असाल तर स्टील किंवा काचेचे भांडे वापरावे.
३) डोशाचे पीठ डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावे. ४-५ दिवस पीठ चांगले राहते आणि गरजेप्रमाणे झटपट डोसे करता येतात.
0 comments:
Post a Comment