Pages

Sunday, 13 November 2011

गुलाबजाम - Ricotta cheese gulabjamun

Gulabjam in English

वेळ: पूर्वतयारी- ४५ ते ५० मिनिटे | पाकृसाठी- ३० मिनिटे
४० ते ४५ मध्यम गुलाबजाम

gulabjam, indian sweet, gulabjamunसाहित्य:
१ lb रिकोटा चीज (मी लाईट रिकोटा चीज वापरले होते)
३ टेस्पून मैदा
१ चिमटी बेकिंग सोडा
अडीच कप साखर
अडीच कप पाणी
२ ते ३ वेलची
१ चिमूट केशर
गुलाबजाम तळण्यासाठी तेल

कृती:
१) नॉनस्टिक पॅनमध्ये रिकोटा चीज घालावे आणि मध्यम आचेवर आटवावे. आटवताना सतत ढवळत राहावे म्हणजे पॅनला चिकटणार नाही. रिकोटा चीज घट्ट होउन गोळा बनेस्तोवर आटवावे. याला साधारण ३० ते ४० मिनिटे लागतील. आटले कि थंड होवू द्यावे.
२) २ चमचे मैदा आणि चिमूटभर बेकिंग सोडा आटवलेल्या आणि थंड झालेल्या रिकोटा चीज मध्ये घालावा. व्यवस्थित मऊसर मळून घ्यावे. लागल्यास एखाद टीस्पून पाणी घालावे. छान मऊसर मळून घ्यावे.
३) खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये साखर आणि पाणी घालावे. ५ मिनिटे उकळवावे. नंतर आच अगदी मंद करून ठेवावी. केशर आणि वेलची पूड घालावी.
४) मध्यम आचेवर तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याची लहान गोटीएवढ्या आकाराचे गोळे करून घ्यावे. या गोळ्यांना तडा गेलेल्या नसाव्यात. सरफेस एकदम प्लेन असावा.
५) तेलाचे तापमान तपासण्यासाठी एक लहान गोळा तेलात सोडावा. प्रथम गोळा तळाला बसला पाहिजे आणि ५ ते ८ सेकंदानी तेलावर तरंगला पाहिजे. जर तेलात टाकल्यावर गोळा एकदम पटकन वर आला आणि लालसर रंग चढला म्हणजे तेल जास्त तापले आहे [रंग पटकन चढला तर गुलाबजाम आतून कच्चे राहतात.]. अशावेळी आच थोडी कमी करावी आणि थोडावेळ थांबावे. नंतर गुलाबजाम तळावे.
६) तेलाचे तापमान अड़जस्ट झाल्यावर एकावेळी ८ ते १० गुलाबजामचे गोळे तळावेत. तळताना गुलाबजामचे गोळे झाऱ्याने सतत हलवत ठेवावे म्हणजे सर्वबाजूनी रंग सारखा येतो आणि सर्वत्र सारखे शिजतात.
७) गुलाबजामला लाल रंग येईस्तोवर तळावे. झाऱ्याने गुलाबजाम बाहेर काढावे आणि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे. २-३ मिनीटांनी गरम साखरेच्या पाकात घालावे.
८) अशाप्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यावे आणि तळून झाल्यावर २ मिनीटांनी पाकात घालावे.

गुलाबजाम किमान २ तास तरी पाकात मुरू द्यावे. रात्रभर मुरल्यास उत्तम.

टीपा:
१) कमीत कमी मैदा वापरावा. गरजेपेक्षा जास्त मैदा घातल्यास गुलाबजाम चिवट होतात आणि पाक आतापर्यंत मुरत नाही.
२) गुलाबजाम तळल्यावर २ मिनिटे पेपरवर काढून ठेवावे. तळल्या तळल्या लगेच पाकात घातले तर गुलाबजाम वर जे काही थोडेफार तेल असेल ते पाकात उतरते आणि पाकावर तेलाचा तवंग दिसतो. तसेच गुलाबजाम कडकडीत होतात.
३) रिकोटा चीज पासून खवा बनवणे थोडी वेळखाऊ प्रोसेस आहे. पण या पद्दतीने बनवलेले गुलाबजाम मऊसूत बनतात. चव तर खव्याच्या गुलाबजामच्या एकदम जवळची बनते.
४) जर गुलाबजाम फुटले तर अगदी थोडा मैदा घालावा आणि मळून परत गुलाबजाम ट्राय करावेत.

0 comments:

Post a Comment