Pages

Thursday, 6 September 2012

चॉकलेट मोदक - Chocolate Modak

Chocolate Modak in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ८ ते १० लहान मोदक
साहित्य:
१/४ कप खवा
१/४ कप + २ टेस्पून पिठी साखर (पिठी साखर चाळून मगच वापरावी.)
दीड ते २ टेस्पून कोको पावडर

कृती:

१) खवा ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावा. बाहेर काढून ढवळावे आणि परत १५ सेकंद मायक्रोवेव्ह करावे.
२) पुन्हा ढवळून २० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. जोवर खवा हलकासा ब्राउन होत नाही तोवर २०-२० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. (एकूण साधारण दीड मिनिट लागेल.) खवा २ मिनिटे व्यवस्थित ढवळावा. थोडे निवळले कि पिठी साखर घालून मिक्स करावे.
३) एका वेळी १ टीस्पून कोको पावडर घालावी. मिक्स करावे. आता अजून एक टीस्पून पावडर घालावी. जोवर मिश्रण थोडे घट्टसर होत नाही तोवरच कोको पावडर घालावी.
४) मिश्रण घट्ट झाले कि मोदकाच्या साच्यात मिश्रण घालून मोदक करावेत.

टिप्स:
१) कोको पावडरऐवजी मिल्क चॉकलेटसुद्धा वापरू शकतो. खवा मायक्रोवेव्ह करून बाहेर काढला कि लगेच त्यावर चॉकलेटचे तुकडे घालावे. तेवढ्या उष्णतेने चॉकलेट वितळेल. चॉकलेट घातले कि मायक्रोवेव्ह करू नये नाहीतर कडसर चव येउ शकते. त्यात पिठीसाखर आणि थोडी मिल्क पावडर घालून मिक्स करावे. नेहमीसारखे मोदक करावे.
२) मी हे मोदक कमी प्रमाणात बनवले होते. गणपतीला प्रसाद दाखवण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणात बनवावे. जास्त खवा घेतला कि थोडे जास्तवेळ मायक्रोवेव्ह करावे लागेल.
३) गॅसवर सुद्धा हे मोदक करता येतील. खवा नॉनस्टीक कढईत गरम करावा. आच मध्यम असावी. सतत ढवळत राहा. रंग किंचित बदलला कि खवा बाजूला काढून वरील दिलेल्या पद्धतीने मोदक बनवावे.
४) जर फ्रोजन खवा वापरला असेल तर मोदक बनवायच्या आधी तासभर बाहेर काढून ठेवावे. आणि मग खवा वापरावा.
५) जर डार्क चॉकलेटची चव आवडत असेल तर डार्क कोको पावडर वापरावी.  नाहीतर लाईट कोको पावडर वापरावी. लाईट कोको पावडरमुळे रंग फिकट येतो आणि डार्क कोकोमुळे डीप ब्राउन. अशावेळी दोन्ही पावडर मिक्स करून वापराव्यात.

0 comments:

Post a Comment