१५ माध्यम वड्या
साहित्य:
१०० ग्राम आलं
दीड कप साखर (टीप ५)
१/२ कप खवा किंवा मिल्क पावडर
१ टीस्पून तूप
कृती:
१) आलं धुवून त्याची सालं काढावीत. आल्याचे १ सेमीचे लहान-लहान तुकडे करावे (साधारण १ कप वरपर्यंत भरून).
२) आल्याचे तुकडे, साखर आणि खवा एकत्र मिक्सरमध्ये बारीक प्युरी करावी.
३) स्टीलच्या ताटाला तूप लावून घ्यावे. तसेच स्टीलच्या वाटीला बाहेरून तळाला तूप लावावे.
४) एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून आलं-साखरेचे मिश्रण घालावे. मिडीयम-हाय फ्लेमवर मिश्रण सारखे ढवळत राहावे. मिश्रण तळाला बसू देवू नये.
५) मिश्रण साधारण १० मिनिटे झाल्यावर आटेल. मिश्रणात बुडबुडे असतात त्याच्या बाजूला पांढरा फेस तयार होईल (महत्त्वाची टीप ३ पहा). त्याचा अर्थ दोनेक मिनिटात मिश्रण थापायला तयार होईल. मिश्रण कडेने सुटून मधोमध जमा झाले कि लगेच तूप लावलेल्या ताटलीवर ओतावे.
६) लगोलग वाटीने मिश्रण समान थापावे आणि सुरीने वड्या पाडाव्यात.
७) गार झाले कि वड्या सोडवून घ्याव्यात. डब्यात भरून ठेवाव्यात.
टीपा:
१) आलं सोलून चिरून मगच मिक्सरमध्ये बारीक करावे. अल्यामध्ये आतील भागाला दोरे असतात. मोठे तुकडे करून आले बारीक केल्यास मिक्सरमध्ये निट बारीक होत नाही.
२) खवा किंवा मिल्क पावडर ऐवजी वाटीभर सायीसकट दुध घातले तरी चालते. फक्त मिश्रण पातळ झाल्याने काही मिनिटे जास्त आटवायला लागेल.
३) जर थंड प्रदेशात राहत असाल तर मिश्रण फेसाळायला लागले कि १ मिनिटातच मिश्रण ताटावर थापावे. कारण थंडीमुळे मिश्रण भरभर आळते आणि वड्या कडकडीत होतात किंवा वड्या पडत नाहीत.
४) फक्त आलं आणि साखरेच्या वड्याही करता येतात. दुध, खवा, मिल्क पावडर हे फक्त वड्यांचा तिखटपणा थोडा कमी करण्यासाठी घातले आहे.
५) ग्रानुलेटेड शुगर वापरल्याने दीड कप साखर वापरली आहे. ग्रानुलेटेड शुगर ही पिठीसाखरेएवढी फाईन नसते पण रव्याएवढी बारीक असते. भारतात थोडी दाणेदार साखर असते. त्यामुळे १ कप भरून आल्याचे तुकडे असल्यास २ कप साखर वापरावी.
0 comments:
Post a Comment