वेळ: ३० ते ४० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ साटोऱ्या
साहित्य:
आवरणासाठी
१/२ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तूप
चिमटीभर मीठ
पीठ मळायला पाणी
सारण
१/४ कप भाजलेला खवा
१/४ कप बारीक रवा
२ टेस्पून तूप
१/२ कप गूळ, किसलेला
१/४ कप दुध
इतर साहित्य:
तूप, साटोऱ्या भाजायला किंवा तळायला
कृती:
१) आवरणासाठी रवा, मैदा, आणि मीठ एकत्र करावे. त्यात गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून पीठ मळावे. पीठ अगदी घट्ट किंवा अगदी सैल मळू नये. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
२) पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. त्यावर रवा खमंग भाजावा. दुधाचा हबका मारून रवा शिजवावा. जर रवा बराच भाजला असेल तर थोडे दुध जास्त लागू शकते. रवा पूर्ण शिजू द्यावा.
३) गॅस बंद करावा. शिजलेल्या रव्यात गूळ आणि खवा घालून मऊसर मळावे.
४) मळलेले पीठ आणि मळलेले सारण यांचे ५ किंवा ६ समान भाग करावे. पिठाचा एक गोळा घेउन लाटावे. मधोमध सारणाचा एक भाग घेउन सील करावे. थोडे कोरडे पीठ घेउन साटोरी लाटावी. पातळ लाटू नये. थोडी जाडसरच ठेवावी.
५) नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घेउन साटोरी खरपूस होईस्तोवर शालो फ्राय करून घ्यावी.
साटोरी गरम सर्व्ह करावी. सर्व्ह करताना थोडे तूप घालावे.
टीप:
१) साटोरी डीपफ्रायही करतात. त्यामुळे मर्जीनुसार शालो फ्राय किंवा डीपफ्राय करावी.
Friday, 6 July 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment