वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:१ कप बासमती तांदूळ
पावणे दोन कप गरम उकळते पाणी
३/४ कप गाजर, लहान चौकोनी तुकडे
३/४ कप मटार
१/४ कप फरसबी, एक इंचाचे तुकडे
२ टेस्पून तूप
१ टेस्पून काजू बी
२ तमालपत्र, २ वेलची, २ लवंगा
१ हिरवी मिरची, उभी चिरून
१ टेस्पून आलेलसूण पेस्ट
चवीपुरते मीठ
कृती:
१) तांदूळ धुवून ५ मिनिटे पाण्यात भिजत ठेवावा. पाणी निथळू द्यावे आणि १०-१५ मिनिटे तसाच ठेवावा.
२) खोलगट नॉनस्टिक पातेले घेउन त्यात तूप गरम करावे. तमालपत्र, लवंग, आणि वेलची घालून ८-१० सेकंद परतावे. नंतर हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि काजू घालून परतावे.
३) निथळलेला तांदूळ घालून मिडीयम-हाय आचेवर कोरडा होईस्तोवर परतावा, साधारण ५ ते ७ मिनिटे. नंतर फरसबी, गाजर आणि मटार घालून १-२ मिनिटे परतावे.
४) आता उकळते पाणी घालावे. मीठ घालावे आणि ढवळावे. मोठ्या आचेवर उकळी येउ द्यावी. सुरुवातीला झाकण ठेवू नये.
५) काही मिनिटातच भाताच्या पृष्ठभागावर पाणी कमी होईल. तेव्हा लगेच आच एकदम मंद करावी आणि झाकण ठेवून वाफ काढावी. वाफेवर भात शिजू द्यावा. ३-४ मिनीटांनी एकदा असे हलकेच भात तळापासून ढवळावा. शिते मोडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. साधारण १५ मिनिटे वाफ काढावी.
गरम पुलाव टोमॅटो सूपबरोबर सर्व्ह करावा.
टीपा:
१) पुलाव भातात आवडीनुसार भाज्या घालू शकतो. पण शक्यतो गाजर, मटार आणि फरसबी असावीच. तसेच फक्त एकच भाजी वापरून जसे फक्त गाजर, किंवा फक्त मटार घालूनही पुलाव बनवता येतो.
२) तुपाचे प्रमाण गरजेनुसार कमी जास्त करावे.



0 comments:
Post a Comment