Pages

Thursday, 3 May 2012

राजमा पुलाव - Rajma Rice


वेळ: ३५ ते ४० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी

साहित्य:
१/२ कप राजमा
१ कप बासमती तांदूळ
२ तमाल पत्र, २ लवंगा, २ वेलची
दीड टीस्पून गरम मसाला
२ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ टीस्पून आले पेस्ट
१ टीस्पून लसूण पेस्ट
२ टेस्पून तूप
१/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
चवीपुरते मीठ
१/४ कप कोथिंबीर, बारीक चीरून

कृती:
१) राजमा ७ ते ८ तास पाण्यात भिजत घालावा. प्रेशर कुकरमध्ये राजमा २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावा. शिजवताना थोडे मीठ घालावे. राजमा अख्खा राहिला पाहिजे पण शिजलाही पाहिजे.
२) तांदूळ पाण्यात १० मिनिटे भिजवावा. त्यातील पाणी निथळून टाकावे. तेल गरम करून त्यात तमाल पत्र, लवंगा, आणि वेलची परतून घ्यावी. निथळलेला तांदूळ घालून कोरडा होईस्तोवर परतावा. तांदूळ परतताना दुसऱ्या स्टोव्हवर २ कप पाणी गरम करावे.
३) तांदूळ चांगला भाजला गेला कि त्यात गरम पाणी घालावे. तांदुळाच्या वरती पाणी दिसायचे कमी झाले कि आच लगेच मंद करावी आणि झाकण ठेवून वाफेवर भात शिजवावा. मध्ये फक्त एकदा किंवा दोनदा हलकेच तळापासून ढवळावे. भात शिजला कि राजमा करी बनवेस्तोवर बाजूला काढून ठेवावा.
४) कढईत १ टेस्पून तूप गरम करावे त्यात हळद, लाल तिखट आणि आलेलसूण पेस्ट घालून परतावे. कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावा. टोमॅटो आणि मीठ घालून पूर्ण मऊ होईस्तोवर परतावे.
५) शिजवलेला राजमा आणि लागल्यास १/४ कप पाणी घालावे. थोडावेळ उकळी काढून गरम मसाला घालावा. ग्रेव्ही घट्टसर झाली पाहिजे कारण नंतर ती भातात घालायची आहे.
६) ग्रेव्ही घट्ट झाली कि त्यात भात घालून मिक्स करावे (टीप). झाकण ठेवून मंद आचेवर वाफेवर भात शिजवावा, साधारण ५ ते ८ मिनिटे. यामुळे ग्रेव्हीचा स्वाद भातात चांगला मुरेल.
कोथिंबीरिने भात सजवून रायत्याबरोबर सर्व्ह करावा.

टीप:
१) कधीकधी टोमॅटो आतून पोकळ असला कि ग्रेव्ही कमी बनते. त्यामुळे भाताचे आणि ग्रेव्हीचे प्रमाण चुकू शकते. अशावेळी भात बेताबेतानेच घालावा आणि ग्रेव्हीमध्ये मावेल इतकाच भात घालावा.

0 comments:

Post a Comment