Pages

Tuesday, 26 July 2011

भरली कारली - Bharli Karli

Stuffed Karela in English

वाढणी: २ ते ४ जणांसाठी
वेळ: २५ मिनिटे

stuffed karela, stuffed bitter gourd, karela recipe, karlyachi bhaji
साहित्य:
४ कोवळी कारली
तळण्यासाठी तेल
::सारण::
२ टेस्पून भाजलेले तिळ
२ टेस्पून भाजलेले बेसन (१ टेस्पून तेलावर भाजावे)
२ टेस्पून भाजलेले खोबरे
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून बडिशेप
१ टिस्पून साखर
१ टिस्पून खसखस (ऐच्छिक)
चवीनुसार मिठ

कृती:
१) कारली धुवून घ्यावी. कारल्याची खरखरीत पाठ हलकेच किसणीने किसून प्लेन करून घ्यावी. प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा आणि बिया काढून साफ करावे. आतल्या बाजूने मिठ चोळून ठेवावे.
२) तिळ खोबरं एकत्र कुटून घ्यावे. त्यात धणेजिरेपूड, आमचूर, तिखट, साखर, भाजून कुटलेली खसखस, तेलावर भाजलेले बेसन आणि अगदी थोडे मिठ घालून मिक्स करावे (कारल्याला चोळलेले मिठ लक्षात ठेवावे)
३) मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा आणि कारली कुरकूरीत तळावी.
वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा. भरली कारली आमटी भाताबरोबर छान लागते. पोळीबरोबर खायचे झाल्यास बरोबर आमटी किवा तत्सम पातळ पदार्थ घ्यावा.

टीप:
१) कारली लहान पॅनमध्ये थोडे जास्त तेल घालून शालो फ्राय करता येतात. जास्त तेलाची फोडणी करून त्यात कारली परतून झाकावी. १० मिनीटे अधून मधून बाजू बदलावी आणि चमच्याने जरा प्रेस करत राहावे म्हणजे निट शिजले जाईल.
२) शक्यतो लहान व कोवळी कारली वापरावीत. लहान कारली लवकर शिजतात आणि वाढायला सोपी जातात. साधारण एक कारले एका व्यक्तीसाठी पुरेसे होते.

0 comments:

Post a Comment