श्राद्धपक्षात गवार आणि भोपळ्याची भाजी करायची पद्धत आहे.
वेळ: पूर्वतयारी १५ मिनीटे । पाकृसाठी १५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
पाव किलो गवार
फोडणीसाठी:- १ टेस्पून तेल, १०-१२ मेथी दाणे, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
१ वाटी लाल भोपळ्याच्या फोडी (टीप १ व २)
२ टेस्पून ताजा नारळ
१ टेस्पून दाण्याचा कूट
२ टिस्पून गूळ किंवा चवीपुरता
१/२ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ
कृती:
१) गवार स्वच्छ धुवून घ्यावी. प्रत्येक गवारीची दोन्ही बाजूची देठं मोडावीत आणि शिर असेल तर काढून टाकावी. गवारीचे १/२ ते १ इंचाचे तुकडे मोडून घ्यावेत.
२) गवार कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी. वाफवताना गवारीमध्ये पाणी घालू नये. (वाफवण्यासाठी कूकरच्या तळाशी १ इंच पाणी असावे. गवार कूकरच्या आतील डब्यात ठेवावी व या डब्यात पाणी घालू नये.)
३) कढईत तेल गरम करावे. मेथीदाणे घालून थोडे लालसर होवू द्यावे. मग मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. प्रथम भोपळ्याच्या फोडी फोडणीस टाकाव्यात. २-३ वाफा काढून भोपळा शिजू द्यावा. भोपळा ६० % शिजला कि वाफवलेली गवार घालावी. निट मिक्स करावे.
४) लाल तिखट, गोडा मसाला, नारळ, दाण्याचा कूट आणि थोडे मिठ घालावे. मध्यम आचेवर १-२ वाफा काढाव्यात. नंतर गूळ घालून १ वाफ काढावी.
टीप:
१) गवारीची भाजी इतरवेळी करताना शिजवलेला बटाटाही वापरू शकतो. फक्त बटाटा शिजवून थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावा. गवार आणि बटाटा एकत्रच फोडणीस घालावे, बटाटा शिजलेला असल्या कारणाने अजून शिजवायची गरज नाही.
२) बटाट्याऐवजी काळे वाटाणे गवारीच्या भाजीत अधिक छान लागतात. जर काळे वाटाणे वापरायचे असतील तर ७-८ तास वाटाणे पाण्यात भिजत ठेवावेत व कूकरमध्ये शिजवून घ्यावेत.
३) हि भाजी थेट कूकरमध्येही फोडणीस टाकू शकतो, म्हणजे गवार वेगळी शिजवायची गरज नाही. लहान कूकरमध्ये फोडणी करून घ्यावी. त्यात मोडलेली गवार, बटाटा/ भिजवलेले काळे वाटाणे फोडणीस टाकावे. इतर साहित्यही घालावे व थोडे पाणी घालावे. २ ते ३ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली कि कूकर उघडून वाटल्यास १ उकळी काढावी.
0 comments:
Post a Comment