वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
१० लहान वांगी
मसाला पेस्टसाठी:-
१ कप कांदा, पातळ उभा चिरलेला
१ मध्यम टोमॅटो, चिरलेला
५ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
५ कढीपत्त्याची पाने
१ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
४ हिरव्या मिरच्या, चिरून
२ टेस्पून खवलेला ताजा नारळ
१/२ टिस्पून खसखस, भाजून पूड केलेली (ऐच्छिक)
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून गरम मसाला
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल
इतर साहित्य:-
२ टिस्पून तेल
५ ते ६ मेथीचे दाणे
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (लालसर रंग येण्यासाठी)
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
कृती:
१) वांग्याचे देठ कापून प्रत्येक वांग्याच्या ६ ते ८ फोडी कराव्यात.
२) मसाला पेस्ट
i) पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आणि आलं घालावे. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावे.
ii) टोमॅटो घालून ते एकदम मऊसर होईस्तोवर परतावे.
iii) दाण्याचा कूट, नारळ, धणे-जिरेपूड, खसखस, गरम मसाला आणि मिठ घालून मिक्स करावे.
iv) हे मिश्रण गार होवू द्यावे. थोडे पाणी घालून एकदम बारीक वाटून पेस्ट तयार करावी.
३) पॅनमध्ये तेल गरम करावे. मेथी दाणे घालून थोडा रंग बदलेस्तोवर थांबावे. नंतर हिंग, हळद, आणि वांग्याच्या फोडी घालाव्यात. थोडे मिठ घालावे. झाकण ठेवून फोडी थोडावेळ शिजू द्याव्यात. आता वाटलेला मसाला घालावा, चिंचेचा कोळ आणि लाल तिखट घालावे.
गरजेपुरते पाणी घालून कंसिस्टन्सी अड्जस्ट करावी. काही मिनीटे उकळी काढावी.
भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टीपा
१) जांभळ्या रंगाची लहान वांगी निवडावीत. तसेच साल तुकतूकीत आणि डागविरहीत असावे.
२) काश्मिरी लाल तिखटाला तिखटपणा अगदी कमी असतो पण यामुळे भाजीला रंग सुरेख येतो. वाटल्यास हे तिखट घातले नाही तरी चालेल.
३) या भाजीत थोडा गोडपणा चांगला लागतो. आवडत असल्यास थोडा गूळ किंवा साखर घालावी. (१/२ किंवा १ टिस्पून)
0 comments:
Post a Comment