वेळ: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
८ ते १० लहान वांगी (टीप १)
२ मध्यम बटाटे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
४ ते ५ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार
कृती:
१) वांगी धुवून घ्यावीत आणि देठं कापून टाकावीत. प्रत्येक वांग्याच्या उभ्या चार फोडी कराव्यात. आणि चतकोर आकाराच्या काचऱ्या कराव्यात. गार पाण्यात बुडवून ठेवाव्यात.
२) बटाटे सोलून उभे चार भाग करून पातळ काचऱ्या कराव्यात.
३) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा आणि बटाटा घालावा. थोडे मीठ घालावे. झाकण ठेवून बटाटे ५०% शिजवावे.
४) वांग्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. वांग्याच्या काचऱ्या कढईत घालाव्यात. झाकण न ठेवता वांगी परतत राहावी. वांगी पटकन शिजतात, म्हणून कढईवर झाकण ठेवू नये.
५) वांगी शिजली कि चव पाहून लागल्यास मीठ घालावे. आता शेंगदाण्याचा कूट, साखर, आणि नारळ घालून मिक्स करावे. एक दोन मिनिटे भाजी परतावी आणि गरमच पोळीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर वाढावी.
टीपा:
१) मोठे वांगेसुद्धा वापरता येईल. तेव्हा वांगं-बटाट्याचे प्रमाण १ कप वांग्याच्या काचऱ्यांना ३/४ कप बटाट्याच्या काचऱ्या असे असावे.
२) आंबटपणासाठी १ टीस्पून लिंबाचा रस भाजी तयार झाल्यावर शेवटी घालावा.
0 comments:
Post a Comment