८ ते १० मध्यम तुकडे
पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ मिनीटे
३/४ कप मैदा
२५० ते ३०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ ते ३/४ कप )
१/४ कप बटर (मिठविरहित)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)
१) प्रेशर कूकरमधील रींग आणि शिट्टी काढून ठेवावी. आणि प्रेशर कूकर झाकण लावून मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवावा. साधारण ८ ते १० मिनीटे गरम करावा. कूकरमध्ये पाणी घालू नये. कोरडाच गरम करावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे. केकटीनला आतून बटरचे कोटींग करावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. बॅटर एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेपुरतेच बॅटर एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे. खुप जास्त फेटल्याने केक मध्यभागी सिंक होतो.
५) तयार बॅटर केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). कूकरची आच मध्यम करावी. गरम कूकरचे झाकण उघडून त्यात पकडीच्या सहाय्याने केकटीन ठेवावा. झाकण लावावे आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. २५ मिनीटे होईस्तोवर कूकर अजिबात उघडू नये. बेकिग करताना मधेमधे झाकण उघडल्यास कूकरच्या आतील तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण २५ मिनीटांनी कूकरचे झाकण उघडावे. आता केक फुललेला दिसेल पण आतून शिजला नसावा. तरीही मध्यभागी टूथपिकने टोचून पाहावे, जर ओलसर बॅटर लागले असेल तर अजून १०-१२ मिनीटे केक बेक होवू द्यावा.
७) १०-१२ मिनीटांनी टूथेपिकने मध्यभागी टोचून पाहावे. जर टूथपिकला ओलसर बॅटर लागले नसेल आणि टूथपिक क्लिन बाहेर आली तर केक बेक झाला असे समजावे. केकटीन पकडीच्या सहाय्याने बाहेर काढावा.
५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.
टीपा:
१) कंडेन्स मिल्क आवडीनुसार वाढवावे. वरील प्रमाणात बेताचा गोड होतो. काहीजणांना कमीगोड लागू शकतो, म्हणून बॅटर तयार झाले कि त्याची चव पाहावी, लागल्यास थोडे कंडेन्स मिल्क वाढवावे.
२) कूकरची रींग आणि शिट्टी काढायला विसरू नये. तसेच कूकरमध्ये पाणी घालू नये.
३) केकटीन जाड हिंडालियमचा असावा. पातळ मेटल घेऊ नये. उष्णतेमुळे भांड्याला तडा जाऊ शकते.
४) जर दोन कलरमध्ये केक बनवयाचा असेल तर केक बॅटरचे २ भाग करावे. एक भाग तसाच ठेवावा, दुसर्या भागात २ ते ३ टेस्पून डार्क कोको पावडर आणि थोडे कंडेन्स मिक्स घालावे. आधी पांढरा तसाच ठेवलेला भाग केकटीनमध्ये ओतावा. त्यावर कोको घातलेले बॅटर घालावे.आणि बेक करावे.
५) केकटीन कूकरमध्ये निट राहतो आहे कि नाही ते आधी तपासून पाहावे. नाहीतर कूकर लहान असल्यास काही करता येणार नाही.
६) केकचे बॅटर केकटीनमध्ये अर्ध्यापेक्षा किंचीत जास्त भरावे. भांडे पूर्ण भरू नये त्यामुळे केक फुलल्यावर भांड्याच्या बाहेर येतो.
0 comments:
Post a Comment