वेळ: पूर्वतयारी: २० मिनिटे | पाकृसाठी वेळ १० मिनिटे
साहित्य:
२० भेंडी
वाटणासाठी: १ लहान कांदा, १/२ कप ताजा खोवलेला नारळ, ४ लसूण पाकळ्या, २-३ लाल सुक्या मिरच्या, १ टीस्पून धणे, १ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून मेथीदाणे
फोडणीसाठी: ३ टेस्पून तेल (टीप १ पहा), २ चिमटी मोहोरी, २ चिमटी जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, कढीपत्ता
२-३ आमसुलं
चवीपुरते मीठ
२-३ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) वाटणासाठी कांदा सोलून उभा चिरून घ्यावा. चिरलेला कांदा, नारळ, लसूण, मिरच्या, धणे-जिरे आणि मेथीदाणे असे सर्व एकत्र १/४ कप गरम पाण्यात भिजवावेत. १५-२० मिनिटानी मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
२) भेंडी धुवून पुसून घ्यावी. दोन्ही कडेची देठं कापून टाकावीत. जर भेंडी आकाराला लहान असेल तर अख्खीच वापरावी. नाहीतर दोन तुकडे करावे. अख्खी भेंडी वापरणार असाल तर मध्यभागी उभी चीर द्यावी.
३) मध्यम पातेल्यात तेल गरम करावे. त्यात चिरलेली भेंडी मिडीयम हाय फ्लेमवर ब्राउन होईस्तोवर तळावी. याला साधारण ७-८ मिनिटे लागतात. कमी तेलात तळत असल्याने भेंडी कालथ्याने सतत परतत राहा. भेंडी तळल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
४) त्याच तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करा त्यात वाटलेला मसाला घाला आणि मोठ्या आचेवर परता. मिश्रण बऱ्यापैकी कोरडे झाले आणि थोडे तेल सुटायला लागले कि त्यात पाणी घाला. पाणी घालून आवश्यक तेवढे पातळ करा. आमटीत आमसुलं आणि मीठ घाला.
५) आमटीला उकळी फुटली कि तळलेल्या भेंडी घालाव्यात आणि २-३ मिनिटे उकळू द्यावे. गॅस बंद करून आमटीवर झाकण ठेवा. ५ मिनिटे आमटी मुरू द्या आणि लगेच भाताबरोबर सर्व्ह करा.
टीपा:
१) ३ टेस्पून तेलात आधी भेंडी तळून घ्यावी आणि उरलेल्या तेलात फोडणी करावी.
२) आंबटपणासाठी आमसुलाऐवजी कैरीच्या फोडीसुद्धा घालू शकतो.
0 comments:
Post a Comment