वेळ: ४० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
४ लहान भोपळी मिरच्या
१/४ कप मटार
१/४ कप उकडलेले मक्याचे दाणे
१/२ कप पनीरचे लहान चौकोनी तुकडे
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१/४ कप गाजर, लहान चौकोनी तुकडे
१/२ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१४ टीस्पून लाल तिखट
१/४ कप नारळाचे दुध
चवीपुरते मीठ
२ मध्यम बटाटे, उकडून कुस्करलेले
१ टेस्पून + ३ टेस्पून तेल
कृती:
१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात कांदा आणि गाजर घालून मिनिटभर परतावे. झाकण ठेवून २-४ मिनिटे शिजवावे. आच मध्यम करून नारळाचे दुध घालावे.
२) मका आणि मटार घालावे. थोडे मीठ घालून मिक्स करावे. भाज्या मऊ होईस्तोवर शिजवावे.
३) गरम मसाला, धने-जिरेपूड, आणि लाल तिखट घालून ढवळावे. जर मिश्रणाला थोडा रस राहिला असेल तर थोडी आच मोठी करून थोडे कोरडे करून घ्यावे.
४) भोपळी मिरचीचा शेंडीकाडचा भाग कापून घ्यावा. आतील बिया काढून टाकाव्यात. तयार मिश्रण मिरच्यांमध्ये भरावे.
५) कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये थोडे मीठ घालावे. आणि परत कुस्करावे, जर गुठळ्या राहिल्या असतील तर त्यात बारीक कराव्यात. भरलेल्या मिरच्या बटाट्याने सील करून टाकाव्यात.
६) नॉनस्टिक पॅनमध्ये ३ टेस्पून तेल घालावे. त्यात मिरच्या सील केलेली बाजू खाली अशा रीतीने ठेवाव्यात. झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण २५ मिनिटे शिजवाव्यात. या २५ मिनिटात मध्येमध्ये मिरच्या हलवून पलटाव्यात. म्हणजे करपणार नाहीत आणि समान शिजतील. (मिरच्यांची साले एकदम मऊ बनतील आणि थोडी सुरकुततील)
कांदा टोमॅटोची ग्रेव्ही किंवा आवडीची तिखट ग्रेव्ही वर घालून भरली भोपळी मिरची पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी. भरली भोपळी मिरचीवर माखनी ग्रेव्हीसुद्धा खूप छान लागते.. माखनी ग्रेव्हीची रेसिपी.
टीप:
१) वर दिलेल्या भाज्यांव्यतिरिक्त आवडीच्या कोणत्याही भाज्या घालता येतील.
0 comments:
Post a Comment