४ जणांसाठी (प्रत्येकी १ मोठी वाटी)
वेळ: २० मिनीटे
पाऊण ते एक कप भेंडीचे तुकडे (१ इंच)
४ अळूची मध्यम पाने (टीप)
१/२ कप पडवळाच्या चकत्या
२०० ग्राम लाल भोपळ्याच्या फोडी (मध्यम) (साले काढून)
१/४ कप मटारचे दाणे
१/४ कप पापडी दाणे
१/४ कप मक्याचे दाणे
५-६ बेबी कॉर्न, (१ इंचाचे तुकडे करावे)
२ टेस्पून शेंगदाणे (३ तास भिजवलेले)
२ टिस्पून चिंच (कोळ करून घ्यावा)
१ हिरवी मिरची
१/२ कप ताजा खवलेला नारळ
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ
कृती:
१) अळूची पाने धुवून त्याची देठं कापून घ्यावीत. देठ सोलून वेगळी ठेवावीत. त्याचे बारीक तुकडे करावेत.
२) पाने बारीक चिरून घ्यावीत. कूकरमध्ये अळू (फक्त पाने) १ शिट्टी करून शिजवून घ्यावा.
२) अळूची शिजवलेली पाने मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. वाटताना मिरचीही घालावी.
३) कूकर गरम करावा व त्यात तूप-जिर्याची फोडणी करावी. त्यामध्ये सर्व भाज्या अळूच्या देठांसह फोडणीस घालाव्यात. थोडावेळ परतून वाटलेली अळूची पाने घालावीत.
४) चिंचेचा कोळ घालावा. चवीपुरते मिठ आणि भाज्या शिजण्यापुरते पाणी घालावे.
५) कूकरचे झाकण बंद करावे आणि मध्यम आचेवर साधारण १५ मिनीटे भाजी शिजू द्यावी. १५ मिनीटांनी गस बंद करावा. वाफ मुरली कि कूकरचे झाकण उघडावे आणि ओला नारळ घालून मिक्स करावे. एक उकळी काढावी.
गरमा गरम भाजी, पोळी किंवा दशमीबरोबर सर्व्ह करावी. हि भाजी नुसती खायलाही चविष्ट लागते.
टीप:
१) मला जितक्या भाज्या मिळाल्या तेवढ्या मी वापरल्या. परंतु ऋषींच्या भाजीमध्ये अजूनही काही भाज्या वापरल्या जातात. यामध्ये मुख्यत: लाल माठ, चवळी, आंबट चुका, अंबाडी यासारख्या पालेभाज्या वापराव्यात. पालक, मेथी, शेपू यांसारख्या उग्र चवीच्या भाज्या वापरू नयेत, भाजीची चव बिघडते. तसेच सुरण, रताळे, अळकुडी (अर्बी) यांसारखे कंदही वापरावेत. काकडी, तोंडली आणि दोडकाही घालता येतो.
२) जर अंबाडीचा पाला वापरणार असाल तर चिंचेचा कोळ घालू नकात अथवा चव पाहून अगदी कमी प्रमाणात घालावा.
३) मी अळूची पाने उकडून, बारीक वाटून घेतली होती. याचे कारण भाजी चांगली मिळून येते. पालेभाज्या नुसत्या बारीक चिरून इतर भाज्यांबरोबर फोडणीस घातल्या तरीही चालेल.
४) आंबट चवीच्या भाज्या आणि चिंच वापरायची नसेल तर भाजी तयार झाल्यावर उकळी काढताना, आंबटपणासाठी १ वाटी घट्ट ताक घालावे आणि थोडावेळ ढवळावे म्हणजे ताक फुटणार नाही.
५) भाजीला तूप-जिर्याची फोडणी घातली नाही तरीही चालते. कूकरमध्ये सर्व भाज्या फोडणीशिवाय शिजवाव्यात (वरील कृतीप्रमाणे). आणि भाजी सर्व्ह करताना १ टिस्पून तूप घालून सर्व्ह करावी.
६) भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त केले तरीही चालते.
Labels:
Rishi Panchami Bhaji, Rishi chi Bhaji, Ganapati Recipes
0 comments:
Post a Comment