वेळ: १५ मिनिटे
५ मध्यम धिरडी
एक कप बेसन
२ टेस्पून रवा
१ टीस्पून मिरचीची पेस्ट,
२-३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ + ३/४ कप पाणी
१ टीस्पून लसूण पेस्ट
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
२ चिमटी जिरे
चवीपुरते मीठ
धिरडी बनवताना थोडे तेल
कृती:
१) खोलगट वाडग्यात बेसन आणि रवा मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालून मध्यमसर मिश्रण बनवावे. गुठळ्या राहू देवू नयेत. जर गुठळ्या राहिल्याच तर हे मिश्रण गाळून घ्यावे. गाळण्यात ज्या गुठळ्या असतील त्या फोडून भिजवलेल्या पिठात मिक्स करावे.
२) भिजवलेल्या पिठात मिरची पेस्ट, कोथिंबीर, लसूण पेस्ट, हळद, हिंग, जिरे आणि मीठ घालून मिक्स करावे.
३) नॉनस्टिक तवा गरम करून आच मिडीयम-हाय फ्लेमवर ठेवावी. थोडेसे तेल घालावे. लाकडी कालथ्याने ते सर्वत्र पसरवावे. डावभर मिश्रण तव्यावर घालून पातळसर धिरडे घालावे.
४) झाकण ठेवावे. १ मिनिटाने झाकण काढून धीराद्याच्या कडेने थोडे तेल सोडावे. परत झाकण ठेवून २ मिनिटे एक बाजू शिजू द्यावी. झाकण काढून दुसऱ्या बाजूला धिरडे पलटावे. झाकण ठेवून दुसरी बाजू शिजू द्यावी. लागल्यास थोडे तेल घालावे.
गरम धिरडे नारळाच्या चटणीबरोबर किंवा लसणीच्या तिखटाबरोबर खायला द्यावे.
0 comments:
Post a Comment