वेळ: ३५ ते ४० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
३/४ कप मटार (फ्रोझन)
३/४ कप खवा, भाजलेला
१५० ग्राम पनीर, लहान चौकोनी तुकडे (टीप १)
३/४ कप टोमॅटो प्युरी,
१/२ कप दुध/ पाणी
१ टिस्पून तूप
१ लहान आल्याचा तुकडा, बारीक किसून
१/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरे (ऐच्छिक)
१ टिस्पून धणेपुड
१/२ टिस्पून जिरेपूड
७ ते ८ काजू बी, (थोडे सजावटीसाठी ठेवावे)
१ टेस्पून बेदाणे + अजून थोडे सजावटीसाठी
१ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
अख्खा गरम मसाला= १ तमाल पत्र, २ लवंगा, ३ ते ४ मिरीदाणे, २ हिरवी वेलची, १ लहान दालचिनीची काडी किंवा १/२ टिस्पून दालचिनी पावडर
कृती:
१) कढई गरम करून त्यात आख्खे गरम मसाले हलके भाजून घ्यावे. भाजले गेल्यावर लवंगा फुगतात आणि वेलची फुगून फुटते. हे सर्व मसाले कुटून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये बारीक करावे.
२) कढईत तूप गरम करावे. त्यात काजू, जिरे, आलं आणि टोमॅटो प्युरी घालावी. कढईवर झाकण ठेवून २-३ मिनीटे शिजू द्यावे.
३) भाजलेला खवा आणि १ टीस्पून कुटलेला मसाला घालून मिक्स करावे. जमतील तेवढ्या गुठळ्या फोडाव्यात. तरी, बारीक बारीक गुठळ्या आणि रवाळ टेक्स्चर अपेक्षित आहे. चांगले मिळून येईस्तोवर परतावे (३-४ मिनीटे)
४) आता मटार आणि दुध/ पाणी घालावे. मिक्स करून झाकण ठेवावे व ४-५ मिनीटे शिजू द्यावे.
५) धणे-जिरेपूड, साखर, लाल तिखट, बेदाणे आणि मिठ घालून मिक्स करावे. २-३ मिनीटे उकळी काढावी.
६) शेवटी पनीर घालून १-२ मिनीटे उकळी काढावी.
गरमच सर्व्ह करावी.
टीपा:
१) जेव्हा विकतचे पनीर वापरत असाल तेव्हा पनीरचे लहान चौकोनी तुकडे करावेत. गरम पाण्यात २ मिनीटे बुडवून ठेवावेत. पनीर छान मऊसुत होईल आणि तळायला लागणार नाही.
२) जर टोमॅटोला आंबटपणा नसेल तर थोडीशी आमचूर पावडर घालावी.
३) दुध घातल्यावर ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करावी नाहीतर दुध फुटते आणि ग्रेव्ही चोथापाणी होते.
४) जर दालचिनी पावडर वापरणार असाल तर ती इतर मसाल्यांबरोबर भाजू नये, भाजल्यास करपते. म्हणून धणे-जिरेपूड बरोबर दालचिनी पावडर भाजीत घालावी.
0 comments:
Post a Comment