Kashmiri Dum Aloo in English
वेळ: साधारण १ तास
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
१५ ते १८ लहान बटाटे (टीप)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ कप टोमॅटो, बारीक चिरून
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ टेस्पून काजूची पूड
४ टेस्पून दही, फेटून
१/२ टिस्पून सुंठ पावडर, १ टिस्पून बडीशेप पावडर, २ चिमटी लवंग पावडर
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून गरम मसाला
२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (टीप)
१ टिस्पून साधं लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल
तळणासाठी तेल
कृती:
१) बटाटे धुवून घ्यावेत. पातेल्यात मिठाचे पाणी उकळवावे. त्यात हे बटाटे सोडून १० मिनीटे झाकण ठेवून किंचीत शिजू द्यावे, जेणेकरून वरचे साल काढता येईल. १० मिनीटांनी पातेल्यातील गरम पाणी काढून गार पाणी सोडावे. आणि बटाट्याचे साल काढून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात बटाटे मिडीयम हाय आचेवर गोल्डन ब्राऊन तळून घ्यावे. खुप भरभर तळून काढू नये. नाहीतर बटाटे बाहेरून ब्राऊन होतात आणि आतून शिजत नाहीत. तळलेले बटाटे टिपकागदावर काढून घ्यावेत. काट्याने किंचीत टोचून घ्यावे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये घातल्यावर आतपर्यंत ग्रेव्ही मुरेल.
३) कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात आले लसूण परतावे. कांदा घालून लालसर होईस्तोवर परतावे. साधं लाल तिखट, काजूची पूड आणि टोमॅटो घालावा.मिठ घालून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर परतावे. हा मसाला थोडा गार होवू द्यावा. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
४) त्याच कढईत १ चमचा तेल घालून हळद आणि काश्मिरी लाल तिखट घालावे. त्यावर कांदा-टोमॅटोची प्युरी घालावी. प्युरी उकळायला लागली कि त्यात सुंठ पावडर, बडीशेप पावडर, लवंग पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून मिक्स करावे.
५) दही घालण्यापूर्वी ५ मिनीटे आच एकदम कमी करावी. नंतर दही घालून भराभर मिक्स करावे म्हणजे दही फुटणार नाही. एग बिटरने मिक्स करावे म्हणजे दही व्यवस्थित मिक्स होईल.
६) दही निट मिक्स झाले कि तळलेले बटाटे घालावेत आणि झाकण ठेवून १५ मिनीटे ग्रेव्ही आटू द्यावी. मधेमधे झाकण काढून ढवळावे म्हणजे ग्रेव्ही तळाला चिकटणार नाही.
गरजेइतका दाटपणा येऊ द्यावा. ग्रेव्ही भातावर किंवा पोळीबरोबर उत्तम लागते.
टीपा:
१) जर लहान बटाटे नसतील बटाट्याचे मोठे तुकडे करून वरीलप्रमाणेच वापरता येतील.
२) काश्मिरी तिखट रंग येण्याकरता घातले आहे. या मिरची पावडरला तिखटपणा नसतो म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखटही घालावे.
Thursday, 21 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment