Rava Coconut laddu in English
२२ ते २४ मध्यम लाडू
वेळ: ३० मिनीटे (मिश्रण आळायला लागणारा वेळ न धरता)
साहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप खवलेला ताजा नारळ
दिड कप साखर
१ कप पाणी
३ ते ४ टेस्पून तूप
१/२ टिस्पून वेलची पूड
२५ बेदाणे
कृती:
१) रवा मध्यम आचेवर ४ मिनीटे कोरडाच भाजावा. तळापासून सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही. [रंग बदलेस्तोवर भाजू नये, अगदी हलकेच भाजावे. नंतर परत रवा भाजायचा आहे.]
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे. नारळातील ओलसरपणा रव्यात उतरेस्तोवर (१० मिनीटे) तसेच ठेवावे.
३) कढई गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि रवा-नारळाचे मिश्रण घालावे. ८ ते १० मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे. काही वेळाने रवा आणि तूपाचा छान वास येईल. रव्याचा रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि साधारण ३ ते ४ मिनीटांनी पाकाचा थेंब पहिले बोट आणि अंगठा यात पकडून उघडझाप करावी. जर एक तार दिसली कि पाक तयार आहे असे समजावे [हि तार अगदी सेकंदभरच दिसेल]. किंवा एकतारी पाक ओळखता येत नसेल. मिश्रण उकळायला लागले कि ३ ते ४ मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.
५) लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.
मिश्रण आळले कि लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.
टीपा:
१) हे लाडू फार काळ टिकत नाहीत, जास्तीत जास्त ७-८ दिवस टिकतील. उष्ण आणि दमट हवामानात ३-४ दिवसच टिकतील. अशावेळी २-३ दिवसांनी लाडू फ्रिजमध्ये ठेवावे.
२) रवा साधारण ३ प्रकारचा मिळतो. जाड (coarse), बारीक (fine), एकदम बारीक (super fine). वरील रेसिपीसाठी बारीक रवा वापरावा. जाड रव्यामुळे लाडू चरचरीत लागतात. एकदम बारीक रवा पिठासारखाच दिसतो त्यामुळे रवा लाडूसाठी योग्य नसतो.
३) लाडूचे मिश्रण जर कोरडे झाले तर एकतारी पाक जरा जास्त आटल्याने दोन तारी किंवा तीन तारी झाला असावा. अशावेळी १/२ कप पाणी + ३ टेस्पून साखर असे मिश्रण उकळवावे. ३ ते ४ मिनीटे उकळवून पाक लाडू मिश्रणावर ओतावा. मिक्स करून मिश्रण आळले कि लाडू करावे.
४) आवडीनुसार सुका मेव्याचे तुकडे घालावे.
५) नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यावा. करवंटीकडील काळपट भाग घेऊ नये.
Tuesday, 26 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment