Pages

Sunday, 2 September 2012

सॉय चंक्स चिली - Soya chunks Chili

Soya chunks Chilli in English

वेळ: ३५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

साहित्य:
१ कप सोया चंक्स
२ मध्यम कांदे
१ मध्यम भोपळी मिरची
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची, ठेचून
२ टीस्पून लसूण, पेस्ट
दीड टीस्पून आले, बारीक चिरून
१ टीस्पून व्हिनेगर किंवा चवीनुसार
२ टीस्पून सॉयसॉस
१/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
२ टेस्पून कॉर्न स्टार्च
२ टीस्पून रेड चिली पेस्ट (लाल मिरच्या गरम पाण्यात भिजवून झाकून ठेवावे. मऊ झाल्यावर बारीक पेस्ट करावी.)
२ टीस्पून टॉमेटो केचप
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
२ टेस्पून पातीकांद्याची पात, बारीक  चिरून

कृती:
१) पातेल्यात ४ कप पाणी उकळवावे. पाणी उकळले कि गॅस बंद करावा. यात सॉयचंक्स घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी पाणी काढून टाकावे. सोयाचंक्स घट्ट पिळून पाणी काढून टाकावे.
२) मध्यम वाडगे घ्यावे. त्यात सोया चंक्स, १ टीस्पून सॉयसॉस, १/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट, १ टेस्पून कॉर्न स्टार्च, १ टीस्पून लसूण, १/२ टीस्पून आले, १ हिरवी मिरची आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे. १५ मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
३) भोपळी मिरची चौकोनी आकारात कापून मध्यम तुकडे करावेत. प्रत्येक कांद्याचे अर्धे-अर्धे भाग करावे. त्यातील १/२ कांदा बारीक चिरून घ्यावा. उरलेल्या दीड कांद्याचे चौकोनी मध्यम तुकडे करावे. पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात.
४) कढईत तेल गरम करून त्यात सोयाचंक्स घालून तळून काढावेत.
५) मध्यम पॅन घेउन त्यात १ टेस्पून तेल गरम करावे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लसूण आणि आले घालून काही सेकंद परतावे. चौकोनी चिरलेला कांदा आणि भोपळी मिरची घालून ढवळावे. आता सोया सॉस, मीठ, रेड चिली पेस्ट, आणि टॉमेटो केचप घालून मिक्स करावे. ३० सेकंद परतावे.
६) १ टेस्पून कॉर्न स्टार्च ३ टेस्पून पाण्यात मिक्स करावे. आणि हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. ढवळावे. घट्टपणा वाटल्यास चमचा-दोन चमचे पाणी घालावे. आता तळलेले सोयाचंक्स आणि थोडे व्हिनेगर घालावे. मिक्स करावे आणि एक-दोन मिनिटे कमी आचेवर शिजू द्यावे.
सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून पाती कांद्याने सजवावे. गरमच सर्व्ह करावे.

टिप्स:
१) काश्मिरी रेड चिली पावडरला तिखटपणा फारसा नसतो. पण त्यामुळे लाल रंग छान येतो.
२) सोयाचंक्सना मॅरीनेट करून ठेवणे गरजेचे आहे कारण सोयाचंक्सना स्वतःची अशी चव काहीच नसते.
३) रेड चिली पेस्ट आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकतो.

0 comments:

Post a Comment