Pages

Thursday, 24 May 2012

मिरची का सालन - Mirchi Salan


वेळ: ३० ते ४० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी


साहित्य:
३ लांबड्या मिरच्या, एक बाजू सुरीने छेद करावा.
३ टेस्पून खवलेला ताजा नारळ
३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
१ टेस्पून तीळ
१ मध्यम कांदा, उभे पातळ काप
२ टेस्पून आलेलसूण पेस्ट
२ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
२ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
चिमूटभर मोहोरी, चिमूटभर मेथी दाणे, १/४ टीस्पून हळद
१ डहाळी कढीपत्ता
४ ते ५ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ

कृती:
१) नारळ, शेंगदाणा कुट आणि तीळ एकत्र करून संपूर्ण कोरडे होईस्तोवर आणि थोडे लालसर होईस्तोवर भाजावे. यात थोडे पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करावी.
२) २ टेस्पून तेल मध्यम पॅनमध्ये गरम करावे. त्यात मिरच्या घालून परतावे. आच मध्यम ठेवावी. झाकण ठेवून मिरच्या थोड्या मऊ, थोडीशी ब्राउन आणि सुरकुतेल इतपत शिजवावी. मध्येमध्ये बाजू पलटावी म्हणजे मिरच्या जळणार नाहीत.
३) मिरच्या शिजल्या कि पॅनमध्ये काढून ठेवाव्यात. त्याच पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम  करून त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. नंतर कांदा घालावा. कांदा चांगला लालसर आणि खरपूस होईस्तोवर परतावे. (वेळ वाचवण्यासाठी विकतचा तळलेला कांदा वापरावा.) थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटावे.
४) त्यात पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मेथीदाणे, मोहोरी, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. परतून कांद्याची पेस्ट आणि नारळ-शेंगदाणा-तीळ यांची पेस्ट घालून परतावे. निट मिक्स करून त्यात गरजेपुरते पाणी घालून कान्सीस्टन्सी सारखी करावी.
५) थोडे मीठ, धने-जिरेपूड, चिंचेचा कोळ घालावे. ५ मिनिटे मध्यम आचेवर उकळी काढावी. मिरच्या घालून ५ ते १० मिनिटे उकळी काढावी. चव पाहून काही कमी असल्यास घालावे.
मिरची सालन बिर्याणी बरोबर खातात. तसेच साधा भात किंवा पोळीबरोबरही छान लागते.

0 comments:

Post a Comment