Pages

Sunday, 16 October 2011

तांदुळाच्या पिठाच्या चकल्या - Rice Flour Chakali

Rice Flour Chakali in English

नग: १५ मध्यम चकल्या
वेळ: पूर्वतयारी- १५ मिनिटे | तळणीसाठी - २० मिनिटे

Rice flour chakali, Tandalachya chakalya, Murukku, chakliसाहित्य:
१ कप तांदळाचे पीठ
१ कप पाणी
१/४ कप बटर
चवीपुरते मीठ (टीप १)
१/२ टीस्पून जिरे
२ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट
तळणीसाठी तेल

कृती:
१) तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे.
२) लहान पातेल्यात पाणी गरम करावे. त्यात मीठ, जिरे, मिरचीची पेस्ट आणि बटर घालावे. बटर वितळून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि लगेच तांदळाच्या पिठात घालून चमच्याने मिक्स करावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
३) कोमट झाले कि मऊसर मळून घ्यावे.
४) चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा आणि तयार उकड भरून घ्यावी. तळणीसाठी तेल गरम करावे. आच मिडीयम आणि हायच्या बरोबर मधोमध ठेवावी.
५) प्लास्टिकच्या लहान कागदावर चकल्या पाडाव्यात (टीप ५) . चकली पाडून झाल्यावर शेवटचे टोक चिकटवून टाकायला विसरू नये.
६) चकल्या बदामी रंगावर तळून घ्याव्यात (टीप २ आणि ३). तळलेल्या चकल्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात म्हणजे अधिकचे तेल टिपून घेतले जाईल.
चकल्या पूर्ण गार झाल्या कि डब्यात भरून ठेवाव्यात.

टीपा:
१) मिठाचा अंदाज घ्यायचा तर स्टेप २ मध्ये जेव्हा मीठ घालू तेव्हा पाण्याची चव पहावी. पाणी गरजेपेक्षा थोडे खारट असावे. म्हणजे तांदळाच्या पिठात घातल्यावर मीठ अडजस्ट होते.
२) चकल्या जरा कमी तळल्या तर रंग पांढरा राहतो आणि कुरकुरीतसुद्धा होतात. पण पूर्ण गार झाल्यावर कधीकधी आतमध्ये किंचितशा मऊ राहतात. त्यामुळे जास्त दिवस टिकणार नाहीत म्हणून शक्यतो बदामी रंग येईस्तोवर पक्क्या तळाव्यात.
३) एकदम कमी आचेवर चकल्या तळू नयेत. चकल्या तेलकट होतात.
४) चकली यंत्रातून चकली पाडल्यावर ती उचलताना आणि तेलात सोडताना काळजी घ्यावी. तांदळाच्या पिठाला चिकटपणा कमी असतो. त्यामुळे उचलताना चकल्या मोडतात.
५) प्लास्टिकच्या कागदाचे साधारण ५ x ५ इंचाचे चौकोनी तुकडे करावेत. आणि एका कागदावर एकच चकली पाडावी म्हणजे चकली उचलताना सोपे जाईल. प्लास्टिक कागदाऐवजी अल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर वापरला तरी चालेल.

0 comments:

Post a Comment