Lauki Thalipeeth in English
वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे
साहित्य:
१ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
दीड ते दोन कप उपवासाची भाजणी किंवा गरजेनुसार
३ हिरव्या मिरच्या, ठेचून
१/४ चूप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना
कृती:
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्याभागी तेल सोडायला बोटाने छिद्रं करावे.
३) मिडीयम आणि हायच्या मध्ये गॅस अडजस्ट करावा. झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे.
टीप:
१) दुधी बिनबियांचा आणि कोवळा असावा, म्हणजे किसायला सोपा जातो.
२) थालीपिठ शिजायला वेळ लागतो. जास्त थालीपीठं बनवताना वेळ वाचवण्यासाठी दोन शेगड्यावर दोन तवे वापरून थालीपीठं बनवावी.
३) काहीजण दुधी भोपळा उपवासाला खात नाहीत. म्हणून दुधीऐवजी काकडी किसून घालावी.
Thursday, 28 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment