वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: २५ ते ३० मिनीटे
साहित्य:
१ मोठी जुडी मेथी, पानं खुडून धुवून घ्यावी.
१५० ग्राम पनीर, लहान तुकडे (टीप)
१ लहान कांदा, पातळ उभा कापून
१ मध्यम टोमॅटो, मध्यमसर चौकोनी तुकडे
१/२ इंच आलं
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, चिरून
२ ते ४ काळी मिरी
१ टेस्पून दही
१/२ कप क्रिम (टीप)
फोडणीसाठी: १ + १ टेस्पून तेल, चिमूटभर हळद
१ टिस्पून धणे पावडर
चवीपुरते मिठ
कृती:
१) १ टेस्पून तेल पॅनमध्ये गरम करावे. त्यात काळी मिरी, आले, लसूण आणि कांदा घालावा. कांदा लालसर होईस्तोवर परतावे. आता चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईस्तोवर शिजवावा. गॅस बंद करून हे मिश्रण थंड होवू द्यावे. थंड झाले कि पाणी न घालता प्युरी करून घ्यावी.
२) मेथीची पाने बारीक चिरून घ्यावी. १ टेस्पून तेल पॅनमध्ये गरम करावे. हळद आणि मेथी घालावी बरोबर २-३ चिमटी मिठही घालावे. झाकण न ठेवता मेथी परतावी.
३) मेथीतील पाण्याचा अंश निघून कोरडी झाली कि कांदा-टोमॅटोची प्युरी आणि दही घालावे. निट ढवळून थोडावेळ शिजू द्यावे. धणेपुड आणि गरजेपुरते मिठ घालावे, मिक्स करावे.
४) गॅस अगदी मंद करावा (टीप). पनीर आणि क्रिम घालावे. तसेच लागल्यास थोडे पाणी घालून ढवळावे. खुप पाणी घालू नये कारण मिश्रण जास्त उकळवायचे नाहीये, फक्त खुप घट्ट वाटल्यासच पाणी घालावे.
तयार भाजी पोळी, नान बरोबर सर्व्ह करावी.
टीप्स:
१) रेडीमेड पनीर वापरत असाल तर पनीरचे लहान चौकोनी तुकडे करून गरम पाण्यात २-३ मिनीटे बुडवून ठेवावे. यामुळे पनीर नरम होते.
२) जर क्रिम उपलब्ध नसेल तर, १/२ कप मिल्क पावडर १/४ कप पाण्यात मिक्स करून वापरली तरीही चालेल.
३) गॅसची आच एकदम मंद करूनच क्रिम भाजीत घालावे तसेच एकदा क्रिम घातले कि भाजी जास्तवेळ गरम करू नये. यामुळे क्रिम भाजीत फुटते.
0 comments:
Post a Comment