वेळ: ३० ते ४० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
३ कप बारीक चिरलेली मेथीची पाने
१ मध्यम बटाटा, (सोलून मध्यम तुकडे करावेत)
१ लहान कांदा, बारीक चिरून (साधारण १/२ कप)
१ लहान टोमॅटो
फोडणीसाठी:- दिड टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, १ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद
२ ते ३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
चवीपुरते मिठ
कृती:
१) टोमॅटो प्युरी - टोमॅटो काचेच्या वाडग्यात ठेवून त्यात टोमॅटो बुडतील इतपत पाणी घालावे. २ मिनीटे मायक्रोवेव्हमध्ये शिजवावे. पाणी काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी आणि गाळून घ्यावी.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग हळद, आणि मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून ५० % शिजवावा. नंतर बटाट्याचे तुकडे घालावेत (टीप १). मिक्स करून झाकण ठेवावे आणि बटाटा शिजू द्यावा. बटाटा कढईला चिकटू नये म्हणून मधेमध्ये ढवळावे.
३) टोमॅटो प्युरी घालून मोठ्या आचेवर परतावे. जोवर टोमॅटो प्युरी चांगली आळत नाही तोवर परतत राहावे.
४) आता चिरलेली मेथी घालून बरोबर २-३ चिमटी मिठ घालावे. खुप जास्त मिठ घालू नये कारण मेथी शिजल्यावर आळते आणि एकदम कमी होते. मेथीसुद्धा मोठ्या आचेवर परतावी.
५) मेथीमधील पाण्याचा अंश निघून गेला कि आच कमी करून १-२ मिनीटे परतावे. चव पाहून लागल्यास मिठ घालावे.
भाजी गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी
टीपा:
१) उकडलेला बटाटाही वापरू शकतो. फक्त बटाट्याच्या फोडी मेथी परतल्यावर घालाव्यात.
(फोडणी + कांदा पुर्ण शिजवणे + टोमॅटो प्युरी घालून आटवणे + मेथी व मिठ घालून मेथी + आळेस्तोवर परतावे + उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून काही मिनीटे परतावे)
२) हि भाजी कुठल्याही मसाल्याशिवाय छान लागते. तरी आवडीप्रमाणे मसाल्याचा वापर करू शकतो (धणेजिरेपूड, गरम मसाला)
३) कांद्याऐवजी लसूणही वापरू शकतो. १ टिस्पून लसूण पेस्ट वापरावी.
0 comments:
Post a Comment