वेळ: २५ मिनीटे
वाढणी: ४ ते ५ मध्यम भाकर्या
साहित्य:
२ कप ज्वारीचे पिठ
अंदाजे दिड ते दोन कप गरम पाणी
१ टेस्पून लोणी किंवा तूप
१/४ टिस्पून मिठ
१/२ ते पाऊण कप ज्वारीचे पिठ भाकरी थापायला किंवा लाटायला
भोगीची भाजी रेसिपी
कृती:
१) पातेल्यात पाणी गरम करून त्यात १ टेस्पून लोणी सोडावे. पाणी चांगले गरम झाले कि परातीत ज्वारीचे पिठ आणि मिठ घालून मिक्स करावे. त्यात पाणी बेताबेताने ओतावे. हळू हळू मिक्स करून मळावे. पिठ चांगले मळले गेले पाहिजे.
२) मळलेल्या पिठाचे ४ किंवा ५ गोळे करावे व लगेच भाकरी करण्यास घ्यावी.
३) तवा गरम झाला कि गॅस मिडीयम हाय हिटवर ठेवावा. मळलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पिठात बुडवून हलक्या हाताने लाटावा (टीप १). लागल्यास अजून थोडे कोरडे पिठ घ्यावे. भाकरी मध्यमसर जाड ठेवावी.
४) भाकरी तव्यावर टाकावी. वरच्या बाजूने हाताने किंवा सुती कापडाने पाणी लावावे. पाणी सुकत आले कि भाकरी पलटावी व दुसर्या बाजूने भाजावी. (महत्त्वाची टीप २)
गरमागरम भाकरीवर लोणी घालून झुणका, पिठलं किंवा वांगं-बटाटा-कांदा अशा मिक्स रस्सा भाजीबरोबर छान लागते.
टीप:
१) भाकरी थापूनही करू शकतो. पिठाचा गोळा थोड्या जास्त पिठावर हलके हलके थापावा व भाकरी वाढवत न्यावी.
२) माझ्या घरी इलेक्ट्रिक स्टोव्ह कॉईल असल्याने आचेवर भाजता येत नाही. पण घरी विस्तवाची (flame) शेगडी असेल तर भाकरीची एक बाजू तव्यावर शेकावी. दुसर्या बाजूला लावलेले पाणी सुकले कि फुलके भाजायच्या चिमट्याने दुसरी बाजू थेट आचेवर ठेवावी. चिमट्याच्या मदतीने थोडी गोलगोल फिरवावी म्हणजे जळणार नाही.
३) भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि ज्वारी/बाजरीची भाकरी खातात. भाकरीवर तिळ लावून भाकरी भाजतात. भाकरी लाटताना/ थापताना वरून तिळ पेरावे आणि मग लाटावी/ थापावी.
0 comments:
Post a Comment