३ जणांसाठी
वेळ: साधारण ३० मिनीटे
एक ते सव्वा कप सोललेल्या डाळींब्या (स्टेप १)
१२ ते १५ तोंडली
फोडणीसाठी:
१ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून सुका नारळ
१ टिस्पून जिरे
१ टिस्पून गूळ
२ आमसुलं
१/४ कप कोथिंबीर
२ टेस्पून ओला नारळ
चवीनुसार मिठ
कृती:
१) साधारण ३/४ कप वाल कोमट पाण्यात १० ते १२ तास भिजत ठेवावे. नंतर पाणी काढून टाकून भिजलेले वाल मोड आणण्यासाठी पंच्यात ८ ते १० तास गच्च बांधून उबदार ठिकाणी ठेवावे. वालाची पुरचूंडी एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी. डाळींब्यांना मोड आले कि कोमट पाण्यात १० मिनीटे टाकून ठेवावे. डाळींब्या सोलून घ्याव्यात. मोड आलेल्या डाळींब्या हाताळताना त्या अख्ख्या राहतील याची काळजी घ्यावी. साधारण सव्वा ते दिड कप डाळींब्या होतील.
२) तोंडली स्वच्छ धुवून घ्यावीत. प्रत्येक तोंडल्याचे उभे ४ ते ५ काप करावेत आणि गार पाण्यात ठेवून द्यावे.
३) कढईत किसलेला सुका नारळ मध्यम आचेवर भाजून घ्यावे. नंतर जिरे खरपूस भाजून घ्यावे. नंतर भाजलेला नारळ आणि भाजलेले जिरे निट कुटून घ्यावे.
४) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी घालून तडतडू द्यावी. नंतर जिरे, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी. थोडावेळ परतून प्रथम चिरलेली तोंडली घालावीत. २ मिनीटे मध्यम आचेवर वाफ काढावी. नंतर डाळींब्या घालाव्यात. हलक्या हाताने परतावे. कढईवर पाण्याची ताटली ठेवून वाफ काढावी. हे शक्य नसेल तर गरजेनुसार पाण्याचा हबका मारावा आणि वाफ काढावी. आमसुलं आणि मिठ घालून वाफ काढावी. तसेच भाजलेले जिरे-खोबरेही घालावे.
५) डाळींब्या आणि तोंडली साधारण शिजत आले कि गूळ घालून वाफ काढावी. डाळींब्या खुप नाजुक असतात पटकन मोडल्या जातात म्हणून हलक्या हाताने परतावे.
भाजी तयार झाली कि ओला नारळ घालावा. गरमागरम पोळ्यांबरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) आमसुलाऐवजी चिंचेचे पाणी वापरू शकतो.
२) काही जणांना हि भाजी रसदार आवडते तेव्हा शिजवताना गरजेपुरते पाणी घालावे.
३) या भाजीला थोडा गोडा मसाला (महाराष्ट्रीयन मसाला) घातल्यास छान स्वाद येतो.
Labels:
Tondli Dalimbya usal bhaji, gherkins sabzi, ivy gourd
0 comments:
Post a Comment