वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: २० ते २५ मिनीटे
१ कप तांदूळ
१/२ कप मूग डाळ (टीप १ व २)
तीन ते साडेतीन कप गरम पाणी (टीप ३)
फोडणीसाठी:- १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट
१/२ कप मटार (टीप ५)
१ टिस्पून गोडा मसाला
चवीपुरते मिठ
कृती:
१) खिचडी करायच्या आधी तांदूळ आणि डाळ एकत्र करून पाण्याने स्वच्छ धुवावे. पाणी काढून १/२ तास निथळत ठेवावे.
२) लहान कूकरमध्ये (टीप ६) तेल गरम करावे त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आणि तिखट घालून फोडणी करावी. नंतर डाळ आणि तांदूळ घालून परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतावे. डाळ-तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजेत.
३) डाळ तांदूळ परतले कि मटार टाकून थोडासा वेळ आणखी परतावे. नंतर यात गरम पाणी घालावे. गोडामसाला आणि मिठ घालावे. ढवळून पाण्याची चव पाहावी. लागल्यास मिठ, किंवा लाल तिखट घालावे.
४) पाण्याला उकळी आली कि कूकरचे झाकण लावून ३ ते ४ शिट्ट्या होवू द्याव्यात. वाफ मुरली (साधारण १० मिनीटे) कि कूकर उघडून खिचडी सर्व्ह करावी.
खिचडीवर १ चमचा तूप घालावे.
टीप:
१) मूगाच्या पिवळ्या डाळीऐवजी, मूगाची सालासकट डाळ किंवा तूरडाळ, मसूर डाळही वापरता येते.
२) डाळीचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करता येते.
३) खिचडी जर मऊ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे व फडफडीत हवी असल्यास किंचीत कमी करावे.
४) तांदूळ चांगले भाजल्याने खिचडीचा गोळा होत नाही आणि शितं वेगवेगळी राहतात. भाजताना फक्त ते जळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
५) मटारऐवजी बटाटा, फ्लॉवर, भोपळी मिरची, कांदा, गाजर इत्यादी घालू शकतो.
६) खिचडी कूकर न वापरता थेट पातेल्यातही करता येते. पातेल्यात फोडणी करून त्यात तांदूळ परतावे आणि गरम पाणी व इतर साहित्य नेहमीसारखेच घालावे. फक्त पाणी साधारण तिप्पट लागते. भाजलेल्या तांदूळात पाणी घातले कि झाकण न ठेवता मोठ्या आचेवर शिजवावे आणि पाण्याचे बुडबूडे कमी झाले व पाणी कमी होवून तांदूळ दिसायला लागले कि आच बारीक करून पातेल्यावर झाकण ठेवावे आणि खिचडी शिजू द्यावी. फक्त तूरडाळ वापरणार असाल तर ती आधी पाण्यात भिजवून ठेवावी, कारण ती लगेच शिजत नाही.
0 comments:
Post a Comment