Pages

Wednesday 28 November 2012

वडाभात - Nagpuri Vada Bhat


वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
::::वड्यांसाठी:::: (टीप १ नक्की वाचा)
१/४ कप चणाडाळ
२ ते ३ टेस्पून मटकीची डाळ किंवा अख्खी मटकी
२ टेस्पून उडीद डाळ
२ टेस्पून तूर डाळ
२ टेस्पून मसूर डाळ
२ टेस्पून मूग डाळ
७ ते ८ लसूण पाकळ्या
७ ते ८ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून जिरे
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
तळणीसाठी १ ते दीड कप तेल (लहान आकाराची कढई घ्यावी)
::::भातासाठी::::
१ कप तांदूळ
दीड कप पाणी
१/२ टीस्पून मीठ
::::फोडणीसाठी:::: (टीप ५ पहा)
४ टेस्पून तेल
१/४ टीस्पून मोहोरी
१/४ टीस्पून हिंग
२ चिमटी हळद
४ ते ५ सुक्या लाल मिरच्या

कृती:
१) सर्व डाळी एकत्र करून किमान ३ तास कोमट पाण्यात भिजत घालाव्यात. चाळणीत काढून पाणी निथळून टाकावे. पाणी निथळून गेले कि भिजवलेल्या डाळी मिक्सरमध्ये घालाव्यात. त्यात जिरे, मिरच्या, लसूण पाकळ्या आणि मीठ घालून भरडसर वाटावे. वाटताना पाणी घालू नये.
२) तांदूळ धुवून त्यात दीड कप पाणी आणि थोडे मीठ घालावे आणि कुकरमध्ये फडफडीत भात शिजवावा.
३) तळणीसाठी तेल तापवावे. आच मध्यम करावी. वाटलेल्या मिश्रणात कोथिंबीर घालून मिक्स करावे. हातावर लहान लिंबाएवढा गोळा घ्यावा. अंगठ्याने दाबून चपटा करावा आणि तेलात सोडावा. अशाप्रकारे सर्व वडे तळून घ्यावे.
४) कढल्यात ४ टेस्पून तेल गरम करावे. तेल तापले कि आच मंद करावी किंवा बंद करावी. मोहोरी, हिंग, हळद आणि मोडलेल्या सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी.
५) भात पानावर वाढावा. त्यावर २-३ वडे कुस्करून घालावे. आणि २ ते ३ चमचे फोडणी घालावी.
वडाभातासोबत कढी खूप छान लागते.

टीपा:
१) डाळींचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. जर मटकीची डाळ नसेल तार अख्खी मटकीसुद्धा वापरू शकतो. फक्त मटकी ५-६ तास भिजवावी.
२) मी मुगाची डाळ सालीसकट वापरली होती.
३) काहीजण मटकीची डाळ जास्त घेउन उरलेल्या डाळी कमी घेतात. तसे केले तरीही चालेल.
४) डाळी धुवून वाळवून त्याचे भरडसर पीठ काढावे. या पिठाला थोडे गरम तेलाचे मोहन घालून भिजवावे. आणि चपटे वडे तळले तरीही चालते, वडे जास्त खुसखुशीत होतात.
५) वडे तळून झाले कि उरलेल्या तेलातील ४ टेस्पून तेल लहान कढल्यात काढावे आणि त्याचीच फोडणी करावी. म्हणजे ताजे तेल काढायची गरज नाही.

0 comments:

Post a Comment