Pages

Wednesday 7 November 2012

साट्याच्या करंज्या - Satyachya Karanjya (Kanavle)

Layered Karanji (kanavle) in English

महत्त्वाच्या स्टेप्सचे फोटो पाककृतीच्या तळाला पाहायला मिळतील.

वेळ: ५० मिनिटे
८  ते १० मध्यम करंज्या

साहित्य:
कव्हर-
१/२ कप मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तूप, मोहनासाठी
चिमुटभर मीठ
खायचा रंग (लाल किंवा हिरवा)
२ ते ४ टेस्पून दुध
सारण-
१/२ कप किसलेले सुके खोबरे, भाजलेले
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून बारीक चिरलेले बदाम, पिस्ते, चारोळ्या
१/२ टीस्पून वेलची पूड
साटा-
३ टेस्पून तूप
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
इतर साहित्य-
तळण्यासाठी तूप

कृती:
१) मैदा आणि रवा एकत्र करून २ टेस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळून मीठ घालावे. दुध घालून मध्यमसर मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे.
२) तोवर सारण बनवावे. भाजलेले खोबरे हाताने चुरून घ्यावे. त्यात पिठीसाखर, बदाम-पिस्ते, आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे.
३) तूप हाताने फेसून घ्यावे. तूप हलके झाले कि कॉर्न फ्लोअर एकत्र करून फेसावे.
४) भिजवलेले पीठ दोन समान भागात विभागून घ्यावे. एका भागात २-३ थेंब रंग घालून मळून घ्यावे.
५) पांढऱ्या रंगाचा गोळा घेउन एकदम पातळ लाटून घ्यावे. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. त्यावर फेसलेला साटा लावावा.
६) रंगीत गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. हि पोळी पहिल्या पोळीवर ठेवावी. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. यावर साटा लावावा. घट्ट रोल करावा. थोडावेळ हा रोल हवेवर ठेवावा. साट्यातील तूप सुकले कि रोल थोडा घट्ट होईल.
७) रोल घट्टसर झाला कि त्याचे १ इंचाचे तुकडे करावे. लेयर असलेली बाजू वर ठेवून पुरी एवढे लाटावे. त्यात एक-दीड चमचा सारण भरून कडा सील कराव्यात. कातणाने जास्तीची कड कापून घ्यावी.
८) कढईत तूप गरम करून करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

टीपा:
१) साटा तूपाऐवजी डालडाचा बनवला तरीही चालेल.
२) दोनऐवजी ३ पोळ्या सुद्धा करू शकतो.
३) रंग थोडे ठळक घ्यावे. जसे लाल, हिरवा. माझ्याकडे केशरी रंग होता. पण तो तळल्यावर खूप उठावदार दिसत नव्हता.
४) जर वातावरण उष्ण असेल तर तयार रोल १५ एक मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावा. म्हणजे आतील साट्याचे तूप लवकर गोठेल.
५) मोहन कडकडीत गरम पाहिजे नाहीतर करंज्या नरम पडतील.
६) ५० करंज्या करण्यासाठी अडीच ते ३ कप मैदा, ५ ते ६ टेस्पून रवा आणि ५ टेस्पून तुपाचे मोहन घालून पीठ भिजवावे. सारणसुद्धा दिलेल्या प्रमाणाच्या अडीचपट बनवावे.

महत्त्वाच्या स्टेप्सचे फोटो.

0 comments:

Post a Comment