Pages

Monday 5 November 2012

पाकातले चिरोटे - Pakatle Chirote

Glazed Chirote in English

वेळ: १ तास
२० मध्यम चिरोटे

 साहित्य:
३/४ कप मैदा
१/४ कप रवा
१ टेस्पून तूप मोहनासाठी
चिमुटभर मीठ
अंदाजे १/४ कप दुध
३ ते ४ टेस्पून तूप, वितळलेले
२ ते ३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
तूप किंवा तेल चिरोटे तळण्यासाठी
१ कप साखर + ३ ते ४ टेस्पून पाणी, गोळीबंद पाकासाठी

कृती:

१) रवा आणि मैदा एका बोलमध्ये घ्यावे. त्यात १ टेस्पून कडकडीत गरम तूप घालावे. चिमूटभर मीठ घालून चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेउन दुध घालावे आणि मध्यमसर घट्ट असा गोळा भिजवावा. २० मिनिटे झाकूण ठेवावे.
२) २० मिनिटांनी भिजवलेल्या गोळ्याचे ६ सारखे भाग करावे. त्यातील ३ भाग घेउन बाकीचे ३ भाग नंतरसाठी झाकून ठेवावे. प्रत्येक गोळ्याची पातळसर पोळी लाटावी. लाटताना शक्यतो नुसतीच लाटावी, पीठ घेउ नये.
३) २ ते ३ टेस्पून तूप वितळवावे. त्यात २ ते ३ टीस्पून कॉर्न फ्लोअर घालून पेस्ट बनवावी. हि पेस्ट पातळसर असावी जेणेकरून ती पोळीवर व्यवस्थित पसरेल.
४) पोळपाटावर १ लाटलेली पोळी घ्यावी. त्यावर बनवलेली पेस्ट पसरावी. त्यावर दुसरी लाटलेली पोळी बरोबर पहिल्या पोळीवर येईल अशी ठेवावी. या पोळीवर तुप-कॉर्न फ्लोअरची पेस्ट लावावी. वर तिसरी पोळी ठेवून उरलेली पेस्ट यावर लावावी.
५) दोन विरुद्ध बाजूंनी गुंडाळी करत मध्यभागी आणाव्यात. मग एक गुंडाळी दुसरीवर ठेवून घट्ट रोल बनवावा. वरून थोडा दाब द्यावा. अशाप्रकारे उरलेल्या तीन पोळ्या बनवून रोल बनवावा. थोडावेळ न झाकता तसेच ठेवावे म्हणजे तूप थोडे गोठेल आणि रोल हाताळण्यायोग्य होईल.
६) मधल्या वेळेत साखर आणि पाणी एकत्र करून गोळीबंद पाक करावा. आच बंद करावी.
७) जेव्हा दोन्ही रोल थोडे सुकतील, तेव्हा कढईत तूप गरम करावे. रोलचे १ इंचाचे तुकडे करावे. एक तुकडा घेउन लेयर असलेली बाजू वर अशाप्रकारे ठेवून हाताने दाब देउन चपटे करावे. लाटणे फिरवून साधारण अडीच इंचाची पुरी बनवावी. अशाप्रकारे सर्व चिरोटे बनवावे. तयार झालेले चिरोटे तुपात मंद आचेवर तळावे.
८) चिरोटे बदामी रंगावर तळून घ्यावे. तळलेले चिरोटे स्टीलच्या चाळणीत उभे करावे म्हणजे अधिकचे तूप गळून चाळणीत जमेल. जेव्हा चिरोटा थोडा कोमट होईल तेव्हा चिरोटा साधारण गरम असलेल्या पाकात घालावा. मिनिटभर ठेवून बाहेर काढावा. आणि उभा करून ठेवावा. चिरोटे एकावर न ठेवता थोडे सेपरेट ठेवावेत.
चिरोटे गार झाले कि वर पाकचे छान ग्लेझिंग येते.

टीपा:

१) तुपाऐवजी तेल किंवा डालडा वापरले तरी चालेल. पण तुपामुळे चव जास्त खमंग लागते.
२) साखरेचा पाक गोळीबंद करावा. एकतारी किंवा दोनतारी केल्यास चीरोत्यात पाक शोषला जावून चिरोटे नरम पडतील.
३) मोहनासाठी वापरलेले तूप कडकडीत गरम असावे. नाहीतर चिरोटे नरम पडतील.
४) कॉर्न फ्लोअरऐवजी तांदुळाचे पीठही वापरू शकतो.
५) मळलेल्या पीठ २० मिनिटे झाकून ठेवल्यावर घट्ट होवू शकते कारण रवा ओलेपणा शोषून फुगतो. अशावेळी चमचा-दोन चमचे दुध घालून पीठ परत मळावे.
६) साखरेच्या पाकात चिरोटा घालायचे नसल्यास, चिरोटे तळल्यावर बाहेर काढावे. १-२ मिनिटांनी चिरोट्यावर पिठीसाखर भुरभुरावी.
७) पाचव्या स्टेपमध्ये दोन विरुद्ध बाजू गुंडाळण्याऐवजी एकच बाजू शेवटपर्यंत गुंडाळली तरी चालते.
८) जर चौकोनी/आयताकृती आकारात चिरोटे हवे असल्यास रोलचा १ इंचाचा तुकडा घ्यावा. आणि प्लेन बाजू वर ठेवून उभे आणि आडवे लाटणे फिरवावे. (फक्त या आकारात चिरोटे बनवायचे झाल्यास स्टेप ५ मध्ये दिल्याप्रमाणेच रोल बनवावा.)

0 comments:

Post a Comment