Pages

Tuesday 28 August 2012

खव्याचे मोदक - khavyache modak

Khoya modak in English

वेळ: २५ मिनिटे
साधारण १५  लहान मोदक

साहित्य:
१/२ कप खवा (रिकोटा चीजपासून खवा कसा करावा.)
१/२ कप साखर (महत्त्वाची टीप)
२ ते ३ टेस्पून मिल्क पावडर
२ चिमटी वेलची पूड

कृती:
१) साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा.
२) खवा मायक्रोवेव्हसेफ भांड्यात ठेवून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून ४० ते ४५ सेकंद ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा.
३) भांडे बाहेर काढून ढवळा. खवा कोमटसर झाला कि पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत.
४) मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घालावी. हाताने मळून घ्यावे. [खूप जास्त मळू नये, फक्त नीट मिक्स होईस्तोवर मळावे. नाहीतर गोळा तुपकट आणि चिकट होईल].
५) मिश्रण अगदी किंचित कोमट असेल तेव्हा मोदक बनवावेत.

टिप्स:
१) खव्याचे मिश्रण घट्ट झाले नसेल तर थोडी मिल्क पावडर घालावी.
२) साखर घातल्यावर मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये.
३) पिवळे मोदक हवे असल्यास खायचा पिवळा रंग चिमूटभर घालावा. मी ४ ते ५ थेंब लिक्विड कलर वापरला होता.
४) साखर मिक्सरमध्ये बारीक केल्यावर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावी. चाळणीत राहिलेली साखर परत बारीक करावी. जर पिठी साखर न चाळता घेतली तर साखरेचे बारीक बारीक कण मोदक खाताना दाताखाली येतात.
५) हे मोदक मायक्रोवेव्हमध्ये करायला सोप्पे आहेत. पण गॅसवर सुद्धा हे मोदक करता येतील. पॅनमध्ये खवा मोकळा करून मध्यम आचेवर भाजावा. त्यातील तूप बाहेर येईपर्यंत भाजला गेला पाहिजे. भाजलेला खवा दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावा. कोमटसर झाला कि चाळलेली पिठीसाखर यात घालावी, वेलचीपूड घालावी आणि मळावे. मिश्रण चिकट झाले तर दोन-तीन चमचे मिल्क पावडर घालावी. मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.
६) अमेरिकेत खवा बहुतांश इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळू शकतो. (फ्रोझन सेक्शनमध्ये शोधा)

0 comments:

Post a Comment