Pages

Thursday 12 April 2012

कुळीथ पिठले - Kulith Pithle


वेळ: १५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी








साहित्य:
१/४ कप कुळथाचे पीठ
१/४ ते १/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ ते ३ मोठ्या लसूण पाकळ्या, जाडसर चिरून (ऐच्छिक)
साधारण २ ते सव्वा दोन कप पाणी
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट किंवा २ हिरव्या मिरच्या (उभ्या चिरून), कढीपत्ता
२ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ ते ३ आमसुलं
चवीपुरते मीठ
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
१) १/२ कप पाण्यात १/४ कप कुळथाचे पीठ घालून मिक्स करावे. गुठळ्या राहू देउ नयेत. हे मिश्रण तयार ठेवावे.
२) कढईत तेल गरम करून आधी लसूण परतावी. लसणीच्या कडा लालसर झाल्या कि मोहोरी, हिंग, हळद, मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून तो लालसर होईस्तोवर परतावा.
३) कांदा परतला गेला कि त्यात २ कप पाणी, आमसूल आणि मीठ घालावे.
४) पाणी उकळू द्यावे. पाण्याला उकळी फुटली कि त्यात कुळीथ पीठाचे मिश्रण एकावेळी १ चमचा असे घालावे. डाव फिरवून अजून १ चमचा घालावे. एकदम सर्वच्या सर्व घालू नये. गुठळ्या होउ शकतात.
५) पिठले हळू हळू घट्ट होईल. गरजेपुरता घट्टपणा आला कि कुळथाचे मिश्रण घालावे थांबावे किंवा जर थोडेसे मिश्रण उरले असेल तर त्यात २ ते ४ टेस्पून पाणी घालून पिठल्यात घालावे.
६) पिठल्यात नारळ घालून थोडावेळ उकळी काढावी. कोथिंबीर घालुन मिक्स करावे. गरम भाताबरोबर पिठले चविष्ठ लागते.

टीपा:
१) खरंतर, कुळथाचे पीठ चिमटी-चिमटीने भुरभुरून पिठले बनवतात. पण, पाण्यात पीठ मिसळून हि पेस्ट थोडी-थोडी उकळत्या पाण्यात घातली तर सोपे पडते, आणि गुठळ्या होण्याचे चान्सेस पण कमी होतात.
२) जर पिठले जास्त घट्ट झाले तर थोडेसे पाणी घालून सारखे करावे. आणि २-३ मिनिटे उकळी काढावी.

0 comments:

Post a Comment