Pages

Monday 14 February 2011

बेसिक एगलेस केक - Eggless sponge cake

Eggless Vanilla Cake in English

पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ ते ४० मिनीटे
नग: १० लहान तुकडे

eggless cake, cake without egg, plain sponge cake recipeसाहित्य:
३/४ कप मैदा (१०० ग्राम)
२०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ कप + २ ते ४ चमचे)
१/४ कप बटर (मिठविरहित) (६० ग्राम)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर) (१२० मिली)

ओव्हन नसल्यास प्रेशर कुकरमध्येही केक बनवता येईल. रेसिपीसाठी इथे क्लिक करा.

कृती:
१) प्रथम ओव्हन ३५० F (१८० C) ला प्रिहिट करत ठेवावे. तसेच केक टीनला (बेक करण्यासाठीचा डबा) आतून बटरचा हात लावून तयार ठेवावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. मिश्रण एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेनुसार मिश्रण एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे.
५) तयार मिश्रण केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). केक टीन ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर ठेवावा आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. ३५ मिनीटे होईस्तोवर ओव्हन अजिबात उघडू नये. ओव्हन बेकिग करताना मधेमधे उघडल्यास ओव्हनचे तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण ३५ ते ३७ मिनीटांनंतर केकच्या मध्यभागी टूथपिकने किंवा सुरीने खालपर्यंत टोचून तशीच टूथपिक बाहेर काढावी. जर टूथपिकला ओलसट मिश्रण चिकटले नसेल तर केक बेक झाला असे समजावे. जर टूथपिकला ओलसट मिश्रण लागलेले असेल तर अजून थोडावेळ केक बेक करावा.
एकदा का केक बेक झाला कि ५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.



टीप:
१) केक टीनचे बरेच आकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात, जसे की बदाम, गोल, अंडाकृती, चौकोन इत्यादी. तसे केकटीन वापरून विविध आकारात आपण केक बनवू शकतो.
२) वरील प्रमाणातून २ ते ३ जणांसाठी केक बनवता येईल. जर जास्त प्रमाणात केक बनवायचा असेल तर दुप्पट किंवा तिप्पट प्रमाण घेऊन केक बनवावा.
३) वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. मी ८" लांब x ३" रूद असा केकटीन वापरला होता. मिश्रण टीनमध्ये ओतल्यावर, तळापासून दिड ते २ इंच उंचीपर्यंत टीन भरला होता. वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. जर तुमच्याकडे मोठा केकटीन असेल तर मिश्रण दुप्पट घ्या.
४) प्लेन सोडा वॉटरच वापरावे. सोडा वॉटरमुळे केक हलका होतो. कोक, पेप्सी, जिंजर एल, लेमन सोडा वापरू नये. यामुळे केकच्या चवीत फरक पडेल.
५) सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर मिश्रणाची चव पाहावी. जर मिश्रण अगोड वाटले तर काही चमचे कंडेन्स मिल्क घालून मिक्स करावे आणि मगच बेक करावे.

0 comments:

Post a Comment